भावना प्रसाद नातुप्रसिद्ध लेखक रणजित देसाई,सर्वांना “स्वामी कार” म्हणून परिचित आहेत.त्यांच्या स्वामी,श्रीमानयोगी,राधेय या कादंबऱ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आधारलेल्या आहेत.पण राजा रविवर्मा ही कादंबरी,प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा,यांच्या जीवनावर आधारित आहे.कादंबरत एखाद्या कलावंताचे चरित्र लिहायला घेताना,नुसता सत्याचा आधार घेऊन चालत नाही.त्यात कलावंताच्या कल्पकतेचा आधार घ्यावा लागतो,असे लेखक म्हणतात.या कादंबरीतील,साऱ्याच व्यक्तिरेखा वास्तवातल्या नाहीत.तर काही कल्पक आहेत,याची नोंद घ्यावी,असे लेखक सुचवतात.राजा रविवर्मा,यांच्यावर कादंबरी लिहावी.असे रॉय किणीकर यांनी सुचवले.मग लेखक त्यावर विचार करू लागले.त्यांनी आधी,रविवर्मा यांचे वास्तव्य असलेले प्रदेश पाहिले.बंगलोर, म्हैसूर, केरळ, मावेलीकिरा, कन्याकुमारी ही चित्रकाराची वास्तव्याची,सारी स्थळे पाहून झाली.त्यांचे काही नातेवाईक भेटले. त्यांच्याशी बोलून सगळी माहिती गोळा करून,प्रस्तुत कादंबरी पूर्णत्वास नेली,असे रणजित देसाई सांगतात.
राजा रवी वर्मा यांचा जन्म,राजघराण्यात झाला.वडील इझूमाविल वेदशास्त्रसंपन्न पंडित,आई उमांबा,मामा राजा राज वर्मा, बहीण मंगला हे सारे किलीमानुर येथे रहात असत.मातृकूलपद्धतीनुसार रवीचे वडील लग्नानंतर त्याच्या आईच्या, उमांबाच्या घरी राह्यला येतात.एकदा मामाचा सेवक पाचन हा रवीची तक्रार घेऊन मामाकडे येतो आणि रवीने देवळाच्या भिंती कोळश्याने चित्र काढून,रंगविल्याचे सांगतो.रवीचा मामा चित्र पहातो,तो रवीला विचारतो की ही चित्रे कुणी काढलीत.रवी स्वतःच काढल्याचे सांगतो.राजा राज मामा रवीच्या आईला बोलावून घेतो आणि रवीने काढलेल्या घोड्याच्या चित्राचे कौतुक करतो आणि रवीच्या आईस म्हणतो की,घोड्याचे चित्र काढणे कठीण गोष्ट आहे,जे ज्याने इतके सुरेख काढले आहे.यापुढे मी त्याला शिकवू शकत नाही.त्याने आता त्रावणकोरची राजधानी त्रिवेंद्रमला जाऊन शिक्षण घ्यावे.तेथील राजे आईल्यम तिरूनाल कलेचे भोक्ते आहेत.तिथे त्याला चांगले शिक्षण मिळेल.असे म्हणून राजा राज मामा,रवीला त्रिवेंद्रमला घेऊन जातो.राजे तिरूनालशी परिचय करुन देतो.राजे खुष होतात.राजे तिरूनाल दूरदर्शी, स्पष्ट विचारांचे,कलाकारांना प्रोत्साहन देणारे असतात.त्यांच्या दरबारी परदेशी चित्रकार,चित्र काढण्यास येतात.तेव्हा राजे,त्यांना रवीला शिकवण्याची विनंती करतात.तिथे ब्रूक्स नावाच्या गोऱ्या चित्रकाराला रवीला शिकव असे राजे सांगतात.तो मला चित्र काढत असतांना जवळ कुणी चालत नाही.म्हणून नकार देतो.राजे ज्यावेळेस त्यास तुमची आम्हास गरज नाही सांगतात,तेव्हा ब्रूक्स चित्र काढतांना दूरुन पाह्यला परवानगी देतो.रवी दुरूनच चित्र कसे काढतात,रंग तबक कसे वापरतात,ते बघतो.
