DAINIK LOKMAT 21-08-2011भाषाप्रदूषण टाळण्यासाठी शब्दचर्चा...
मराठी शब्द, त्यांची व्युत्पत्ती, त्याचा अर्थ, शुध्दाशुध्दता याविषयी चर्चा करणारे डॉ. म. बा. कुलकर्णी यांचे `शब्दचर्चा’ हे पुस्तक मेहता प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानिमित्त..
अनेक शब्द आल्या बोलण्या-लिहिण्यात असतात, पण त्यांचा नेमका अर्थ आपल्याला माहीत नसतो. कित्येक शब्दांच्या अर्थाबद्दल आपण कधी विचारच केलेला नसतो. योग्य समजुतीअभावी भाषेचा चुकीच्या पध्दतीने वापर आपण करीत असतो..
सहा-सात वर्षांपूर्वी जेव्हा `लोकमत’च्या संपादकांच्या सूचनेवरुन मी `शब्दचर्चा लिहायला सुरुवात केली, तेव्हा मराठी भाषेत ज्यांच्या स्वरुपाबद्दल चर्चा करावी, असे हजाराहून अधिक शब्द असू शकतील, असे मला प्रारंभी तरी मुळीच वाटले नव्हते. पण आता `शब्दचर्चा’ हे हजार शब्दांची चर्चा समाविष्ट झालेले पुस्तक प्रकाशित झाल्यावर मात्र, `अरे अजून काही शब्द बाकी राहिलेले आहेतच, असेच मला वाटते आहे!’
अशी शब्दचर्चा का करावी लागते? तेच आज इथे `लोकमत’मधील शब्दचर्चा या सदराचा उपसंहार म्हणून सांगायचे आहे!
भाषेत `अशुध्द’ असे काही नसते, हे काही अशी खरे असले, तरी कोणतीही भाषा जर ज्ञान संक्रमणासाठी वापरायची असेल, तर तिचे एक `प्रमाण’ रुप मानावे लागते आणि त्या रुपात फार वेगाने बदल होऊ नयेत, यासाठी हे रुप मुद्रित व्यवहारात सांभाळावेही लागते. प्रमाण मराठी भाषेतील कित्येक शब्दांचे रुप, अर्थ, याबद्दल आवश्यक त्या योग्य समजुतीच्या अभावी अनेक लेखक, विशेषत: पत्रकार ही काळजी घेताना दिसत नाहीत; ही खेदाची गोष्ट आहे. वृत्तपत्रातील मजकूर वाचकांच्या दृष्टीसमोर नित्य येत असल्याने, भाषेवर त्याचा मोठाच प्रभाव पडत असतो व त्यामुळे भाषाप्रदूषण मोठ्या प्रमाणात घडत असते. हे प्रदषण टाळायला हवे आहे. मी (रोज एका शब्दाबद्दल) शब्दचर्चा लिहीत होतो, तेव्हा माझ्या लक्षात येत होते की, वृत्तपत्रांमधून अनेक चुकीचे शब्द भाषेत रुढ होऊ लागलेले आहेत. (योग्य शब्द कंसात) उदाहरणार्थ अबालवृध्द (आबालवृध्द), अधुनिक (आधुनिक), आतंकवादी (आतंककारी), दुरावस्था (दुरवस्था), सहस्त्र (सहस्त्र)... वगैरे.
शब्द वापरताना त्यांची व्याकरणिक रचना लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे अयोग्य रुपे सर्रास वापरली जातात. उदाहरणार्थ घेवून (घेऊन), ठेऊन (ठेवून), रहाणे, राहणे (राहाणे), पहाणे, पाहणे (पाहाणे).
हृस्व-दीर्घातील बदलाने मराठीत अर्थबदल होत नाही, असे प्रतिपादन अलीकडे आग्रहाने केले जाते आहे.. पण अनेक शब्दांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती दिसते. उदाहरणार्थ- सलिल, सलील. मिलन, मीलन.
विशेष म्हणजे अशी ही उदाहरणे `संस्कृत’ भाषेतली आहेत, अशी त्यांची विल्हेवाट लावणारे आणि `भाषिक’ सारखे शब्द त्यासाठी बदलून त्याला `भाषक’ असे रुप देणारे अभ्यासक `तज्ञ’ या मराठी शब्दाला नाकारुन संस्कृत तज्ज्ञ या शब्दाचा पुरस्कार करीत असतात!
शब्दांचे अर्थ हे यादृच्छिक असतात,म्हणजेच ते (arbitrary) पध्दतीने त्यांना प्राप्त झालेले असतात, असे मानले जाते; पण हे फार थोड्या व विशेषत: भाषेतील काही मूलभूत शब्दांबद्दलच खरे दिसते. कारण आपल्या मराठी भाषेत अनेक शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अन्य काही शब्दांच्या संबंधातून त्यांना प्राप्त झालेले आहेत. उदा. गुण्या, गोपालमुहूर्त, ग्राम्य, कर्णधार-अस्मिता वगैरे.
काही सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक परंपरांचा आधार असलेले आणि त्यांतून अर्थ स्पष्ट होणारे अनेक शब्द आपल्या भाषेत आहेत. उदाहरणार्थ- दंपती, दक्षिणा, घटस्फोट, घंगाळ, अनसूया, गवसणे, वगैरे. या परंपरांचा बोध झाला तर या शब्दांचा वापर आपण अधिक जाणकारीने करु शकू.
