DAINIK TARUN BHARAT MUMBAI 16-08-1998ज्येष्ठ नाटककाराची नाटयशैली…
कादंबरीकार म्हणून अधिक प्रसिद्ध असलेले वि. स. खांडेकर समीक्षक म्हणूनही तितकेच गण्य आहेत. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा त्यांचा अभ्यास सुपरिचित आहे. त्यातून जशी त्यांची अभ्यासक वृत्ती दिसते, त्याचप्रमाणे त्यांनी संादित केलेला ‘रंगदेवता’ हा नाट्यवेच यांचा संग्रह त्यांच्यातील समिक्षकाची साक्ष पटवतो.
‘रंगदेवता’मध्ये किर्लोस्कर ते शिरवाडकर अशा दहा महत्त्वाच्या नाटककारांच्या गाजलेल्या नाटकांतील निवडक वेचे आहेत. किर्लोस्करांचे ‘सौंभद्र’, वा. बा. केळकरांचे ‘त्राटिका’, देवलांचे ‘शारदा’, कोल्हटकरांचे ‘मूकनायक’, खाडिलकरांचे ‘सत्वपरीक्षा’, गडकऱ्यांचे ‘राजसंन्यास’, वरेरकरांचे ‘भूमिकन्या’, ‘सीता’, अत्र्यांचे ‘कवडीचुंबक’, कणेकरांचे ‘आर्शिवाद’, आणि शिरवाडकरांचे ‘दूरचे दिवे’ या नाटकांतील वेचे ‘रंगदेवता’ मध्ये आहेत. यातील प्रत्येक नाटकाने रंगभूमी गाजवलेली आहे. अर्वाचीन वाङ्मयाच्या इतिहासात या नाटककारांना आणि त्यांच्या या नाटकांना उच्च स्थान आहे. ‘मराठी नाट्यलेखनाचा कसकसा विकास होत गेला त्याचा अस्पष्ट आलेख’ म्हणून या संग्रहाचा उल्लेख प्रकाशक करतात. साहजिकच इथेही खांडेकरांमधला इतिहासाचा अभ्यासक लपलेला नाही.
मूळ वेच्यांचा भाग सोडला, तर प्रस्तावना आणि प्रत्येक वेच्याचा परिचय एवढा भाग खांडेकरांचा आहे. त्यामुळे जितके महत्त्वपूर्ण वेचे आहेत तितकेच महत्त्वपूर्ण खांडेकरांची समिक्षाही आहे. प्रस्तावनेत खांडेकरांमधील इतिहासांच्या अभ्यासकाला अधिक वाव मिळाला आहे. १८८० ते १९५० या काळातील नाट्यक्षेत्रातील विकासाचा आढावा प्रस्तावनेत घेतला आहे. १८८०-९० या दशकात साहित्याच्या सर्वच क्षेत्रात विकास घडत होता. साहजिकच तो नाट्यक्षेत्रातही घडत होता; काव्य, नाट्य, कादंबरी वगैरे लोकप्रिय वाङ्मयप्रकारांचा एक प्रकारचा पुनर्जन्म झाला, असे खांडेकर म्हणतात. साहित्य क्षेत्रातील ‘या काळात या सर्व वाङ्मय प्रकारांची कात गळून पडली’ असे वर्णन केले तर चुकीचे होणार नाही.’
नाट्यक्षेत्रात क्रांती घडवण्याचे श्रेय किर्लोस्करांना जाते. किर्लोस्करांच्या ‘शाकुंतल’च्या रूपाने रंगभूमीवर नवे युग सुरू झाले. पौराणिक, ऐतिहासिक कथा भागांवर आधारित नाटकांच्या जमान्यात किर्लोस्करांनीही तोच मार्ग पत्करला. त्यांच्या संगीत नाटकांनी मराठी रसिकांची मने काबीज केली. ‘सौभद्र’ने किर्लोस्करांच्या प्रतिभेचे खरेखुरे दर्शन घडते, असे खांडेकर म्हणतात. विलक्षण लोकप्रियता मिळण्यासारखे अनेक गुण या नाटकात आहेत. संस्कृत सुखान्त नाटकांच्या प्रभावामुळे किर्लोस्करांनी सुभद्राहरणाची सुखान्त प्रेमकथा ‘सौभद्र’साठी निवडली. आपल्या रसाळ प्रतिभेच्या जोरावर त्यांनी त्या कथेचा कुशलतेने विकास केला. ‘महाभारतातल्या मूळ कथेत नसलेला, पण हरिदासी कथांतून पिढ्या-न्-पिढ्या आलेला अर्जुनाच्या संन्यासंग्रहणाचा भाग नाट्यदृष्ट्या अत्यंत रसाळ व रंजक होईल, हे नाटककाराने ओळखले आणि कथेच्या विकासाला आणि विलासाला त्याचा उपयोग करून घेतला.’ याच भागाचे चित्रण ‘त्रिदंडी संन्यास’ या वेच्यात होते. प्रसंगनिष्ठ व स्वभावनिष्ठ विनोदनिर्मिती हे या प्रवेशाचे प्रमुख अंग आहे, या वेच्यात येणारे नणंदा-भावजयांचे संवाद सामान्याच्या घरातले वाटतात, त्यामुळे प्रेक्षक नाटकाशी समरस होतात, असे खांडेकर म्हणतात.