एकदा राजे तिरूनाल ह्यांच्या भगिनी राणी लक्ष्मीबाई रवी वर्माच्या महालात येतात.तेव्हा रवी त्यांना त्यांचे “अन्नपूर्णा देवीच्या” स्वरूपांत चित्र काढू देण्याची परवानगी मागतो. राजे तिरूनाल यांना सांगायचे नाही एवढ्या एका अटीवर त्या तयार होतात.चित्र पुर्ण झाल्यावर तो त्यांना दाखवतो आणि चित्र पाहण्यासाठी बोलावणे करतो,चित्र पाहून राजे खूप खुष होतात.हेच रवी वरम्याचे पहिले चित्र.
ते चित्र पाहिल्यावर राजे,राणी साहेबांना म्हणतात की मी मागे तुमची बहीण,पुरुतार्थीचे लग्न रवी वर्माशी लावण्याबाबत बोललो होतो.तेव्हा तुम्ही त्याच्या काळ्या रंगावरुन नकार दिला होता.माणसं नुसती रुपानं संपन्न असून चालत नाहीत,ती गुणानही संपन्न असावी लागतात.रवी वर्माचे पुरुतार्थीशी लग्न होते.रवीला मातृकूलपद्धतीनुसार पुरुतार्थीच्या घरी मावेलीकिराला जावे लागते.तिथे रवीचे पुरुतार्थीशी मतभेद होतात.तिला ह्याचे चित्रकार असणे मान्य नसते.रवी पुनः किलीमानुरला परत येतो.
काही दिवसांनी राजे आईल्यम तिरूनाल रवीला,पुनः त्रिवेंद्रमला बोलावतात.राजा तिरूनाल यांनी खास दरबार भरविलेला असतो.रवी वर्मा याचे जेव्हा दरबारात आगमन होते.तेव्हा राजे, “राजा रवी वर्मा आपण पुढे यावे.”असे महणून स्वागत करतात.रवी वर्मा ‘राजा’ असा उल्लेख केल्यामुळे गडबडून जातात.तेव्हा राजे तिरूनाल खुलासा करतात आणि दरबारचा वीरशृंखलेचा मान प्रदान करतात आणि राजा ही पदवी बहाल करतात,तेव्हा पासून रविवर्मा,”राजा रविवर्मा” म्हणून ओळखला जाऊ लागतो. .
आता रविवर्मा सगळ्या भारतभर भ्रमंती करून,वेगवेगळ्या विषयावरील चित्र काढतात.त्यातील देवदेवतांची चित्रे खूप प्रसिद्ध पावतात.घराघरात त्यांचे नाव पोहोचते.पण त्यांना वेगळे विषय हवे असतात. त्यातूनच पुराणातील काही प्रसंगावर,आधारित चित्र काढतात.रविवर्मा कलेसाठी घरदार सोडून मुंबईला येतो.
मुंबईत आल्यावर एका प्रशस्त बंगल्यात,रंगशाळा निर्माण करून,तेथे भाऊ राज वर्मा सह रहाण्यास सुरुवात करतो.यादरम्यान सुगंधा नामे कलावंतीण,त्याच्या आयुष्यात येते.ती त्यावर मनापासून प्रेम करत असते.त्याच्या कलेची प्रशंसा करते.रवि वर्माचे कलेवरील प्रेम,त्याची सुंदर देहयष्टी,सुंदर आणि सरळ नासिका,मध्यभागी गंध लावलेले भव्य कपाळ,तेजस्वी डोळे,धारदार नजर तिच्या मनात भरते.तिच्या सहवासात,रवी वर्मा कडून एकसेएक कलाकृती घडत जाते.जसे शकुंतला आणि मेनका,हंस दमयंती,मानिनी राधा,अशी अनेक उत्तम चित्रांची निर्मिती होते.आसेतू हिमाचल त्यांच्या चित्रांची कीर्ती पसरते.रवी वर्माच्या चित्रांचे वैशिष्ट केवळ सुंदरता एवढेच नव्हते,तर त्याच्या चित्राच्या चेहऱ्यावरील भाव इतके खरे असत,की पहाणाऱ्याची नजर चेहऱ्यावरून खाली ढळतं नसे.परंतु मनुष्याच्या आयुष्यात चांगल्या बरोबर वाईटही घडतच असतं.ज्यांना रविवर्मा यांची कीर्ती सहन होत नाही,असे लोकं त्यांची नाहक बदनामी करतात.रवी वर्माला अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागले.प्रत्येक मोठ्या माणसाच्या बाबतीत जे घडते ते,की प्रशंसा करणारे लोक कमी व नावं ठेवणारे लोक जास्त अशी परिस्थिति त्याच्याही जीवनांत येते.
