NEWSPAPER REVIEWमाणसाच्या स्वभावाचे विविध पैलू...
‘सामान्यातले असामान्य’ या सुधा मूर्तीलिखित कथासंग्रहात उत्तर कर्नाटकातल्या पार्श्वभूमीवरच्या कथा आहेत. कथांमधील व्यक्तींमध्ये अस्सल कर्नाटकी गुणधर्म असलेले कथांचे नायक-नायिका या कोणी असामान्य नाहीत. पण प्रत्येक माणसत काहीतरी चांगले-असामान्य असते. याच असामान्यत्वाचा शोध लेखिका घेते. असे करताना कधी विनोदी शैलीत व्यक्तिचित्रण केले आहे. उमा कुलकर्णींनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.
लेखिकेने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे उ. कर्नाटकी संस्कृतीचा व भाषेचा थाटच वेगळा आहे. प्रादेशिक वैशिष्ट्य आहे. येथील माणसं वरवर ओबडधोबड वाटली तरी पारदर्शी आहेत. बोलण्यात, वागण्यात रोखठोकपणा जाणवला तरी भावनाशीलता व मृदुताही आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य अधोरेखित होते.
‘बंडल बिंदप्पा’ या नावातच त्याच्या स्वभावाची कल्पना येते. वरवर जाणवणारा उद्धटपणा, पण आतून फणसासारखा गोड रसाळपणा हे कर्नाटकी वैशिष्ट्य बंडल बिंदप्पामध्ये पुरेपूर भरलंय. बिंदप्पाला बंडल या उपाधीची तमा नाही, राईचा पर्वत करणं हा त्याचा स्वभावधर्म. याचा फटका कित्येकांना बसूनही तो कोणाच्या क्रोधाचा बळी ठरत नाही. कारण त्याचं पराकोटीचं कन्नड प्रेम.
कंडक्टर भीमण्णा एक अजब वल्ली. स्वत:च्या संसारापासून अलिप्त, सामान्य परिस्थितीतही सदा आनंदी असणारा भीमण्णा दिलदार आहे. त्यामुळे नोकरी गमवावी लागली तरी मूळ स्वभाव जात नाही. ‘जीवन म्हणजे मूळ कडुनिंबाचं मिश्रण. माझ्यासारख्याचं जीवन म्हणजे रंग नसलेलं चित्र. प्रत्येकाने आपापल्या मर्जीप्रमाणे रंग भरायचे. किरकिरता जीवनाचा कुठलाही रुट सोडून पळून जात नाही.’ हे भीमण्णाचं तत्त्वज्ञान.
अंगडी जयण्णा हा सामान्य पण दिलदार माणूस. अंगडी म्हणजे दुकान लहानपणापासून व्यापाराची आवड असणारा जयण्णा दुकान चालवतो. पण अव्यवहारीपणामुळे बुडितखाती जातो. अखेर आजोबा मळा विकून कर्जफेड करतात. याच्याविरुद्ध आहे चंतुर चामव्व. सामान्य रूप, सामान्य शिक्षण, सामान्य परिस्थितीतील चामव्वा व्यवहाराला चतुर व स्वार्थी. पैसा हेच सर्वस्व मानणारी चामव्वा सतत फायद्या-तोट्याचाच विचार करताना दिसते. प्रेम, ममता या शब्दांशी तिचा काहीही संबंध नाही. वरवर गोड बोलणारी चामव्वा आतून कडवटपणाने युक्त आहे. म्हणूनच कोंडीत पकडून श्रीमंत सासर पटकवते; इतकेच नव्हे तर दागिने, तिजोरी लंपास करते. संसाराच्या आर्थिक नाड्या हातात घेण्यात यशस्वी ठरते.
