DAINIK SAKAL 15-01-1995जीवनातील विसंगती गंभीरपणे मांडणारे लघुनिबंधसंग्रह…
मेहता प्रकाशनाने अलीकडे कै. वि. स. खांडेकर यांच्या दुर्मिळ झालेल्या साहित्याचे देखणे पुर्नमुद्रण करून अभ्यासकांची चांगली सोय केली आहे. ‘सायंकाल’ (१९३९) आणि ‘अविनाश’ (१९४१) या दोन लघुनिबंधसंग्रहाच्याया नव्या आवृत्त्या म्हणूनच स्वागतार्ह वाटतात. दोन्हीलाही लेखकाच्या उपयुक्त प्रस्तावना आहेत. ‘सायंकाल’मध्ये त्यांच्या १८, तर ‘अविनाश’मध्ये १४ लघुनिबंधांचा समावेश आहे. दोन्हींवर चंद्रमोहन कुलकर्णीची सुंदर मुखपृष्ठे आहेत.
‘लघुनिबंध’ हा वाङ्मयप्रकार आज नाट्यछटेप्रमाणेच अस्तंगत झाला असला, तरी ललित निबंध या नव्या स्वरूपात तो बहरताना दिसतो. १९३० ते ४० या दशकात त्याला बहर आला होता. कै. फडके यांनी इंग्रजीतील रॉबर्ट लिंड, ए. जी. गार्डनर, ल्यूकस चेस्टरटन, लॅम्ब वगैरे लघुनिबंधकारांचे ‘पर्सनल एसेज’ वाचून मराठीतही असे सुटसुटीत व खेळकर लघुनिबंधक का लिहिले जाऊ नयेत, असे वाटले आणि त्यांनी १९२५ मध्ये ‘रत्नाकर’ मासिकात आपली ‘सुहास्य’ ही पहिली गुजगोष्ट लिहिली. त्यानंतर कै. वि. स. खांडेकर आणि अनंत काणेकर यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण लघुनिबंध लिहिले. खांडेकरांनी ‘वैनतेय’ या सावंडवाडीतून निघणाऱ्या मासिकातून आपले लघुनिबंध लिहिले, त्यामुळे तेच मराठी लघुनिबंधाचे जनक आहेत, असा एक वाद आनंद यादव यांनी फडके यांच्या हयातीतच निर्माण केला होता. फडके यांनी ‘मीच लघुनिबंधाचा जनक’ असे त्याला उत्तरही दिले होते. वाद निरर्थक होता. कारण फडके आणि खांडेकरांच्या लघुनिबंधात काहीही साम्य नव्हते, हे आज खांडेकरांच्या प्रस्तुतचे दोन निबंधसंग्रह वाचून जाणवते. फडके यांना अभिप्रेत असलेल्या प्रकारचा आत्माविष्कार खांडेकरांना अभिप्रेत नाही. काणेकरांप्रमाणेच वैचारिकता हाच त्यांचा विशेष आहे. वाचकांना विश्वासात घेऊन आपली सुख-दु:खे त्यांच्या कानात सांगणे, (‘गुजगोष्टी’ हे अर्थपूर्ण नाव फडके यांनी दिले होते व ते योग्य होते.) क्षुल्लक विषयाची एक वेगळी बाजू त्याच्या दृष्टोत्पत्तीस आणून देणे, त्याला तशाच प्रसन्न, मुलायम भाषेची व शैलीची जोड देणे, हे काणेकर व खांडेकर यांना जमले नाही. कारण ती त्यांची प्रकृतीच नव्हती. त्यापेक्षा विषयाच्या निमित्ताने एखादा चमकदार विचार मांडणे, वाचकांना धक्का देणे, हे काणेकरांचे वैशिष्ट्य होते. खांडेकरांनी ‘अविनाश’च्या प्रस्तावनेत त्याची तुलना वाऱ्यावर डोलणाऱ्या रंगिबेरंगी फुग्यांशी केली आहे, त्यातील वेगळी भाषा हेही विशेष त्यांनी सांगितले आहेत. पण त्यांचे लघुनिबंध वैचारिकतेच्या अंगानेच अधिक जातात. त्याबरोबरच लघुनिबंधाच्या प्रकृतीशी मिळती-जुळती भाषा त्यांच्याजवळ नसल्याने उपमा, रूपक, उप्रेक्षा इत्यादींनी सजलेली नेहमीची त्यांची भाषाच कृत्रिमपणे ते इथेही वापरतात आणि या वाङ्मयाला ती काहीशी ओबड-धोबड व विसंगतही वाटते.
