DAINIK SAKAL 22-12-1996साठ वर्षांपूर्वीची भाषणे आजही तितकीच ताजी...
मराठीतील पहिले ‘ज्ञानपीठ’चे मानकरी वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. त्या निमित्ताने त्यांची बहुतांशी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा मेहता पब्लिशिंग हाऊसचा संकल्प आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यंनी या संकल्पपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आजवर तिसेक पुस्तकांची पुनर्मुद्रणे पूर्ण झाली आहेत.
खांडेकरांनी १९३४ ते १९३६ या तीन वर्षांत मराठी साहित्य संमेलन कथा शाखा, गोमंतक साहित्य संमेलन - मडगाव, शारदोपासक संमेलन - पुणे, मुंबई मराठी साहित्य संमेलन आणि सोलापूर जिल्हा साहित्य संमेलन अशा पाच संमेलनात अध्यक्ष म्हणून भाषणे केली. या पाच भाषणात एका न झालेल्या भाषणाची भर घालून ‘सहा भाषणे’ हे पुस्तक १९४१ मध्ये प्रसिद्ध केले गेले. त्याची दुसरी आवृत्ती नुकतीच निघाली आहे. ‘अभिषेक’ हा दुसरा अध्यक्षीय व वाङ्मयीन भाषणांचा संग्रहही नंतर निघाला. खांडेकरांची वाङ्मयीन भूमिका समजून घेण्यास या भाषणांचा थोडासा उपयोग होऊ शकेल. कलावाद विरुद्ध जीवनवाद यांचे प्रारंभीचे पडसाद यात वरचेवर उमटले आहेत.
१९३४ मधील कथासंग्रहांचा आढावा घेऊन त्या वर्षी कृष्णाबाई, नाट्यछटाकार दिवाकार, वि.वि. बोकील, ना.सी. फडके, लक्ष्मणराव सरदेसाई यांच्या कथा प्रथमच संग्रहरूपात आल्या याकडे लक्ष वेधले आहे, आनंदीबाई शिर्के, य.गो. जोशी, कुमार रघुवीर वगैरेचीही पुस्तके आली. नियतकालिकांमून बाहेर पडणाऱ्या या कथांना कला व वाङ्मय यांच्या कसोट्या लावल्या, तर हाताच्या बोटावर मोजण्याइतका कथाही मिळणार नाहीत, असे ते मान्य करतात.
पण या हौशी लेखकांतून उद्याचा सेनापती मिळेल, अशी अपेक्षाही प्रकट करतात. कथा वाङ्मय बहुजनांसाठी मानवी हृदयाशी क्रीडा करण्यासाठी जन्मास येते; ज्ञानदान हा तिचा मुख्य हेतू नसतो. कथनकला ही वसंतसेनेसारखी जी आनंदरूपी चारुदत्ताला माळ घालणार; चारूदत्ताची नीती म्हणून एखादी पत्नी असली तरी ती कुणाची पर्वा करणार नाही, असे उपमेद्वारे ते पटवू पाहतात. हेतूप्राधन्यतेने कथा रूक्ष व ओबडधोबड होते. कथेला कोणताही विषय चालतो. पण तो विषय कलासुंदर रीतीने मांडला पाहिजे. कथा, प्रणय व नीती यांचा तिरंगी सामना सदैव रंगत असतो. अद्भूतरम्य कथांतही भरपूर प्रणय सापडतो. पुराणनीतिवाद्यावर खांडेकर टीका करतात; तसेच इतर भाषापेक्षा मराठी कथा विपुलता, वैचारिक व कलागुण यात मागे रेंगाळते आहे. अशी त्यांची तक्रार आहे. या सुमार दर्जाचे कारण म्हणून मागणी तसा पुरवठा व गाजरपारखी प्रकाशन यांना ते दोष देतात. टीकाकारांचेही बक-शुक-पिक-काक असे चार वर्ग ते पाडतात. वृत्तपत्रांतील परीक्षण पांचट असतात; वाचकवर्गाने अभिरुचिसंपन्न व्हावे, लेखकाने आत्मतत्त्वाची जाण ठेवावी; कल्पनारम्यतेचा अतिरेक करू नये इ. सूत्रे सांगून कथालेखकांना काही सूचनाही देतात. त्यातील एक वाचनावर भर न देता, स्वत:च्या भल्याबुऱ्या अनुभवांतून कथा निर्माण करा. विनोदी, शास्त्रीय, चमत्कृतिजनक, अद्भूतरम्य ऐतिहासिक अशा कथाही हव्या असेही सुचवतात. आजही हे सर्व मुद्दे गैरलागू ठरत नाहीत. यात खांडेकरीय चिंतनाचा दीर्घपल्ला लक्षात येतो.
