DAINIK LOKMAT 20-01-2002स्त्री आणि पुरुष यांच्यात प्रेम उत्पन्न होते तो क्षण म्हणजे खरा चमत्कार...
मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे : ओशो रजनीश
ओशो रजनीश हे आधुनिक काळातील एक अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्त्व होते. संन्यस्त वृत्तीची त्यांची संकल्पना वेगळी होती; आणिजगातील नामवंत अशा सर्व तत्त्वज्ञानप्रणालींचा गाभा आत्मसात करण्यातील त्यांची गती थक्क करणारी होती, त्या त्या तत्त्वज्ञानाचे पृथगात्म विशेष नेमके पकडून अत्यंत मधुर काव्यात्म शैलीत विशद करीत. अवघड व जटिल कल्पनाही मिया नसरुद्दिन वगैरेंचे समर्पक दृष्टांत देत सुलभपणे स्पष्ट करीत. कृष्ण, शिव, शांडिल्य, नारद, महावीर, येशू ख्रिस्त अशा जागतिक तत्त्वज्ञांच्या बरोबरीने आदिशंकराचार्य, गोरक्षनाथ, कबीर, नानक, रेदास, दरियादास, मीरा वगैरे भारतीय अध्यात्म क्षेत्रातील महानुभाव त्यांनी शेकडो प्रवचने दिली. ध्यान, योग, तंत्र, मंत्र, ताओ, झेन, हसीद, सूफी वगैरे साधन पंरपरांतील गूढ रहस्यांवर यांचवर त्यांनी प्रकाश टाकला. राजकारण, तत्त्वज्ञान मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, लोकसंख्या विस्फोट, पर्यावरण, परमाणू युद्ध, सेक्स वगैरे विषयांच्या अनुरोधानेही अत्यंत तरल, अभिनव विचार त्यांनी प्रकट केले. साडेसहाशेवर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे तीस भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
माझा संदेश म्हणजे रूपांतराची एक किमया :
माझा देश हा एखादा सिद्धांत वा चिंतन या स्वरुपात नाही; तर माझा संदेश म्हणजे रुपांतराची एक किमया, एक विज्ञान आहे’ असे ते म्हणत. ‘झोर्बा द बुद्ध’ अशा आदर्श माणसाची कल्पना ते पुढे मांडतात. झोर्बाप्रमाणे भौतिक जीवनात संपूर्ण आनंद उपभोगण्याची क्षमता व इच्छा असणारा, तसेच गौतम बुद्धाप्रमाणे मूक होऊन ध्यानातही उतरून या व्यापक अफाट विश्वाच्या गाभ्याचा वेध घेणारा, त्याच्याशी एकरूपता अनुभवणारा असा माणूस त्यांना अभिप्रेत आहे. भौतिक व अध्यात्मिक या दोन्ही दृष्टींनी समृद्ध अशा व्यक्तिमत्त्वाचा आग्रह ते धरतात. ती क्षमता प्रत्येक माणसात आहे असे ते मानतात. कुठल्याही धर्मविचारांपेक्षा या कर्मकांडापेक्षा ध्यानाच्या मार्गाने ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो असा विचार ते आग्रहाने मांडतात.
‘द न्यू डॉन’ या इंग्रजी पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने’ साक्षात्काराची देणगी’ या नावाने प्रसिद्ध केला आहे. ‘नवी पहाट’ या नावाने पहिल्या भागाचा अनुवाद करणाऱ्या प्रज्ञा ओक यांनीच या दुसऱ्या भागाचाही अनुवाद केला आहे.
या पुस्तकात ११ सत्रांतील प्रश्नोत्तरांचा समावेश आहे.
हे प्रश्न निरनिराळ्या व्यक्तींनी विचारले. कधी वैयक्तिक, कधी आध्यात्मिक.
पुरुषद्वेशाचा कचरा मनातून बाहेर कसा काढता येईल?
१) स्त्री ही नेहमी पुरुषाच्या बँक शिलकीवर लक्ष ठेवून प्रेम करते; पण पुरुष तसं करीत नाही असं ओशोंचं जे मत आहे, ते मला पटत नाही. माझी आई तर पुरुषांचा द्वेषच करते. माझ्या मनातही पुरुषांबद्दल रागसंतापच आहे. हा पुरुषद्वेषाचा कचरा मनातून बाहेर कसा काढता येईल?– एका तरुणीचा प्रश्न.
२) आपल्या आश्रमात राहताना आपल्या प्रेमाच्या आणि करुणेच्या वर्षावात न्हाऊन निघाल्याने परमानंदाचा अनुभव येतो. पण आपण या आनंदाला लायक नाही, अशीही बोचणी मनाला कुतडत राहते. त्यामुळे निराशा वाटून येते. याबाबतच मला आपली मदत हवी आहे. ती द्याल?– दुसरी एक तरुणी.
३) तुम्ही म्हणता, आपण सगळेच जण आता अंतर्बाह्य ज्ञानी झालोय. पण तसं काही मला जाणवत नाही. तुमचं म्हणणं आम्ही विसरलोय. ही विसरण्याची वेळ बरोबर आहे का?
