MAHARASHTRA TIMES 18-06-1989साहित्य अभ्यासकांना उपयुक्त…
‘साहित्याची निर्मितीप्रक्रिया’ हा डॉ. आनंद यादव यांचा ग्रंथ म्हणजे साहित्याची निर्मितीप्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा एक उल्लेखनीय प्रयत्न. सत्यकथा, साहित्यसूची, प्रतिष्ठान इत्यादी दिवाळी अंकांतून प्रसिद् झालेले लेख प्रस्तुत ग्रंथात संकलित केलेले आहेत. त्यामुळे यादवांची निर्मितीप्रक्रियेच्या संदर्भातील मते साहित्याच्या अभ्यासकांना यापूर्वीच माहिती झालेली आहेत. त्या लेखांचे संकलन प्रस्तुत ग्रंथात केल्यामुळे साहित्याच्या अभ्यासकांना निर्मिती विषयक विचार एकत्रितपणे सापडतील. त्याच्या दृष्टीनी या ग्रंथाची उपयुक्तता खूपच आहे.
निर्मितीप्रक्रियेचा विचार यापूर्वी मराठी साहित्यात झालाच नाही असे नाही. ना.सी. फडक्यांच्या ‘प्रतिभासाधन’मध्ये तो सर्वप्रथम झाला. परंतु बा.सी. मर्ढेकरांनी जेवढ्या मूलभूतपणे तो केला असता मर्ढेकरपूर्वकाळात तो कधीच झाला नव्हता. पण त्यानंतरही गंगाधर गाडगीळ, दिलीप चित्रे, विंदा करंदीकर आदी मान्यावर साहित्यिकांकडूनही निर्मितीप्रक्रियेचा विचार म्हणावा तेवढा झाला नाही.
गद्य साहित्याच्याबाबतच
समीक्षकांनी साहित्यनिर्मिती कशी होते या प्रश्नाची आपापल्या परीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. कित्येकांनी निर्मितीप्रक्रियेत गुढगुंजन, उत्स्फूर्तता किंवा अगम्य रहस्याचाच जास्त भाग असल्याचे सांगितले. तर कित्येकांनी तो विचार अतिशय ढोबळपणे केला. (रा. भा. पाटणकर, प्रभाकर पाध्ये, प्रा. गंगाधर पाटील, डॉ. सुधीर रसाळ इत्यादींचा अपवाद वगळता) सर्जन प्रक्रिया ही पूर्णपणे गूढ, रहस्यमय किंवा अज्ञेय अशी मानता येत नाही, असे यादवांचे मत असल्यामुळे सर्जनशील शक्तीचे रहस्यमय स्वरूप शोधणारे प्रश्न यादवांनी या ग्रंथात कुठेही उपस्थित केलेले नाहीत. निर्मितीचा अचेतनाच्या पातळीवरील भाग लेखकाच्याही स्वाधीन नसल्यामुळे सचेतन मनाच्या कक्षेत येणाऱ्या निर्मितीप्रक्रियेपुरताच विचार यादवांनी या ग्रंथात केला आहे.
‘मराठी साहित्यव्यवहार आणि निर्मितीप्रक्रिया’ या लेखात साहित्य कृतीच्या मूल्यमापनाच्या संदर्भात चुकीच्या कल्पना कशा रुजल्या जातात आणि त्याच चुकीच्या कल्पनांचे मानदंड लावून साहित्यकृतीचे मूल्यमापन कसे चुकीच्या पद्धतीने केले जाते हे साधार स्पष्ट केलेले आहे. स्वत:च्या निर्मितीप्रक्रियेचे भान नसल्यामुळे किंवा ते न ठेवल्यामुळे साहित्यिकाचे निर्मितीक्षम मन पृथक्करणशीलतेच्या अभावी मूल्यमापन करताना चुकीच्या पद्धतीने कसे करते याची उदाहरणे यादवांनी या लेखात दिली आहेत. जी. ए. कुलकर्णी व व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथेचे मूल्यमापन करणाऱ्या गंगाधर गाडगीळांच्या लेखांची फेरतपासणी करण्याची कशी गरज आहे हे या संदर्भात यादवांनी सुचविले आहे. निर्मितीप्रक्रिया व समीक्षा व्यवहाराचा काही संबंध नाही हे पूर्णपणे चूक असल्याचेही मत यादवांनी या लेखात व्यक्त केले आहे.