असूया. तिचं नाव अनसक्का. ही स्त्री अत्यंत मत्सरी. कधीही कुणाच्याही चांगल्या गुणांचे कौतुक न करणारी वृत्ती. म्हणूनच वैभवात असूनही असमाधानी, अतृप्त. पण तिचा हा अवगुण झाकला जातो तो तिच्या एका गुणामुळे. कुणाच्याही, कुठल्याही अडचणीला धावून जाऊन मदत करण्याचा मोठेपणा तिच्यात आहे. मुळात शहाणी असून स्वाभावाला चांगले वळण न लागल्याने स्वभावात आलेला विचित्रपणा आहे.
गंगा एक सुंदर, कलाकुसर निपुण, वाचनाची आवड असणारी सुशिक्षित स्त्री. आपल्यातील या गुणांचा गर्व असलेली गंगा कुणात मिसळत नाही. इतरांवर टीका करणे, त्यांच्यातले न्यून शोधून तिरस्कार करणे, चेष्टा करणे हा स्वभावच बनून गेला. लग्नासाठी प्रत्येक मुलात काही तरी खोड काढण्याच्या सवयीमुळे अखेर लग्नापासून वंचित रहावे लागले. त्याचे पर्यवसान रागीटपणा, चिडचिड यात होते. स्त्रीला तडजोड करावी लागेल हे तिला वेळेवर न उमजल्याने आयुष्याची फरफट अटळ ठरते.
अक्कमा स्वभावत:च परोपकारी. गावातल्या कोणासाठीही कोणत्याही प्रसंगी तिला वडीलकीच्या नात्याने बोलावले जाते. कोणत्याही अडचणीतून खंबीरपणे मार्ग काढू शकणारी अक्कमा निरपेक्ष वृ्तीने लोकांसाठी झटते. पण लोक तिला गृहीत धरतात. कोणत्याही स्वरूपात त्याची परतफेड करण्याचे भानही ठेवत नाहीत. ‘कोणी किती कृतज्ञता ठेवायची हे प्रत्येकाला त्याच्या आईनं जेवढं, जसं शिकवलं असेल त्यावर अवलंबून असतं. ती सगळ्यांना जगणारी गोष्ट नाही.’ हे अक्कमाचं तत्त्वज्ञान तिला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं.
बण्णभट्ट व पार्वती या विजोड जोडप्याचं वर्णन लेखिका नर्मविनोदी शैलीत करते. ‘नॉट मेड फॉर इच अदर’ अशी स्पर्धा आयोजित केली तर पहिला पुरस्कार मिळेल, पार्वती अत्यंत देखणी, हौशी, लिहा-वाचायची आवड, सिनेमाची आवड, स्वच्छतेची आवड असणारी, नटणारी चैत्रगौरीसारखी स्त्री. याउलट बण्णभट्ट तेलकट चेहरा, पुढे आलेलं पोट, जुनकट कपडे, पान खाऊन लाल झालेले, पुढे आलेले दात असं ध्यान. दोघांचे स्वभावही विरुद्ध रसिक पार्वतीला स्वप्नातला राजकुमार भेटलाच नाही. तिच्या इच्छा-आकांक्षा त्याला उमजल्याच नाहीत. तो अलिप्तसाच राहिला. पण पार्वतीच्या मृत्यूनंतर अगदी लवकरच बण्णभट्टही गेला. मनात तिच्याविषयी ओढ असूनही स्वभाववैशिष्ट्यामुळे त्याच्या भावना अव्यक्त राहिल्या. पण तिचं जाणं मात्र तो सहन करू शकला नाही.
काही काही व्यक्ती अत्यंत स्वार्थी असतात. त्यांच्यामध्ये हा अवगुण वारशाने येत असावा. आई-वडिलांच्या शिकवणीमुळेच स्वत:वरची जबाबदारी टाळणे, स्वत:चं सुख, धन यापुढे पती, पुत्र यांचं प्रेमही दुय्यम ठरतं. सावित्री ही अशीच एक स्त्री. पराकोटीचा स्वार्थीपणा हेच त्यांचं असामान्यत्व!
