NEWSPAPER REVIEWठसठशीत नायिका आणि त्यांच्या जीवनातील मूल्यसंघर्ष चितारणाऱ्या चित्तरकथा...
माधवी देसाई यांच्या अकरा कथांचा समावेश `शुक्रचांदणी` या पुस्तकात करण्यात आला आहे. हा त्यांचा सहावा कथासंग्रह. ठसठशीत नायिकांच्या व्यक्तिरेखा हे कथांचे वैशिष्ट्य.
`अधांतर` या थेची नायिका आहे एक महिला पोलीस इन्स्पेक्टर. नीलांबरी.
अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यातील हवालदार रावराणे यांची एकुलती एक कन्या नीलांबरी. वडिलांप्रमाणेच थोराड, धिप्पाड, काळीसावळी. ती बी.ए. झाल्यावर पोलीस इन्स्पेक्टर होण्याचे ठरवते. प्रशिक्षण काळात खाकी युनिफॉर्म आणि इतरांवर अधिकार गाजवण्याची ईर्षा यांचा संचार जणू तिच्या अंगात होतो. डिस्टिंक्शन घेऊन ती ग्रुपमध्ये पहिली येते. हवालदार बापाला अस्मान ठेंगणे होते. ठाणे जिल्ह्यातील एका महिला पोलीस स्टेशनवर तिची नेमणूक होते. हाताखालच्या अधिकाऱ्यांवर जरब बसवते. गुन्हेगारांना ती कर्दनकाळ वाटते. त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवून काढायचे काम मात्र ती असिस्टंटवर सोपवते. लग्नाचा बेत ती लांबणीवर टाकत राहते. तिचे वडील घोकत राहतात.``लेकीचं लगीन? चिल्लर गोष्ट. आधी डी.वाय.एस.पी. तर होऊ द्या.`` आई सुमन मात्र तिला सांगत राहते,``लग्न करून टाक पोरी. हे असं राहणं खरं नव्हे.`` एकदा चोरीच्या आरोपावरून एका आदिवासी कुटुंबातील चौघांना पकडून आणले जाते. ``माय, पोरं घरी उपाशी. जन्मात कधी चोरी केली न्हाय. तू बाईमाणूस दया कर. सोडून दे. ही लछमी पोटुशी हाय. बायामान्स आम्ही.`` त्या आदिवासीपैंकी म्हातारी गयावया करीत होती. पण नीलांबरीचा पोलिसी खाक्या. ``बायामाणसं? एवढं का कौतुक ह्या बाईपणाचं? कुणासाठी? चोरा करताना कुठे गेलं होतं बाईपण? घरी पोरं आहेत? आणि ही पोटुशी. हाच खरा उपयोग बाईपणाचा? की आणखीही काही?`` असं म्हणत ती कातडी पट्ट्याचे वार त्या दोन बायांवर सपासप करत राहते. म्हातारी खाली कोसळते. सुनेची साडी रक्तानं माखते. नीलांबरीचे असिस्टंट सांगतात,``मॅडम, आवरा स्वत:ला हे महिला पोलीस ठाणे आहे... आदिवासी... काही झालं तर पेपरवाले आणि सोशल वर्कर तुटून पडतील.`` त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असते. पण अंगावर वळ. कायद्याने गुन्हा . लछमी दम सोडते.
...पहाटे पहाटेच तिच्या बरोबरच कोर्सला असणारा आणि जवळच्याच पोलीस ठाण्यावर इन्स्पेक्टर असलेला जगताप आपल्या पत्नीबरोबर येतो आणि सांगतो,``मॅडम, लछमी, तिची सासू आमच्याच बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये राहतात. गरीब माणसं. चोरी करणंच शक्य नाही. त्यांना जामीनावर सोडा...``
-आणि नीलांबरी म्हणते.``लछमी? शी इज नो मोअर. मी मारलं तिला. नाऊ मिस्टर जगताप, अॅरेस्ट मी.``
अशी नाट्यपूर्ण तरीही भावस्पर्शी कथानकाची गुंफण करण्यात कथाकार माधवी देसाई तरबेज आहेत. हवालदार महत्त्वाकांक्षी बाप, त्याची तशीच अधिकार गाजविणारी लाडकी लेक, पोलिसी खाक्याचा अभिमान, अहंकार, स्त्री म्हणून सहकाऱ्याने डिवचणे, त्याचा राग गरीब आदिवासी स्त्रीवर काढणे, मारहाणीनं त्या स्त्रीचा मृत्यू घडणे. त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याची असिस्टंटची सूचना धुडकावून लावणे, आणि ते आदिवासी कुटुंब नेमके त्या परिचीत सहकारी पोलीस इन्स्पेक्टरच्या आऊटहाऊसमध्ये राहणारे निघणे आणि त्यानेच जामीनासाठी नीलांबरीकडे येणे -असे सगळे आदर्शवादी धागेदोरे गुंफत आपल्या मेलोड्रामिक कथावस्तूची रंगत वाढवत नेणे ही माधवी देसाई यांची हातोटी वाचकांच्या परिचयाची आहे.