‘व्यावहारिक अनुभव आणि कलानुभव’ या लेखात दोन्ही अनुभवाच्या जातकुळीतला फरक स्पष्ट करून कलावंताच्या निर्मितीक्षम मनाचा व्यावहारिक अनुभवाकडून कलानुभवाकडे प्रवास होताना कोणत्या संक्रमणावस्थेतून जावे लागते याची मीमांसा केली आहे. व्यावहारिक अनुभवातून कलानुभवाची प्रेरणा घेण्याची मूळ प्रकृती असणाऱ्या कलावंतांना कलात्मकतेचे भान ठेवून निर्मितीच्या प्रदेशातून प्रवास करण्यास यादवांनी सुचविले आहे.
निर्मितीच्या अंगाने वस्तुसापेक्ष व व्यक्तिसापेक्ष असे कलानुभवाचे दोन प्रकार पाडून साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात प्रयोगशीलता कशी अवतरत असते याची साधकबाधक चर्चा ‘कलानुभव आणि साहित्यिक’ या लेखात केलेली आढळते.
बौद्धिक शिस्तीचा प्रश्न
‘समीक्षाव्यवहाराला असते त्याप्रकारची बौद्धिक शिस्त निर्मितीव्यवहाराला नसते’ हे साहित्यनिर्मिती आणि साहित्यप्रकार या लेखातील यादवांचे मत मात्र सर्वमान्य होईलच असे नाही. ‘प्रारंभीच्या काळात साहित्यप्रकाराचे स्वरूप काय याचा अभ्यास करून त्यानंतरच साहित्यनिर्मिती करावी असे साहित्यिकाकडून सहसा घडत नाही असे यादवांचे मत आहे. परंतु साहित्यिक एखादा कलानुभव आपल्या कलाकृतीचा विषय बनवतो, जेव्हा अभिव्यक्तीपूर्वी साहित्यप्रकाराच्या आकृतीबंधाचा मनाच्या अचेतन पातळीवरही तो विचार करतोच. त्याने स्वीकारलेल्या साहित्यप्रकाराचा आकृतिबंध डोळ्यासमोर ठेवूनच त्या अनुषंगाने कलानुभवाला कलारूप देण्याचा तो प्रयत्न करतो. त्यामुळे प्रारंभीच्या काळातही निर्मितीप्रक्रियेत बौद्धिक शिस्त कमीअधिक प्रमाणात असतेच. पुढे पुढे तर अव्वल दर्जाचा साहित्यिक त्या साहित्यप्रकाराचा नियोजित आकृतिबंध झुगारून देण्यासाठी बंड करतो - (उदा. मर्ढेकर, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर यांचया कविता बेडेकरांची ‘रणांगण’ किंवा तेडुंलकराचे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक) तेव्हा तर निर्मितीव्यवहाराला जाणतेपणीच शिस्त लाभलेली असते. याच लेखातील ‘बाह्य घटनांवर आधारित अनुभवापेक्षा मानसिक पातळीवरील अनुभवातून माणसू अधिक प्रमाणात व अधिक सत्य स्वरूपात व्यक्त होतो. या यादवांच्या मताशी मात्र सर्वचजण निर्विवादपणे सहमत होतील.