भागव्वा कणखर व्यक्तिमत्त्वाची, अपार आत्मविश्वास असणारी धाडसी, कोणत्याही परिस्थितीत मनाचं संतुलन ढळू न देता निर्णय घेऊ शकणारी स्त्री. बेताच्या परिस्थितीमुळे शिक्षण नाही आणि म्हणूनच बालपणीच लग्नबंधनात अडकलेली भागव्वा परिस्थितीला शरण जात नाही. तिचा नवरा रामण्णा स्वभावाने गरीब असल्याने जमिनीवर दिराचा कब्जा असतो. भागव्वा न घाबरता दिराकडे वाटणी मागते. कर्नाटकातल्या कडेकोट बंदोबस्तात, पुरुषप्रधान समाजाच्या बालेकिल्ल्याला या घटनेने प्रचंड धक्का बसतो. दिराच्या शिव्या, धमक्यांना भीक न घालता किडूकमिडूक विकून ती कोर्टात जाते. केस जिंकून जमीन ताब्यात घेते, संसार सांभाळते. प्रचंड मानसिक बळ, लीडरशिप हे तिचे अंगभूत गुण.
सौदामिनीची कथाच वेगळी. सर्वसाधारण रूपाची दामिनी हुशार, धीट, चांगल्या स्वभावाची मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात दामिनी पदवीधर होऊन बँकेत नोकरी करते. नशिबानं देखणा, डॉक्टर नवरा मिळतो. उत्कर्ष होऊन वैभव प्राप्त होतं. मग नातेवाईकांची, लोकांची, गरजूंची रीघ लागते मदतीसाठी. असं असूनही तिच्या मनात खंत आहे. दानधर्म केला तर तो काळा पैसा, केलेलं पाप फेडण्यासाठी देतात ही भावना. नाही दिले पैसे तर पेपरातून टीकास्त्र. लोकांची ही वृत्ती तिला व्यथित करते.
फणीवेणी व नागवेणी या जुळ्या बहिणी. फणी चुणचुणीत, बुद्धिमान, सर्व विषयांत पहिला नंबर. म्हणून ‘फस्र्ट रँक फणी’. तर नागू सावळी, काटकुळी, सर्वसामान्य. त्यामुळे दोघींची नकळत तुलना होईल. दोघींमुळे स्नेह नव्हता. नागू अबोल. ती सामान्य स्थळी पडली पण सासरी कौतुक होतं. उलट फणीचं रूप, गुण, बुद्धिमत्ता हे अवगुण ठरले. नवरा अतिबुद्धिमान, गर्विष्ठ म्हणून फणीला दुय्यम मानून तिची अवहेलना होत राहिली. फणीची ‘ईर्षा’ नाहीशी होऊन तिचं मन कोमेजून जातं. पीएच. डी. करायची इच्छा अपूर्ण राहते. करिअर नाही, स्वत:चं अस्तित्वच उरत नाही. गुणी फणीच्या नशिबी असं जिणं येतं.
शीनप्पा-सीताबाई हे मेड फॉर इच अदर जोडपं. दोघांनाही पैसा हेच सर्वस्व. त्यांच्या जीवनाची मूल्येच वेगळी. दोघंही गर्भश्रीमंत त्यामुळे फक्त बरोबरीच्या लोकांशीच संबंध ठेवणे, त्यांचे आदरातिथ्य करणे ही वृत्ती. गरिबांच्या वेदना, दु:खाशी त्यांचा काहीच संबंध नाही. पण कधी कधी काळाचा महिमा अगाध असतो. सून व मुलगी यांच्या उधळपट्टीमुळे, स्वार्थी वृत्तीमुळे संपत्तीस ओहोटी लागते आणि काळाच्या प्रवाहात सारे सामान्य होऊन जाते.