मुंबईला असतांनाच राजा रवी वर्मा यांस कोर्टाची नोटिस येते.त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यांत आलेले असतात.पहिला गुन्हा ‘हिंदूंच्या देवदेवता घराघरांत पोहोचवून त्यांच पावित्र्य नष्ट केले’ आणि दूसरा ‘देवदेवतांची नग्न चित्र काढून त्यांना बीभत्स रूप दिले आहे.देवदेवतांची विटंबना केली आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.ही बातमी पसरल्यावर बापट नावाचे वकील,जे त्यांच्या चित्रांचे ग्राहक व चाहते असतात.ते राजा रवी वर्मा यांचे वकीलपत्र घेण्यास पुढे येतात.पण राजा रवी खटला स्वतःच चालविण्याचे ठरवितात.नकार देतांना जे शब्द लेखकाने राजा रवी ह्यांच्या तोंडी दिलेले आहेत,ते असे “बापट,एक गोष्ट लक्षांत घ्या. माणसान आयुष्यात कुठेतरी श्रद्धा बाळगून जगावं. त्या श्रद्धेला तडा जातो असं वाटलं तर सर्वस्व पणाला लावावं..ही माझी श्रद्धा आहे.तिला कोणीतरी आव्हान दिले आहे.ते स्वीकारणें हा माझा एकट्याचा धर्म आहे.खटला दाखल करणाऱ्यांचे वकील आणि रवी वर्मा ह्यांच्यातील दावे आणि प्रतिदावे हे कादंबरीची 10-12 पाने व्यापुन टाकतात.ते येथे देणे शक्य नाही.पण राजा रवी वर्मा कोर्टापुढे जे म्हणतो ते असे, “महाराज माझ्यावर जो आरोप केला आहे की, माझ्या चित्रात नग्नता आहे आणि मी देवादिकाच्या चित्रांचा प्रसार केला,हा आरोप मला मान्य आहे,फक्त मला आज एवढाच खेद वाटतो की माझ्या मनातलं नग्नतेचे जेवढं सुंदर रूप मला दिसलं तेवढं मला चित्रित करता आलं नाही.” राजा रवी वर्माची ह्या खटल्यातून सुटका होते. या कटू पण जीवघेण्या प्रसंगातून ते सहीसलामत बाहेर पडतात.पण सुगंधाला गमावून बसतात.
मुंबईच्या वास्तव्यातच, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याशी,रविवर्मा ह्यांचा परिचय होतो.ते रवी वर्मा ह्यांना चित्र परदेशात पाठविण्यासाठी सुचवितात व संधी उपलब्ध करून देतात.राजे गायकवाड गुणग्राही असतात व उत्तम कलाकारांना मानसन्मान देतात.बडोदा संस्थानांमध्ये प्रदर्शन भरवितात.तिथून पुढे चित्रकलेचा प्रसार व्हावा,म्हणून त्यांच्या मदतीने,रविवर्मा वेगवेगळ्या शहरांमधून चित्रांची प्रदर्शनं भरवितात.लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.चित्रांची कमतरता भासू लागते.म्हणून ते चित्रांचा छापखाना काढायचे ठरवतात.यामागे लोकांना चांगली चित्रे पहाण्याची सवय लागली पाहिजे,हा त्यांचा उद्देश असतो.पण हा सगळा कामाचा डोलारा सांभाळताना,त्यांच्या स्वतःच्या तब्येतीकडे ते लक्ष देऊ शकत नाही.दरम्यान त्यांचे मामाजी,जे त्यांच्यासाठी दैवता समान असतात,त्यांचा मृत्यू होतो.लहान भाऊ,जो चित्र काढण्यास नेहमी मदत करतो,त्याचा मृत्यू होतो.मृत्यूची साखळी संपतच नाही.आईचा वृद्धापकाळाने मृत्यु होतो.रवी या सगळ्यात एकाकी पडतो.खचून जातो.