४) तुमचं लेखन वाचून व तुमच्या सहवासात असताना आपल्यात बदल होतो आहे असे जाणवते. माझ्यावरील आवरणे गळून पडत आहेत. पण हे जाणवणे म्हणजे कल्पनेचा खेळ नव्हे ना? मला जाणवणारी ही प्रगाढ शांतता म्हणजे भ्रम तर नव्हे ना?
ज्ञान आणि अक्कल यात फरक काय?
५) ज्ञान आणि शहाणपणा किंवा अक्कल यात नेमका फरक आहे? (ज्ञान हे बाहेरून मिळतं. अककल किंवा शहाणपणा हा आतल्या गाभ्यातून येतो. ज्ञान दुसरीकडून घेता येतं. अक्कल कुणाकडून घेता येत नाही. कुणाला देता येत नाही.) ज्ञान मिळवलेला माणूस हा अक्कलवान असतोच असे नाही. शहाणा माणूस ज्ञानी असतो. ज्ञानाची धूळ त्याच्या डोळ्यांवर साचलेली नसते. तो आपल्या अस्तित्वासह पूर्णपणे सतत जागा असतो. तो पूर्ण जाणिवेनं आपली कृती करतो. ती कृती शहाणपणाची असते.
६) गेली नऊ वर्षे मी तुमची प्रवचने ऐकतो आहे. पण तरीही तुमच्या माझ्यात असणारं अंतर कमी झालंय असं वाटत नाही. मी काय करू? सगळं विसर्जित करू? भेटू? पुढची पायी कशी गाठू?
७) ज्ञानी होणं, आत्मसाक्षात्कारी होणं आणि जीवनाचा आनंद घेणं यामये काही संबंध आहे का? कोणता? आत्मज्ञानी होणं म्हणजेच जीवनाचा आनंद हे खरं का?
साक्षात्काराची भाषा कोणती?
८) माझ्या मनात मृत्यूचा विचार वरचेवर येतो. माझा मृत्यू. तुमचा मृत्यू. तुमच्या विरहाची कल्पनाही मला सहन होत नाही. माझ्या आयुष्याचं जर काही उद्दिष्ट असेल तर ते तुम्हीच आहात. मी आत्मज्ञानी होऊन तुम्हाला माझं समर्पण करणं ही सुंदर भेट ठरेल. तेव्हा ध्यानधारणेची योग्य पद्धत कोणती?
९) साक्षात्काराची भाषा कोणती?
(साक्षात्काराची भाषाच नाही. साक्षात्कार ही मनाच्या, बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे, आणि भाषा ही मनाच्या आवाक्यातली गोष्ट आहे. साक्षात्कार हा प्रगाढ शांतीतला एक अनुभव आहे. साक्षात्काराचा आवाका इतका मोठा असतो की त्यातला आनंद, कृतार्थता, खरेपणा, प्रेम, करुणा हे सारं वेगवेगळ्या मार्गांनी प्रगट होतंच. मनुष्य प्राण्याच्या अत्युच्च जागरुकतेतला तो एक अनुभव असतो.)
१०) माझ्या अंतर्मनात तुम्ही प्रवेश केलाय असे मला जाणवते. त्याची कल्पना येते हा मला माझा शोध लागल्याचा अनुभव देतो. या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? मी म्हणजे एक व्यर्थ गेलेली व्यक्ती वा गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का?
११) माझ्या मनावर जुने सनातनी, संस्कार आहेत. त्या मागे मी जाऊ की त्यांचा त्याग करू? त्यासाठी केवळ जागरुकता पुरे की आणखी काही करायला हवे?
१२) ध्यानधारणा करताना कधी कधी मला विशालतेचा अनुभव येतो. आपण आपल्यातल्या शांतीमय अवकाशात विहार करीत आहोत असे जाणवते. पण त्या विशालतेने कधी कधी मनावर दडपण आल्यासारखेही वाटते. ती विलक्षण प्रगाढ शांतताही अस्वस्थ करते. कुठल्यातरी कुंपणाशी आपण उभे आहोत, असे वाटत राहते. हे कुंपण खरोखरच असेल तर ते कसले कुंपण म्हणायचे.
१३) तुमच्या संबंधी उलटसुलट बातम्या वृत्तपत्रांत येतात. तुम्हाला बाजारमूल्य आहे असं पत्रकार मानतात. तुम्ही आत्म्याला तृप्त करता. पण आम्ही पत्रकार मन व शरीर तृप्त करणाऱ्या वस्तूंना किंमत देतो, हे बरोबर म्हणायचे का?
१४) मंदिरात प्रवेश केल्यावर मानसिक शांतता लाभते. आजकालच्या उद्योगधंद्याच्या ठिकाणांना सद्यकालीन मंदिरच मानून असं वातावरण तिथं निर्माण करता येईल का?