सरसक्का सुंदर आहे पण बेताचं शिक्षण, बेताची परिस्थिती यामुळे रेड्यासारख्या श्रीपादशी विवाह होतो. श्रीमंत घराणं पण श्रीपाद अवगुणी, बाहेरख्याली असल्याने रोगग्रस्त असतो. फसवणूक झालेली सरसक्का वर्षभरातच विधवा होते आणि अपशकुनी म्हणून अवमानित होते. पण कोणाचं भाग्य कसं पालटेल ते कल्पनेच्या पलीकडचं असतं. तिचे कुटुंब बद्रीकेदारला यात्रेला जाते. तिथं लक्ष्मणझुल्यावर योगयोगाने सरसक्का व दीर श्रीहरी नदीत फेकले जातात. त्यांचा पत्ता लागत नाही पण ते सुदैवाने वाचतात. दूर निघून जाऊन विवाह करतात, सुखी होतात.
जीवण्णा एक गर्भश्रीमंत माणूस, पण त्याच्या बाह्यरूपावरून व चिकट स्वभावावरून याची कल्पना येणेही कठीण. भिक्षुकासारखे कपडे, जेवणातही काटकसर. त्याच्या या स्वभावामुळे मुलगा व मुलगी दुरावले पण अर्धांगवायू व परावलंबित याने चिकट जीवण्णाला चांगलाच धडा शिकला. अंबक्का सर्वसामान्य पण सुगरण, स्वयंपाकघरात रमणारी गृहिणी. तिचा सुशिक्षित पती यामुळे कंटाळलेला पण तिच्या आजारपणामुळे तिचं महत्त्व पटतं.
ताराबाईला भांडण अतिशय प्रिय. त्यासाठी तिला कोणत्याही प्रसंगाची गरज वाटत नाही. भांडण समोर आलं की तिचं व्यक्तिमत्त्व वेगळं होतं. उत्साह द्विगुणित होतो. समोरच्याला हिणवण्यात, नामोहरम करण्यात तिचा हात कुणीही धरणार नाही पण भांडण संपल्यावर मन शांत होऊन त्याचा मागमूसही राहत नाही. अशा शब्दात लेखिका तिचं वर्णन करते.
सीमा संधिसाधू, चतुर आहे. कुणी डोनेशन मागायला आलं तर सरळ सासूच्या हातात अधिकार आहेत म्हणून सुटका करून घेते. डब्बावाली नलिनी एक अजब व्यक्तिमत्त्व. कार्याला जायला जमलं नाही तर रिकामा डबा पाठवून देऊन कोणाकडून मागवते. वरकरणी हे विचित्र वायतं पण तिचं मन निर्मळ आहे, हेतू उदात्त आहे, डबा आणणाऱ्याशी बोलता येतं. स्वत: डबा पोचवायला, परत करायला जाते तेव्हा त्यांच्याशी बोलून त्यांची दु:खं हलकी करता येतात. सांत्वन करता येतं. मन मोकळं होतं, हा चांगला हेतू त्यामागे असतो. याची किती जणांना जाणीव असते?
माणसामध्ये असलेले गुण-अवगुण हेरून ते शब्दबद्ध करताना लेखिकेने कुठेही वाईट हेतू किंवा अढी ठेवलेली नाही. माणसाच्या स्वभावाचे हे विविध पैलू उलगडणे एवढाच हेतू. माणूस कोणत्याही प्रांतातला, प्रदेशातला असो, त्याची भाषा, संस्कृती यात वेगळेपणा असो पण माणूस म्हणून तो अंतर्बाह्य फार वेगळा नसतो. त्याच्यामधील सत्-असत्, स्वार्थ, परोपकार, कठोरपणा, मृदुता, प्रेम, स्नेह, त्वेष, मत्सर, हेवा हे सारेच सर्वांच्या ठायी असतेच. अशा विविध गुणावगुणांनी युक्त माणसावर आपण प्रेम करतो. त्याच्यामधल्या अवगुणाकडे सहानुभूतीने पाहून त्याला जवळ करतो. मग त्यातच माणुसकीचं दर्शन घडतं. लेखिकेच्या अशा उदार दृष्टिकोनातून हे साध्य झालेलं दिसतं.
...Read more