‘साहित्यनिर्मिती आणि साहित्यप्रकार’ यांच्या परस्पर संबंधाचा विचार करून ‘प्रिन्सिपल ऑफ क्रिटिसिझमचे’ लेखक रेनेवेलेकनी सांगितलेल्या पद्य (कविता) गद्य आणि नाटक या साहित्यप्रकारांच्या तीन मूळ जातींच्या अंगभूत वैशिष्ट्याची यादवांनी अभ्यासपूर्ण मीमांसा केली आहे.
चित्रकार निर्मितीप्रक्रियात मुक्त राहू शकतो पण साहित्यिकावर मात्र बंधने पडतात. कारण कोणत्या क्रमाने साहित्यकृती उलगडली म्हणजे आपणास हवा तो प्रत्यय मिळू शकेल याचे भाप साहित्यिकाला ठेवावे लागते. हा विचार ‘नव्या साहित्यप्रकाराच्या शोधात’ या लेखात आहे.
यादवांनी प्रामुख्याने आपल्या कथा व कांदबऱ्याची उदाहरणे घेऊन निर्मितीप्रक्रियेची उकल करून दाखविण्यासाठी लिहिलेले आहेत. गोतावळा व नटरंग या त्यांच्या दोन प्रमुख कादंबऱ्यांची निर्मितीप्रक्रिया कोणकोणत्या लेखनावस्थातून गेली हे जिज्ञासूंना या लेखातून समजू शकेल. भय या ललित लेखाच्या निर्मितीप्रक्रियेतील शैलीच्या स्वरूपाचा शोध यादवांनी अतिशय तटस्थपणे पण तेवढ्याच कलात्मकपणे घेतला आहे.
निर्मितीप्रक्रियेचा हा विचार एका कलावंत साहित्यिकाने केलेला असल्यामुळे तो प्रामुख्याने आत्मानुभूतीवरच जास्त भर देणारा आहे. प्रत्येक साहित्यिकाच्या दृष्टिकोनातून तो यापेक्षा वेगळा असण्याची शक्यता आहे.
-दीपक शेडगे ...Read more
TARUN BHARAT, NAGPURतटस्थ आत्मशोधातून नव्या प्रश्नांना चालना देणारे पुस्तक -‘साहित्याची निर्मितिप्रक्रिया’...
मराठी ग्रामीण साळित्याची चळवळ हिरीरीने उभारणारे डॉ. आनंद यादव हे सशक्त ग्रामीण कथालेखक म्हणूनही सर्वपरिचित आहेत. १९६० नंतरची कथाकाराची जी पिढी नव्याने उदयाला आी. त्या भावकवितंचा दर्जा घेऊन पुढे आलेली जातिवंत ग्रामीण कथा आनंद यादवांचीच त्याबरोबरच साहित्यातील नवनव्या अंगाचा अधिक सूक्ष्म वेध घेणं हे आनंद यादवांच्या चिकित्सक प्रज्ञेचे वैशिष्ट्य आहे. साहित्याची निर्मितीप्रक्रिया हे त्यांचे नवे पुस्तक आहे.
वाङ्मयाचा अभ्यास हा आस्वाद व समीक्षा या दोन दृष्टिकोनामधून सर्वसाधारणपणे केला जातो. मात्र निर्मितिप्रक्रियेच्या अंगांने साहित्याचा अभ्यास का होऊ नये? निर्मिती- आस्वाद- समिक्षा या क्रमवार अध्ययनाने साहित्य क्षेत्रात निश्चितच योग्य बदल घडून येईल. साहित्यिकाच्या प्रतिभेने उपजविलेले अनुभवबीज, त्याचा आविष्कार करताना अनुभवाला स्वत:चेच रूप घेऊ देण्याची त्या कलावंताची ताकद. नवे वाङ्मयप्रकार प्रसावण्याची किंवा अस्तित्वात असलेल्याच वाङ्मय प्रकारामध्ये संवादविरोध- समतोलात्मक नवीनता दर्शविण्याची त्याची क्षमता रसिकांच्या अंगाने घडत जाणाऱ्या साधारणीकरण प्रक्रियेप्रमाणेच कलावंताच्या अंगाने किंवा कवि-श्र मुखाने घडत जाणारी साधारणीकरण प्रक्रिया, या कलावंताच्या निर्मितिप्रक्रियेतील बारकाव्यांबरोबरच, छंदज्ञान, अलंकार, प्रतिमा, प्रतीक याबद्दलचेही नेमके मार्गदर्शन नवनिर्मात्यांना मिळू शकेल. त्यामुळे सैद्धांतिक आकलन वाढत जाऊन, त्याचाही लाभ कलावंत, निर्माता म्हणून त्यांना मिळू शकेल.