काणेकर एखाद्या चमकदार विचार चटकन सांगून मोकळे होतात, असेही खांडेकर करीत नाहीत. फडके परंपरेतील शेवटचे लघुनिबंधकार म्हणजे कै. ना. मा. संत हेच होत, त्यामुळे खांडेकरांचे समाजिक चिंतन, त्याचे विचार हे लेखकाच्या आत्मविष्कारापेक्षा या लघुनिबंधात अधिक महत्त्वाची जागा घेतात. आज नव्याने लिहिला जाणारा ललित निबंधही वैचारिकतेकडे अधिक झुकताना दिसतो व त्यात संशोधन, चिंतन, मनन, निरीक्षण इत्यादींना प्राधान्य आलेले दिसते. आजचा ललित निबंध हा आठवण, प्रवास, आत्मचरित्र, भाववृत्ती, कथा इत्यादी अनेक वाङ्मय प्रकारांशी सलगी करताना दिसतो. (उदाहरणार्थ : दुर्गाबाई व इरावतीबार्इंचे ललितनिबंध) त्यामुळेच ललितलेख असेही त्याचे एक नवे नामकरण काही जण करतात, त्यामुळे जुन्या लघुनिबंधातून नवा ललितानिबंध उत्क्रांत झाला, असे खांडेकर म्हणतात ते बरोबर वाटत नाही. गुजगोष्ट किंवा लघुनिबंध किंवा ललितनिबंध आणि ललितलेख हे प्रकार वेगवेगळेच आहेत. एकातून दुसरा उत्क्रांत झाला, हे खरे नाही. खांडेकरांच्या या दोन संग्रहातील लघुनिबंधात तत्त्वदर्शन, भावविहार व कल्पनाविलास यांना प्राधान्य आहे. त्यात पहिल्याला अधिक प्राधान्य आहे.
‘सायंकाल’मध्ये बाळपणीचा काळ सुखाचा, विरह, सुभाषिते, माझे आवडते लेखक, सायंकाल, आणि ‘आविनाश’मधील परीक्षक, सारेच गुलाम इत्यादी लघुनिबंध काहीसे चाकोरीतले आहेत म्हणजे त्यांच्या अंतरंगाची त्यांच्या शीर्षकावरून कल्पना येते व ती सहसा खोटी ठरत नाही. वाचकांना विषयाची अपरिचित बाजू दाखविणे, त्यांना सहसा जमत नाही.
‘सायंकाल’मधील चष्म्यावाचून काढलेला ‘एक तास’ त्यांना आंधळ्याच्या अनुभवाचे दु:ख पटवून देतो. ‘अशोकाची फुले’ त्यांना स्वप्न आणि सत्य यांतील फरक जाणवून देतात. खिस्त, गांधी, गिब्रान यांच्या तत्त्वज्ञानापर्यंत नेतात. ‘पुस्तकातील खुणा’ वरून त्यांना वाटते की पुस्तकातल्या खुणा पुस्तकातच राहतात. ज्यातल्या खुणा आपण विसरत नाही असा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे अनुभवलेले जीवन, हाच नाही का ? असे ते विचारतात. ‘हरवलेले कागद’, ‘हरवली म्हणून सापडली’ या गुजगोष्टीची आठवण करून देतो. आपण सुंदर आहोत, विख्यात आहोत, उदार आहोत, सभ्य आहोत असे भासवण्याचा प्रयत्न ही मनुष्याची प्रदर्शनाची हौस वाटते तितकी हास्यास्पद नाही, असे ते ‘प्रदर्शन’मध्ये म्हणतात. प्रौढत्वी शैशव जपण्याचा विचार ते ‘एक अपघाता’त मांडतात. काणेकरांच्या ‘दोन मेणबत्त्या’ हा गाजलेला लघुनिबंध वाचून उंदरानी कुरतडलेल्या व आयुष्य फुकट गेलेल्या दुसऱ्या मेणबत्तीची कैफियत त्यांना मांडावीशी वाटते.