मराठी नाटकांवर संस्कृतप्रमाणेच इंग्रजीमधील नाटकांचाही प्रभाव होता, त्यामुळे इंग्रजी नाटकांचे भाषांतर व रूपांतरेही मराठीत मोठ्या प्रमाणावर झाली. वासुदेव बळवंत केळकर यांनी शेक्सपिअरच्या ‘टेमिंग ऑफ द श्रू’ ‘त्राटिका’ हे रूपांतर केले. या नाटकाचे मूळ पाश्चात्य आहे. याचा विसर पडायला लावणारी खुसखुशीत भाषा आणि अस्सल देशी रूप यामुळे केळकरांची कौशल्य स्पष्ट होते. ‘त्रिदंडी संन्यास’ प्रमाणेच ‘त्राटिका’ आणि ‘प्रतापराव’ हा वेचाही विनोदप्रधान आहे. त्राटिकेला वठणीवर आणण्यासाठी प्रतापरावाने केलेल्या क्ऌप्त्यांमधून ही विनोदनिर्मिती होते. या वेच्यातून विनोदाचे ‘तरल नर्तन’ दिसते, असे खांडेकर म्हणतात.
किर्लोस्करांचे शिष्य गोविंद बल्लाळ देवल यांना खांडेकर त्या काळातले ‘मूर्धाभिषिक्त नाटककार’ म्हणतात. ‘शारदा’सारख्या नाटकाने त्यांनी सर्वस्वी स्वतंत्र विषयावरचे नाटक रंगभूमीवर आणले. गद्याइतकीच पद्याची रचनाही अर्थपूर्ण व रसाळ असणे हे देवलांच्या नाटकांचे वैशिष्ट्य ‘शारदा’मध्येही जाणवते. बालाजरठं विवाहाच्या समस्येवर आधारलेल्या या नाटकाने सामाजिक नाटकांचे युग सुरू झाले. ‘मराठी नाट्यकला समाजाभिमुख करण्याचे आणि ललितकृती लोकरंजनाबरोबर लोकशिक्षणाचेही कार्य साधू शकते. हे सिद्ध करण्याचे श्रेय ‘शारदा’ इतकेच दुसऱ्या कुठल्याही मराठी नाटकाला देता येणार नाही’, असे मत खांडेकर ठामपणे मांडतात. ‘गुडघ्याला बाशिंग बांधणारा म्हातारा’ या वेच्यात हास्यरस व करुणरस यांचे मिश्रण दिसते. मात्र दोन्ही रस एकमेकांना बांध न आणता साथ देतात, हे विशेष.
इतर नऊ नाटकांविषयी विस्तृत निवेदन करणारे खांडेकर कोल्हटकरांबाबत मात्र मौन पाळतात. ‘कोल्हटकरांच्या संवादातले, विनोदातले आणि कल्पना चमत्कृतीतले बुद्धिचापल्य प्रेक्षकांना गुदगुल्या करते. पण ते त्यांची हृदये मात्र हलवू शकत नाही’ असे थोडक्यातच कोल्हटकरांबद्दल ते लिहितात. कोल्हटकरांच्या ‘मूकनायक’ मधील बहिरा प्रतिनायक हा वेचाही विनोदावर आधारित आहे. सुंदर, सूचक आणि विनोदी संवादांनीही हे नाटक भरलेले आहे. विक्रांतचे मुकेपण, केयूराचे बहिरेपण या दोन सोंगांमधून घडणारा विनोद आणि प्रतोदाने केयूराचे सोंग उघडकीस आणणे असा या वेच्यातील प्रसंग आहे. ‘शारदा’ इतकेच मराठी रंगभूमीला नवे वळण लावणारे नाटक म्हणून ‘मूकनायक’चा उल्लेख खांडेकर करतात.
खाडिलकरांनी मराठी सुखान्तिकांची परंपरा झुगारून दिली. त्यांच्या व्यक्तित्त्वातील उग्रता, उत्कटता, उदात्तता, देशभक्ती, लोकजागृती हे विशेष त्यांच्या नाटकांतूनही जाणवतात. ‘सत्वपरीक्षा’ या पौराणिक नाटकातून घेतलेला ‘हे पोट फेकून दिले !’ हा वेचा खाडिलकरांचे तेजस्वी तत्त्वज्ञान आणि त्याची नाट्यपूर्ण व हृदयस्पर्शी मांडणी करण्याची त्यांची पद्धत एक चांगला नमुना आहे’, असे खांडेकर म्हणतात. हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास यांच्या कथेची पाश्र्वभूमी लक्षात घेता या वेच्याची परिणमकारकता प्रत्ययाला येते.