साहित्याची निर्मितीप्रक्रिया या ग्रंथात डॉ. आनंद यादवांनी काही तात्त्विक आणि काही उपयोजित या दोन्ही अंगांनी आपले निर्मितीविचार मांडलेले आहेत. ते मांडताना स्वत:च्याच काही कलाकृतीतणून बऱ्याच तटस्थपणे आत्मशोध घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. परंतु एखाद्या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाबरोबरच, त्या पुस्तकातील विषयावरील सर्व प्रथम संपुष्टात येतात असे नाही. उलटपक्षी अनेक प्रश्नांच्या उत्तरामधूनच नीवन प्रश्न देखील उत्पन्न होऊ शकतात. अर्थात, ही त्या लेखकाची मर्यादा समजली जाऊ नये.
कलावंत, आस्वादक आणि कलानुभव
प्रतिभाशक्तीचे व्यवहार हे पूर्णत: नेणिवेच्या पातळीवरच चालत नाहीत. ही प्रतिभाशक्ती ‘अपूर्व-वस्तूनिर्माणक्षेम्’ असली तरी नेणीव व जाणीव या दोहांच्या सुरेख पद्मबंधातून ती कार्य करताना दिसते. प्रतिभावान कलावंत हा लौकिक आयुष्यात त्याला आलेला अनुभव जसाच्या तसा रसिकांच्या समोर ठेवत नाही. बरेच मागे जाता आले, तर भारतीय साहित्यशास्त्रकारांनी या बाबतीत काही निश्चित सिद्धांत सांगितलेले आढळतात.
‘कवीचा लौकिक अनुभव त्याच्या प्रतिभेतून उजळून निघालेला असतो. कवीच व्यक्तिबंध किंवा त्याची ‘परिमितप्रमातृता’ यातून ही प्रतीती निसटते. कवी आपल्या प्रतिभाबलाने आपला अनुभव लौकिक, व्यक्तिगत पातळीवरूनच वर उचलतो व त्याला साधारण्याच्या भूमीवर ठेवता. हे साधारण्या सुद्धा परिमित नसते. कवीचा साधारणीभूत अनुभव सर्व विश्वाला व्यापील एवढा व्यापक होतो.’ (भा.सा.पृ.३६४) किंवा ‘‘दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रसिकाला येणारी प्रतीती ही कविगत प्रतीतीच असते. कवीला आलेला साधारणीभूत प्रत्यय आणि रसिकाला काव्यवाचनाने येणारा साधारणीभूत प्रत्यय एकच म्हणजे एकजातीयच असतात. हाच हृदयसंवाद किंवा वासनासंवाद होय.’’ (भा.सा.पृ.३६५)
म्हणजेच काव्यातील किंवा नाट्यातील अनुभव हा अलौकिक असतो आणि व्यवहारातील अनुभव हा लौकिक असतो, त्यामुळे काव्यातील आणि व्यवहारातील रसिकाला येणाऱ्या अनुभवात कोटिभिन्नता आहे. ‘काव्यास्थात्म ध्वनि:’ ही प्रसिद्ध उपपत्ती कवीपासून तर रसिकांपर्यंत येणाऱ्या प्रतीतीच्या अखंडतेवर आधारलेला आहे. या प्रतीतीसाठी साहितयाची निर्मितिप्रक्रिया कशी हवी? साहित्यातील अनुभव हा आपपरतटस्थ भावाने युक्त असावा. त्यासाठी साहित्य हे व्यंगार्थप्रधान, प्रतीयमान स्वरूप असावयास हवे. ते गणीभूतलक्षकाव्य किंवा चित्रकाव्य नसावे. ध्वनिकाव्य असावे. साहित्यातील शब्दांना वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ यातून व्यंग्यार्थाचे धुमारे