ह्या सगळ्याच कारणांमुळे,ते मुंबईचा छापखाना विक्रीला काढतात.चांगल्या किंमतीची अपेक्षा असूनही,जर्मन तंत्रज्ञान असलेला हा कारखाना,फक्त पंचवीस हजार रुपये एवढ्या किमतीला विकला जातो.मुंबई सोडून ते आपल्या जुन्या गावी,किलीमानूर येथे येऊन रहातात.आपुली अर्धवट राहिलेली चित्रे पुर्ण करतात.ते निराश झालेले असतांना,त्यांची मैत्रीण फ्रेंना म्हणते,नाही रवी,तुझा पराजय नाही झाला,तू यशस्वी झाला आहेस.ती कांगरा आर्ट,ती मुगल आर्ट यांचे वळण बदलून,तू चित्राला नवीन दिशा दिलीस.माणसासारखी माणसं निर्मिलीस,हेच तुझ्या कलेचे मोठेपण आहे.ती समजावते.पण कलावंताचे कलासक्त मन,ते समजण्याच्या पलीकडचे असते.त्या आजारपणात रवी वर्मा जगाचा निरोप घेतात.
कादंबरी वाचून आपण सुन्न होऊन जातो.प्रत्येकाने वाचावे अशी ही कादंबरी आहे.रणजीत देसाईंनी कादंबरीत,प्रत्येक प्रसंग अक्षरश जिवंत केला आहे.राजा रवी वर्माच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा जिवंत उभ्या केल्या आहेत.कादंबरी वाचतांना,प्रत्यक्षात प्रसंग घडताहेत,असे वाटत राहते.रविवर्म्याचे मामा,राजा राज वर्मा ह्यांची बुद्धिमत्ता तेजस रंग,भेदक डोळे,अशी प्रतिमा उभी केली आहे.तर कुटुंबातील इतर सदस्य आई,वडील,भाऊ राज,बहिण मंगल,सगळे अवतीभवती वावरत आहेत असे वाटते.बडोद्याचे राजे सयाजीराव,तसेच सेवक रविवर्माचा मित्र रामय्या,या पात्रांच्या व्यक्तिरेखा,छान रेखाटल्या आहेत.त्यांची लेखणी साहित्याच्या सर्व अंगाला स्पर्शून जाते.कादंबरीत स्वामी विवेकानंद रविवर्म्याच्या घरी भेट देतात तो प्रसंग,रविवर्मा आपल्या आई,वडील,मामांना भेटायला जातो तो प्रसंग, गोपाळ कृष्ण गोखले,दादाभाई नवरोजी इत्यादी मान्यवर राजा रविवर्माना भेटतात तो प्रसंग,आणि राजा रवी वर्माच्या अंतिम प्रवासाचा प्रसंग,असे अनेक प्रसंग,लेखक आपल्या लेखणीने अजरामर करतात.ही कादंबरी,वाचण्यायोग्य आहे.एका जगप्रसिद्ध कीर्तीच्या,अजरामर चित्रकाराची, सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली कादंबरी “राजा रवी वर्मा” आपण वाचली नसल्यास अवश्य वाचा.
मला कल्पना आहे की,परिचय अतिदीर्घ झाला आहे.पण राजा रवी वर्मा सारखे अफाट व्यक्तिमत्व, रणजीत देसाई ह्यांच्या सारखा सिद्धहस्त लेखक आणि 300 पानांची कादंबरी, ह्या सगळ्याकडे बघता हा फारसा मोठा नाही,हे आपणांस ही कादंबरी वाचतांना जाणवेल.
येथे प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो की मी आणि प्रसाद आणि श्री आणि सौ दिवटे,स्वामीकारांच्या गांवी कोवाडला गेलो असतांना,स्वामीकारांचा नातु सिद्धार्थ शिंदे (मुलीचा मुलगा) ह्याने आम्हांस स्वामीकारांची 3 पुस्तके भेट दिली होती.‘राजा रवी वर्मा’ हे त्यातलेच एक पुस्तक.
...Read more