‘अविनाश’मध्येही साध्या प्रसंगातून तत्त्वविचाराकडे जाण्याची खांडेकरांची लकब दिसते. भूत, भविष्यकाळापेक्षा वर्तमानकालच जीवनाचा आनंद देत असतो. (पुढे-पुढे), आपल्याला ओळखणाऱ्या व्यक्तींत आपल्याविषयी एकमत कुठे असते ? (दोन पत्रे), हे निबंध विषयाची दुसरी बाजू मांडतात. ‘आंब्याचा मोहर’सारखा एखादा लघुनिबंध अखेर अकारणच फार गंभीर होतो. विचार कितीही प्रभावी असला तरी त्याला पंख नसतात. त्याला नेहमी जमिनीलाच चिटकून राहावे लागते, म्हणून माणसाने अविचारी झाले पाहिजे, हा ‘अकल्पित संदेश’ मधील विचार चमकदार असला तरी गंभीरपणेच व्यक्त होतो. ‘अहं ब्रहास्मि’पेक्षा ‘मी आहे की’ हेच शब्द आज सामान्य मनुष्याच्या आयुष्याचे समाधान करू शकतात (मी आहे की), हा विचार किंवा ‘चहा, गप्पा आणि मुले’ ही मर्यादित असतात तोपर्यंत सुखकारक असतात... पत्रात या तिन्हीचेही फायदे/तोटे एकवटलेले असतात ! हे भाष्य त्यांच्या लघुनिबंधांची प्रकृती स्पष्ट करते. अशी विरोधाभासात्मक रचना हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
खांडेकरांचा लघुनिबंध हा फडके यांच्याप्रमाणे निव्वळ आत्माविष्काराच्या हेतूने लिहिलेली गुजगोष्ट नाही. त्यांची प्रकृती वैचारिक आहे. साध्यासुध्या प्रसंगातून जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान त्यांना सुचलं. काणेकरांप्रमाणे समाजाला धक्का देऊन विचार मांडणे, ही त्यांची वृत्ती नाही. काणेकरांचे गणूकाका सनातन प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्यामते लेखकांच्या मतांच्या संघर्षातून काणेकरांच्या लघुनिबंधात नवविचारांच्या ठिणग्या उडतात. खांडेकर त्यांच्या मानाने सौम्य प्रकृतीचे आहेत. आपल्याला जे अनुभव कथेत वापरता येणे शक्य वाटले नाही, जे आपण लघुनिबंधात वा थोड्या जागेत ‘वैनतेया’तून मांडण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे. केवळ कलाविलास म्हणूनही त्यांनी ते लिहिले नाहीत, त्यामुळे त्यात फडक्यांच्या गुजगोष्टीतले --- शोधू पाहणाऱ्यांची निराशाच होणे शक्यच, पण खांडेकरांसारख्या एका चिंतनशील सतप्रवृत्त आणि पापभीरू आणि समाजाच्या उपेक्षित वर्गाबद्दल अपार कणव वाटणाऱ्या लेखकाला जीवनातील जी विसंगती जाणवली, ती त्याने या दोन (व अन्य) लघुनिबंध संग्रहातून काहीशी गंभीरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या लघुनिबंधांपेक्षा या दोन संग्रहाला जोडलेल्या त्यांच्या प्रस्तावनाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व या वाङ्मयप्रकारावर अधिक प्रकाश पाडतात.
...Read more