फुटले पाहिजेत. अन्यथा ते व्याजकाव्य किंवा कृतक्काव्य होईल. साहित्यिकाला भाषाप्रभू म्हणण्याचे मुख्य कारण हेच की शब्दांच्या सर्व शक्ती तो सीमांत रीतीने साहित्यात वापरु शकतो. या शक्ती साहित्यात वापरल्या गेल्याच पाहिजेत. हे भारतीय साहित्यशास्त्राचे म्हणणे अतिशय मार्मिक आहे. वक्ता व श्रोता किंवा कवी व रसिक यांच्यात अशा साहित्याद्वारे साधारणीकरण प्रक्रिया होऊन आपापरतटस्थ भाव मावळून जीवनाचे जीवनमूल्यात्मक दर्शन, वस्तुनिष्ठपणे घडल्याचा अलौकिक आनंद हे भारतीय साहित्य-शास्त्रानुसार काव्याचे अंतिम प्रयोजन आहे.
तेव्हा, साहित्य निर्मिता प्रक्रिया विचारात घेताना, आस्वादप्रक्रियेशी कर्तव्य नसणे, आस्वाप्रक्रियेला वगळून केवळ निर्मिती प्रक्रियेचाच विचार करणे (पृ.११) हे बरेचसे एकांगी ठरू शकते. त्याचप्रमाणे आस्वादकांच्या आणि कलावंताच्या पातळीत मुलत:च तफावत किंवा भिन्नता निर्माण होते आणि ती अनिवार्य आहे, असे डॉ. आनंद यादव जेव्हा म्हणतात. (पृ.९७) तेव्हा कलावंत कलाकृती आणि आस्वादक या सर्वच संदर्भामध्ये काही प्रश्न नव्याने उपस्थित होतात. व्यावहारिक अनुभवांमधून कलानुभवाकडे होणारा कलावंताचा प्रवास मात्र लेखकाने अतिशय सुक्ष्मपणे दर्शविला आहे.
विकसित साहित्यपरंपरा
कलानुभव आणि साहित्यिक या प्रकरणात साहित्यपरंपरांचाही विचार लेखकाने केला आहे. परंतु मराठीत साहित्यपरंपरा या शब्दाची निश्चित परिभाषा अस्तित्वात नाही. ‘रुची’ मासिकाच्या मे ८८च्या अंकात टी. एस. इलिएट यांच्या १९१९ साली लिहिलेल्या ‘टे्रडिशन अँड इन्डिव्हिज्युअल टॅलेण्ट’ या लेखातील विचारांचा आजही जाणवणारा ताजेपणा आणि त्यातील बारकावे, डॉ. द. भि. कुळकर्णी यांनी वर्णन करून सांगितले आहेत. परंपरा म्हणजे नेमके काय, हे त्या लेखातून (आशय आणि अन्वयार्थ) स्पष्ट होते. केवळ पाश्चात्य तत्त्वज्ञान म्हणून ते टाळले जाऊ शकत नाही. भारतीय साहित्यशास्त्रातील अलौकिकतावादाशी या परंपरेची चपखल सांगड घातली जाऊ शकते. समग्र मानव जातीचे वांशिक संचित आपल्या अंतर्मनात, नेणिवेत दडलेले आहे. आदिमानवाचे रम्यभीषण अनुभव आपल्या अंतर्मनाच्या तळाशी गोठलेले आहेत. एका अर्थाने आपण आदिमानवाच्या प्रतिमाच आहोत. अनेक रुपाने या आदिप्रेरणा आपल्यात वसत असतात. जगातल्या प्रत्येक महाकाव्यात वनवास आढळतो. तो या प्रेरणांमुळेच. म्हणजेच या अनुभवांच्या प्रतिमा नाना रुपात साहित्यकृतीत प्रकटतात. हेच मूलबंध किंवा आदिबंध होत. प्रत्येकालाच शेवटी आपल्या संस्कृतीच्या संदर्भात. आपल्या अंतर्मनात रुजलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची आहेत. यामुळेच देशी व विदेशी