सौंदर्यदृष्टी, सहदयता वैयक्तिक तत्त्वज्ञान, सूक्ष्म निरीक्षण व कलाचातुरी हे ललित लेखनाचे पंचप्राण असतात. याकडे अंगुलीनिर्देश करून खांडेकरांनी म्होपासॉ, वाल्मीकी, क्युप्रित, ब्रिओ प्रभृतींचे हवाले देत गोममकीय भाषण रंगवले आहे. छोट्या संमेलनांची आवश्यकता व कोकणी - मराठी भाषेची निकटता यांचीही आठवण देतात.
शारदोपासक संमेलनात मराठी वाङ्मय कल्पनारम्यतेच्या आसपास घुटमळत असल्याची तक्रार करून केळकर, वा.म. जोशी, वरेरकर, फडके, अत्रे या सर्वांच्या कृतीत कल्पनारम्यतेचे धुके दिसते, हे दाखवून दिले आहे. पिरांदेलो, टर्जिनेव्ह यांची उदाहरणे देऊन, पावित्र्यविंडबन, मूर्तिभंजन, बदलता जीवनविषयक दृष्टिकोन यांची जाणीव देऊन भविष्यकाळ उज्ज्वल आहे, अशी ग्वाही दिली आहे.
मुंबई मराठी साहित्य संमेलनातील भाषणात प्रथम, मुंबई हे शहरही मराठी ग्रंथकारांच्या दृष्टीने संपन्न आहे. मराठी पुस्तकांची आणि दैनिक साप्ताहिकांची हीच मुख्य बाजारपेठ आहे. ज्येष्ठ लेखकाप्रमाणेच बुद्धिमान तरुण लेखक येथे आहेत. याकडे लक्ष वेधले आहे. या भाषणत ललित वाङमय कलावादी भूमिकेच्या मर्यादा, जीवनवादी - ध्येयवादी दृष्टी यांचे विवेचन करताना ‘वास्तव जीवनाचे सोने, विचारांचा प्रज्वलित अग्नी आणि कलाकुशल सुवर्णकारांची निर्माणशक्ती यांच्या त्रिवेणी संगमावाचून शारदेच्या भांडारात मोलाची भर घालणारा अलंकार तयार होणेच शक्य नसते.’ असे प्रतिमात्मक भाषेत विधान केले आहे. परंतु आपले लेखक चिंतनात कमी पडतात असे, ते म्हणतात. इंग्लंडमधील बेनेट (व्यवसायिक लेखक), एव.जी. वेल्स (पढिक पंडित), गॉल्सवर्दी (न्यायाधीशांची समतोल वृत्ती) जॉर्ज बनॉर्ड शॉ (कुशल शस्त्रवैद्याची बुद्धी) हे चौघे लेखक कलावंताने विचारवंत असणेही आवश्यक आहे हे स्पष्ट करतात, असे खांडेकर म्हणतात. प्रचलित समाजाचे सत्य सर्वस्पर्शी चित्रण वाङ्मयसौंदर्याला प्रेरकच होते, असे सांगताना टर्जिनेव्ह, डोस्टोवस्की, टॉलस्टॉय्र मॅक्झिम गॉर्की यांचे दाखले देतात. ललित वाङ्मयात जीवनदृष्टी ही असायलाच हवी, मार्क्स व फ्राईड यांचाही अभ्यास हवा, लेखकांनी सामाजिक बंडखोरी करायला हवी इत्यादी विचारही मांडले आहेत.
सोलापुरात झालेल्या पहिल्याच जिल्हा साहित्य संमेलनात तेथील साहित्यकारांचा प्रथम गौरवपूर्ण उल्लेख करून, मराठी साहित्याची सद्य:स्थिती आशावादी आहे, केळकर-वरेरकर-फडके यांचे लेखनवैपुल्य पाश्चात्य लेखकांच्या तोडीचे आहे, लघुकथा-लघुनिंबध, एकांकिका वगैरे नवे प्रकार उत्साहाने लिहिले जात आहेत, वाङ्मयीन वादही लढवले जात आहेत, याची नोंद घेतलेली आहे. कला व जीवन या वादाच्या विस्तृत परामर्श घेतांना आपली जीवनवादी भूमिका कशी महत्त्वपूर्ण आहे. याचे समर्थन केले आहे. वास्तववादी व सामाजिक चित्रण प्रमुख भूमिकांभोवती असणारे विभूतिमत्त्वाचे वलय, भाषेचा सुबोधपणा भाषाशुद्धी वाद, सावरकरांची लिपी सुधारणा चळवळ अशा अनेक बाबींवरचे मतप्रदर्शन आहे.
