केदार मारुलकर एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more