संस्कृतीतील एक झुंज संवेदनशील कलावंताला द्यावी लागते. त्यात समन्वय साधला गेला पाहिजे. दोन संस्कृतीच्या समन्वयाचा हा पेच विश्राम बेडेकरांनीही समोर आणला आहे. मन, भाषा, वाक्प्रचार यात रुजलेली ही मुळे आहेत. हा समन्वय साधला गेला नाही, तर साहित्यातील चित्रण अगदी एकांगी होते. परंपरेची पूजा करणे, अन्यथा ती संपूर्ण नाकारणे, हे दोनच मार्ग स्वीकारले जातात.
या पंरपरेचे विकसन होत असताना, नवे पैलू घडत असतानाचा साहित्यातील प्रयोगशीलता निर्माण होते. या प्रयोगशीलतेचा विचार लेखकाने विस्तृतपणे केला आहे. परंतु गाडगीळ, मर्ढेकर, तेंडूलकर, नेमाडे यांच्या बरोबरीने, किंबहुना त्यांच्यापेक्षाही स्वसंस्कृतीतून विलक्षण बळ मिळालेला उमदार लेखक म्हणजे पु. शि. रेगे, डॉ. यांदवांनी त्यांचा उल्लेख या संदर्भात केलेला नाही. साहित्यातील परंपरा विकासातील जाणीवपूर्वक प्रयोगनिर्मिती रेग्यांचीच आढळते. विराट, वैश्विक पार्श्वभूमी निवडून रेगे जे अनुभव चित्रित करतात. ते मानवाच्या हृदयाच्या हृदयातील असतात. केवळ ३९ पत्राच्या ‘सावित्री’त सगळे जागतिक संदर्भ देऊन, शिवाय मातृत्व हे केवळ जीवशास्त्रीयच नाही, हा विलक्षण आशय अतिशय काव्यात्मतेने रेगे व्यक्त करू शकतात. वैश्विक, राष्ट्रीय प्रसंगांचे संदर्भ देऊन - त्या पार्श्वभूमीवर व्यक्तिमनातील अतिशय मूलभूत व आशावादी संवेदना व्यक्त करणे, हा रेग्यांचा यशस्वी प्रयोग आहे. त्यांच्या कादंबऱ्यांची शीर्षकेही या दृष्टीने लक्षणीय आहेत.
स्व-संस्कृती व पाश्चात्य-संस्कृती यातील एक सूक्ष्म आदानप्रदान, विराट व व्यापक दर्शन देऊन काव्यात्मक रीतीने चित्रित करून परंपरेचे विकसन करण्याचे कार्य पुष्कळ प्रमाणात गाडगीळ, मेर्ढेकर यांनीही केले. वाङ्मयीन प्रयोगात नकळतपणा नसतो. जाणीवपूर्वकता, साहित्यिकाचा प्रयत्न यात गृहीत असतो. दुसरी गोष्ट नावीन्य किंवा वैचित्र्याची. जुन्या गोष्टींच्या सरसहा अनुकरणाला प्रयोग म्हटले जात नाही. तिथं पुथगात्मता हवी. रुढिभंजनातून पृथगात्मता निर्माण होते. आणखी एक गोष्ट म्हणजे वाङ्मयीन प्रयोग हा मुख्यत: आणि मूलत: वाङ्मयकृतीच्या अभिव्यक्तीशी निगडित असतो, असे म्हटले जाते. तरीही केवळ अभिव्यक्तिसापेक्ष, वैचित्रहव्यासाने आलेला प्रयोग व्याजप्रयोगच होय. विशिष्ट आशयाला किंवा वास्तवतेला परिपूर्णतेने अभिव्यक्त करण्यासाठी एका वाङ्मयीन अपरिहार्यतेतून निर्माण झालेला प्रयोग हा उचित प्रयोग होय. म्हणजेच वरवर अभिव्यक्तींशी संबंधित वाटणारा प्रयोग, आशय- अभिव्यक्तीच्या मुलसंबंधावर आणारित असतो. म्हणून कलात्मक अपरिहार्यता ही प्रयाकगशीलतेची पहिली सैद्धांतिक अट ठरते.