१५) व्यापाराचं उद्दिष्ट माल विकणं. हा माल अनेकदा लोकांना नको असलेल्या वस्तूंचाही असतो. व्यापाऱ्याच्या वैयक्तिक जीवनातही अनेक विसंगती दिसतात. हे कितपत योग्य आहे?
१६) पत्रकारितेच्या प्रशिक्षणांत आत्मोन्नतीच्या, अध्यात्माच्या गोष्टींना स्थान नसते.
१७) उत्तम पत्रकारितेचं लक्षण कोणतं? सकारात्मक बातम्या? माध्यमांची जबाबदारी काय असावी?
१८) विवाह या गोष्टीपेक्षा आत्म्याचं मीलन ही कल्पना अधिक श्रेयस्कर मानावी का?
१९) निद्रा म्हणजे नेमके काय? विश्रांती घेत असतानाही आपण शरीराबाहेर असतो का?
२०) मनुष्य निर्मित अनुवंशिकतेचा वाटा फार अल्प असतो असे मला वाटते. आईवडिलांच्या विशिष्ट जनुकांपासून भगवान निर्माण होईल का?
२१) भगवान बुद्ध सांगतात, की करुणा व ध्यानधारणा या दोन्ही गोष्टी बरोबर चालायला हव्या. तुमच्याकडे पाहताना मनात करुणा जागी होते आणि अश्रू दाटून येतात. करुणेकडे जायचा मार्ग सांगता येईल का?
२२) तुमच्या सहवासात असताना चैतन्याशी एकरूप झाल्याचा अनुभव येतो. शरीरात अज्ञान शक्तीचे तांडव सुरू असते. विश्वाची जाणीव होते. विश्व म्हणजे आपणच असे वाटते. हा भ्रम तर नव्हे?
असे वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. अशा प्रश्नांची उत्तरे देण्याच्या निमित्ताने ओशोंनी आपल्या प्रवचनामध्ये अनेक मार्मिक, अभिनव भाष्य केलेले आहे. येथे त्या भाष्याची झलक पेश करणेही शक्य नाही. कारण त्यालाही खूप जागा द्यावी लागेल. मूळात पुस्तक वाचणे हायच त्यासाठी उत्तम मार्ग.
मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.
मात्र पहिल्या प्रश्नाचे उत्तर अनेक वाचकांना हवेसे वाटणार म्हणून ते तेवढे येथे देतो. ओशो प्रश्नकत्र्या तरुणीच्या मनातला पुरुषद्वेषाचा कचरा दूर करण्याच्या संदर्भात सांगतात: ‘‘मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. हा नवा माणूस आपल्या भूतकाळातल्या पूर्वग्रहांपासून मुक्त असू शकेल. पुरुषांकडे पाहण्याचीही नवी दृष्टी हवी.
स्त्रीवाचून पुरुष जसा अपूर्ण आहे तशीच स्त्रीसुद्धा पुरुषावाचून अपूर्णच आहे. (आत्मज्ञान झाल्यावर मात्र या दोहोचं अस्तित्व आपल्याला पूर्णत्व देऊ शकेल.) आपला जन्मच मुळी स्त्रीपुरुष मीलनातून होतो; त्यामुळे स्त्रीबरोबर किंवा पुरुषाबरोबर समरस होऊनच, मिळूनच, पूर्णत्व मिळवायला हवे. स्त्री म्हणजे गूढ नव्हे; पुरुष म्हणजेही गूढ नव्हे. चमत्कार नव्हे. ज्या क्षणी या दोघांत प्रेम उत्पन्न होते तो क्षण म्हणजे रखरखीत वाळवंट. कोरडे ठणठणीत. दोघे असणे म्हणजे हजारो फुले फुलणारा वसंत. पुरुषावर प्रेम कसं करायचं हे शिकायलाच हवं. प्रेमाच्या स्पर्शानं स्त्री बहरायला लागते. अन्यथा मिटलेल्या कळीसारखे राहते. फक्त प्रेमातच ती आपल्या पाकळ्या उलगडते. आईच्या पुरुषद्वेष्ट्या व वृत्तीच्या प्रभावातून बाहेर पड. आंधळेपणा टाकून दे. ध्यानधारणा व प्रेम या गोष्टी परस्परपूरक आहेत. प्रमानेच स्त्री किंवा पुरुष यांना पूर्णत्व येते. पुरुषद्वेषाची व स्त्रीद्वेषाची भावना जीवनाला विकृत बनवते– अशा आशयाचे भाष्य ओशो करतात.
मानसशास्त्राचे ते गाढे अभ्यासक, जाणकार होते. जीवन एकांगी, अर्धवट असू नये, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्मळ असावा, कुठल्याही पूर्वग्रहांनी आणि नीतिमूल्यांच्या जुनाट कल्पनांनी तो दुषित झालेला नसावा असा त्यांचा आग्रह होता. ओशोंची विविध विषयांवरची ही भाष्ये वाचणे म्हणजे ढगाळलेल्या वातावरणातून स्वच्छ कोवळ्या सूर्यप्रकाशात प्रवेश करणे. मनावरची अभ्रे दूर करणे. ...Read more