अनेक शब्द आपल्या बोलण्या-लिहिण्यात असतात, पण त्यांचा नेमका अर्थ काय म्हणून प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर माहीत नसते! उदाहरणार्थ- धंदा, व्यवसाय, अमावस्या, ऐरण- वगैरे.
कित्येक शब्दांच्या अर्थाबद्दल आपण कधी विचारच केलेला नसतो. उदाहरणार्थ- अरण्यरुदन, गंधमुक्ती, खांदेपालट, प्रपंच, आकाश, शरीर वगैरे.
शब्दांच्या काही जोड्या आपल्या भाषेत अश्या आहेत की ज्या जोडीतील दोनही शब्द भिन्नार्थक असूनही एकमेकांऐवजी वापरले जात आहेत! उदाहरणार्थ व्यग्र-व्यस्त, उपहार-उपाहार, वादातीत-वादग्रस्त, आव्हान-आवाहन, चतुरस्त्र-चतुरस्त्र विरोधाभास,गर्हणीय, अशासारखे काही शब्द तर त्यांचा अर्थ लक्षात न घेताच अनेक ज्येष्ठ पत्रकारही सतत वापरीत आलेले आहेत! वास्तविक हे शब्द संदर्भानुसार अतर्विरोध, स्तवनीय-स्तुत्य असे हवेत.
वर जे अनेक शब्द उदाहरणादाखल नोंदले आहेत, त्या सर्वांची तर चर्चा शब्दचर्चेत आहेच. पण या चर्चेत अनेक शब्दांच्या नेमक्या अर्थाबद्दलची, किंवा ते ते शब्द नेमके कसे लिहिणे/छापणे योग्य होईल याबद्दलची पृच्छा, अनेक वाचकांनी व विशेषत: पत्रकारांनी केलेली होती, आणि त्यामुळे त्या त्या शब्दांबद्दल विचार केलेला आहे.
यापैकी अनेक शब्दांचे मूळ मराठीची आजी असलेल्या संस्कृत भाषेत मिळत होते. त्यानुसार शब्द स्पष्ट करीत असताना अलीकडच्या काही भाषाभिमानी मराठी भाषिक अभ्यासकांच्या मनातील एक शंका-अथवा आक्षेप जाणवत असे. या अभ्यासकांचे म्हणणे असे असते की मराठीने संस्कृतचा हा आधार सोडून दिला पाहिजे!
संस्कृतबद्दलचा असा तिरस्कार बाळगण्याने मराठी भाषेचे नुकसान होण्याचीच अधिक शक्यता आहे. मराठी भाषेतून संस्कृतोत्पन्न शब्द काढून टाकायचे ठरविले, तर सत्तर टक्क्यांच्या वर शब्द सोडून द्यावे लागतील! तसे करणे हा आत्मघातच होईल. जे जे शब्द `संस्कृत’ आहेत असे म्हटले जाते, ते जर मराठीत वापरात आहेत,तर ते मराठीच झालेले नाहीत काय? कोणतीही भाषा ही तिच्या व्याकरणिक प्रत्ययांच्या द्वारे केल्या जाणाऱ्या स्वतंत्र वाक्यरचनेने इतर भाषांपासून वेगळी असल्याचे लक्षात येत असते. आपण अनेक इंग्रजी शब्द या पध्दतीने मराठीत समाविष्ट केलेले आहेतच की! `स्टडीरुममधल्या टेबलावरील लँपच्या उजेडात दुसऱ्या दिवसाच्या लेक्चरची तयारी करणारे प्रोफेसर’ ही रचना मराठीच तर असते! कारण या इंग्रजी शब्दांना आपण मराठी प्रत्यय जोडलेले आहेत. मराठीला समृध्द करीत राहणाऱ्या व विशेषत: आपल्या नवनिर्माणक्षमतेचा वारसा मराठीला देणाऱ्या संस्कृतबद्दल दुजाभाव कशाला हवा?
मराठी `शुध्द’ लेखनातील काही ढोबळ नियमांचे पालन टाळणेच कसे इष्ट आहे, हेही ही शब्दचर्चा करताना जाणवलेले आहे. शुध्दलेखन म्हणजे काय? ती भाषेतली एक शिस्त असते. त्या शिस्तीमागील प्रयोजन लक्षात घ्यायला हवे की नको? - असेही काही प्रश्न या शब्दचर्चेत आलेले आहेत. परंतु ही शब्दचर्चा म्हणजे केवळ शुध्दलेखनाची अथवा व्याकरणाचीच चर्चा नाही. शब्दाची व्युत्पत्ती, त्याचे लिखित रुप, अर्थक्षेत्र व त्या क्षेत्रात कालौघात झालेला बदल इत्यादी अनेक दृष्टिकोनांतून ही चर्चा, त्या त्या वेळी जाणवलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने मी केलेली आहे. `लोकमत’ने त्यासाठी मला प्रेरित केले होते त्यासाठी लोकमतचे आभार.
भाषाप्रदूषण टाळण्यासाठी ही शब्दचर्चा उपयुक्त ठरावी! ...Read more