सहाव्या न झालेल्या भाषणात या पाच भाषणांच्या वेळची स्थिती, समारंभातील मौजमजा (एका हाता छापील भाषण व दुसऱ्या हातात माईक घेऊन बोलताना करावी लागलेली कसरत - यामुळे पुâटलेला घाम) खांडेकर सांगतात. अध्यक्षीय भाषण हे सद्य:स्थितीत मामुली व परिणामकारक होत असल्याची खंतही त्यांना वाटते. संमेलनातील चर्चाविषयात नावीन्य हवे, अभ्यासू व वक्तृत्वशैली असणारे वक्ते हवेत अशी सूचना ते करतात. आजही या सर्व बाबींबद्दल परिस्थितीत फरक पडलेला नाही. असे दिसते.
गेल्या साठ वर्षांत मराठी वाङ्मय लेखकांच्या भूमिका, विविध वाङ्मयीन वाद, सभा संमेलनाबाबतच्या भूमिका यात काही फरक पडलेला नाही. या भाषणांतील मुद्यांवरून जाणवते. खांडेकरांचे विचार वक्तृत्वपूर्ण अलंकारिक शैलीत प्रकट होतात. आपल भूमिका मांडताना ते समन्वयवादी होतात. त्यामुळे टोकाला जात नाहीत. कुठलाच विचार पूर्णत्वाला जात नाही, हेही ते जाणतात. ही भाषणे वाचताना खांडेकर आपल्याशी बोलत आहेत असे वाटते. साठ वर्षांपूर्वीची ही भाषणे असली तरी ती आजही जुनी वा कालविसंगत नाहीत. खांडेकरांचे शरसंधानही रंजक व मार्मिक असे. ‘हरिभाऊंच्या वङ्काघाताचे पहिले प्रकरण वाचावे. कापड दुकान व शिंप्याचे दुकान यातील बारकावे त्यातील मेहेरजनाचे वर्णन वाचून कळणार नाही. हे खरे (पृष्ठ ८०) मतप्रतिपादनाच्या धोंड्याने वरेरकरांच्या कलेचा कपाळमोक्ष झाला, असे नाही. (पृष्ठ ८१) ‘गाय हा उपयुक्त प्राणी आहे, याबद्दल चहा, दूध, तूप वगैरेवर सर्रास बहिष्कार पडेपर्यत तरी मतभेद होणार नाहीत. पण ती देवता आहे, असे आजच्या तरुणांना सांगितले तर या देवतेच्या मारक्या शिंगांची व्यवस्था काय, या प्रश्नांचे उत्तर देण्याची तयारी हवी.’ (पृष्ठ ६४) ‘गणपतीच्या लहानपणी मी कसा झालो हे पुस्तक नव्हते म्हणून बरे नाही तर त्याने पार्वतीला नाही नाही ते प्रश्न विचारून पुरे केले असते आणि ते प्रश्न ऐकून स्मशानापेक्षाही अधिक एकान्तांची जागा शोधण्याचा मोह शंकराला झाला असता’ (पृ. ६४) पुणे हे महाराष्ट्राचे माहेरघर आहे, असे मी म्हटले तर छे! छे! तिथे साऱ्या महाराष्ट्राला सासुरवास भोगावा लागतो.’ असे उद्गार काढणारे तीर्थस्वरूप वाङ्मयसेवक मला ठाऊक आहेत. (पृ ४९) ‘पण या संमेलनाच्या निमित्ताने एक आणा किमतीचे पुणेवर्णन लिहिणे योग्य होणार नाही.’ (पृ. ४९) ‘नाटकात खादाड विदूषकाची जागा आचरट कवीने घेतलेली दिसते. क्वचित कवी रजेवर गेला तर मास्तर त्याचे बदली काम करतो. दोघेही बिचारे गरीब प्राणी! (पृ. ६२). अशा कल्पक विधानामुळे खांडेकरांच्या भाषणांना रंगत येई.
-शंकर सारडा ...Read more