परंपरेच्या विकासाचा एक टप्पा म्हणून निर्मितिप्रक्रियेच्या दृष्टीने प्रयोगशीलतेला साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले असले तरी इथे आणखी एक प्रश्न समोर उभा राहतो. संपूर्ण साहित्यकृतीचे मूल्यमापन त्याद्वारे होऊ शकते, की साहित्यकृतीत आवश्यक असा एक घटक एवढ्याच अर्थानं त्याचे अस्तित्व कायम राहते.
तात्त्विक समीक्षेनंतर उपयोजित समीचेचाही एक भाग प्रस्तुत पुस्तकात आहे. स्वत:च्याच, भय, नटरंग, गोतावळा या कलाकृतीच्या इतरांकडून करवलेल्या परिशीलनातून ही उपयोजित समीक्षा डॉ. यादवांनी केलेली आढळते. शैलीच्या निर्मितीप्रक्रियेचे स्वरूपही उपयोजित समीक्षेद्वारे लेखकाने सांगितले आहे.
आशय, अनुभव आणि अभिव्यक्ती यातील परस्परसंबंध आणि परसपरविरोध लेखकाने सूक्ष्मपणे दर्शविला आहे. त्यासाठी रेगे, गाडगीळ, ग्रेस यांच्या साहित्याची रूपसौंदर्यासाठी, तर वॉर अॅण्ड पीस, पण लक्षात कोण घेतो? या साहित्यकृतींची आंतरिक गुणात्मक सौंदर्यासाठी लेखकाने समयोचित उदाहरणे घेतलेली आहेत.
‘साहित्याची निर्मितीप्रक्रिया’ या ग्रंथातून आत्मशोध घेताना एका नेमक्या मार्गाने डॉ. आनंद यादव चाचले आहत, हे निश्चित जाणवते. त्यामुळेच या विषयाला इथे पूर्णविराम मिळत नाही. अनेक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या या तटस्थ आत्मशोधातख् आत्ममग्नता कुठेच डोकावत नाही, हेही थोडं नाही.
डॉ. अरुणा ढेरे यांचे ‘अंधाराचे कवडसे’ किंवा प्रभाकर अत्रे यांचे ‘कथा सृजनाची’ या पुस्तकांच्याच कक्षेतला पण थोडा निराळ्या दिशेने जाणारा विचार प्रस्तुत पुस्तकात केला गेला आहे. निर्मिती प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतानाच अनेक वाङ्मयीन संज्ञा, परिभाषा, सामान्य वाचकाच्या आवाक्याबाहेरच्या ठरल्या आहेत. अशा पुस्तकांचा वाचकवर्गही त्यामुळे मर्यादितच राहतो. नवनिर्माते आणि नवअभ्यासक यांच्या दृष्टीने मात्र निर्मिती प्रक्रियेचे रुप असे योजकतेने पुढे येणे, ही लहान गोष्ट नव्हे. त्या दृष्टीने हा ग्रंथ निश्चितच स्वागतार्ह ठरतो.
...Read more