गडकऱ्यांची आपल्या नाटकात कोल्हटकरांचे वाङ्मयगुण आणि खाडिलकरांचे नाट्यगुण यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ‘राजसन्यास’ हे त्यांचे ऐकमेव ऐतिहासिक नाटक अपूर्ण राहिले. खांडेकर म्हणतात, ‘कलावंताच्या मृत्यूमुळे अपूर्ण स्थितीत राहिलेले डोंगरातले एखादे भव्य, सुंदर लेणे पाहावे, तसा भास ‘राजसंन्यास’ नाटक वाचताना होतो. ‘संभाजीच्या स्वैर पण तेजस्वी स्वभावरेखेवर ‘राजसंन्यास’ आधारलेले आहे. हिरोजी, साबाजी, येसूबाई आणि तुळशी यांच्या स्वभावाचे प्रभावी दर्शन या लहानशा वेच्यांतूनही घडवण्याचे गडकऱ्यांचे लेखणीचे सामर्थ्य जाणवल्या वाचून राहत नाही.
वरेरकरांना खांडेकर ‘मराठी नाट्यसृष्टीचे शेलारमामा’ म्हणून संबोधतात. ते जितके कलावंत, तितकेच प्रचारक व समाजसुधारक. ज्या सामाजिक प्रश्नाविषयी जिव्हाळा होता. तोच त्यांच्या ‘भूमिकन्या सीता’ या पौराणिक नाटकाचा केंद्रबिंदू आहे. स्त्रीजातीवर होणारा अन्याय त्यांनी सीतेंच्या माध्यमातून मांडला आहे. सीतात्यागाच्या प्रसंगाला शंबूक आणि उर्मिला या दोन भूमिकांची जोड देऊन नाविन्य निर्माण केलेले आहे. ते ‘प्रभू रामचंद्रांचे अग्निदिव्य’ या वेच्यातून दिसते. उर्मिलाच्या स्वाभिमानी स्त्रीमनाचे प्रभावी चित्रण यात येते.
काही गंभीर स्वरूपाच्या नाटकानंतर खांडेकर पुन्हा विनोदाकडे वळले आहेत. शेक्सपिअरइतकाच मोलिएर या फ्रेंच नाटककाराच्या नाटकांनीही मराठी नाटकावर प्रभाव पडला आहे. त्याच्याच ‘ला व्हार’ या नाटकाचे अत्र्यांनी ‘कवडीचुंबक’ हे रूपांतर केले. ‘पंपूशेठ पैठणकर’ या वेच्यातून अत्र्यांच्या प्रसन्न विनोदशैलीचे प्रतिबिंब दिसते.
‘कुलवधू’कार रांगणेकरांच्या ‘आर्शिवाद’मध्ये स्त्री प्रश्नांचेच कौटुंबिक पद्धतीने केलेले चित्रण आहे. ‘पितृऋण’च्या वेच्यात मध्यमवर्गीय स्त्रीपुढे पडलेला सामाजिक पेच सहानुभूतीने चितारला आहे. ‘रंगभूमीच्या पडत्या काळात रांगणेकरांनी तिची मोलाची सेवा केली,’ असे खांडेकर म्हणतात.
शिरवाडकरांची कल्पक व तेजस्वी कवीवृत्ती त्यांच्या नाटकांमधूनही तितक्याच समर्थपणे जाणवते. ‘दूरचे दिवे’ या त्यांच्या नाटकाला ऑस्कर वाइल्डच्या ‘आयडियल हजबंड’चा आधार आहे. या नाटकात धर्म आणि व्यवहार यांच्या संघर्षाचे चित्रण आधुनिक काळाला अनुरूप अशा कथानकाद्वारे केलेले आहे. विश्रामचे आधुनिक तत्त्वज्ञान. ‘पूजा ! पण कुणाची ? या वेच्यातून व्यक्त होते.
प्रत्येक वेच्याच्या परिचयामध्ये खांडेकरांनी कधी सविस्तर तर कधी संक्षिप्त नाट्यपरिचय दिला आहे. त्यातून त्यांच्यातला समिक्षक प्रभावीपणे जाणवतो. विनोद, कारुण्य, नाट्य, रसात्मक अशा विविध गुणांनी नटलेले नाट्यवेचे व अभ्यासपूर्ण समीक्षा यांचा हा संग्रह अर्वाचीन वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरतो, यात शंका नाही.
...Read more