घराण्याचा अभिमान आणि कलावंताचे उत्तरदायित्व यांच्यातील संघर्ष `शुक्रचांदणी` या कथेत दिसतो. राजगढचे राजगायक रहेमखां आपल्या तिन्ही मुलांना गायनवादनाचे धडे देतात. त्यातल्या अमिनकडे ते भावी राजगायक म्हणून बघत असतात. अठरा वर्षांच्या प्रदीर्घ तपश्यर्येनंतर रहेमखां या मुलाला सांगतात,``बेटा, माझ्या गुरूनं मला दिलेला संगीताचा खजिना तुझ्या हाती देऊन आज मी गुरु ऋणातून मुक्त झालोय. ही उत्तरेच्या संगीताची कावड तू दक्षिणेत पसरू दे. या घराण्याचा वारसा टिकवेल असा एखादा शागीर्द तयार कर.`` अमिनखां मुंबईत येऊन संगीतक्षेत्रात आपले बस्तान बसवण्यासाठी खूप परिश्रम घेतात. शिकवण्या घेतात. छोट्यामोठ्या बैठकी करतात. त्यांची कन्या गुलबदन जेव्हा त्यांच्याच गायकीची झलक दाखवते तेव्हा मात्र ते संतापतात,``खबरदार, पुन्हा तानपुऱ्याला हात लावशील तर...तानपुरा खांद्यावर ठेवून गायला तू कोणा कोठीवालीची मुलगी नाहीस. या घरच्या मुलींनी असं गाताना कुणी ऐकलंय? तो रिवाज नाही या घरचा`` ते तिचं लग्न आपला आवडता शिष्य दिलावर याच्याशी लावून देतात... काही वर्षे जातात. दिलावर कात्यायनीच्या कोठीवर दिवसेंदिवस राहू लागतो; गुलबदनशी प्रतारणा, गुरूशी प्रतारणा, गाण्याशी प्रतारणा -अमिनखां संतप्त होतात. आपल्या घराण्याच्या गायकीचा वारस कोण या प्रश्नाने अस्वस्थ होतात; आणि एक दिवस कन्या गुलबदनला म्हणतात, ``ये बेटी बैस, तो तानपुरा घेऊन षड्ज लाव... जातोय कुठे दिलावर? दिवसभर भटकलेला राही रात्री घरी येतोच ना? तसं दिलावरला यावं लागेल. तुझे सूर त्याला खेचून आणतील.``
लग्नाला वर्ष होऊनही सगुणाला तिचा नवरा विश्वास देशमुख अस्पर्शितच ठेवतो हे कळल्यावर सगुणाची मैत्रीण आसमा अस्वस्थ होते. सगुणा हे कोणालाही कळू देत नाही; कारण आपल्या नवऱ्याचे दु:ख तिला ठाऊक असते. त्याची एकेकाळची प्रेयसी स्वप्ना हिच्यावर गुंड बलात्कार करतात; पुराव्याअभावी गुंड निर्दोषी म्हणुन सुटतात, स्वप्नाचे लग्न मोडते.
...या कथेला लेखिका नंतर वेगळीच कलाटणी देतात. एकदा स्वप्ना कर्तव्यभावनेने रक्तदान करायला येते तेव्हा डॉक्टर तिच्या रक्ताची तपासणी करतात आणि तुमचं रक्त चालणार नाही म्हणतात. कारण रक्तात एच.आय.व्ही. पॉझिटिव्हची लक्षणे दिसतात. जगावर सूड उगवायचा म्हणून ती विश्वासला जवळ करते. त्याच्याबरोबर फार्महाऊसवर दोन महिने राहते... आणि विश्वासची तब्येत झपाट्याने बिघडत जाते. तपासणीत कळते की तोही एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह आहे.
सगुणा त्याची सेवाशुश्रुषा करते... पण दुसरीकडे देवाला धन्यवाद देते. कारण विश्वासने तिला स्पर्शही केलेला नसतो. आसमा म्हणते,``विश्वास दुबळा होता; आणि स्वप्ना नियतीची शिकार. तसं तर तूही नियतीचाच बळी. तू धीरानं वाटचाल केलीस... दया, क्षमा, शांती, धैर्याची पुतळी... या जगात तुझ्यासारखी माणसं आहेत म्हणून तर हे जग सुंदर आहे.`` आसमा तिला नंतर म्हणते,``या घराशी तुझा असलेला ऋणानुबंध संपला. तू आता माझ्याकडे राहा. शिक्षण पूर्ण कर... विश्वासानं जग. खचू नकोस. जे घडेल ते चांगलेच असणार यावर विश्वास ठेव.``
`सगुणा`ची ही कथा नियतीच्या वादळवाऱ्यातही आसमाच्या दमदार मैत्रीच्या रूपात तिच्यातील आशावाद अभंग ठेवते.
खानदानी कुळातील राजाक्का ही सुरजित हा वयस्क नवरा आपल्या नशिबी आला म्हणून नाराज असते. याच्यापासून आपल्याला मूल होता कामा नये असे ठरवते. तिला आवडलेला कुलदीप या तरुणाचे लग्न दुसऱ्याच कोणा मुलीशी झालेलं होतं. त्याचा राग तिच्या मनात होता. तरीही वीस वर्षं सुरजितचा संसार ती सजवते. सुरजितचे अचानक देहावसान होते; तेव्हा गुणाक्काचा विशीतला मुलगा चंद्रहास तिला माहेरी न्यायला येतो. गुणाक्का त्याला जन्म देताच मेलेली असते, त्याचे वडीलही जातात. आजीने त्याला वाढविलेले असते. चंद्राहासला बघितल्यावर राजाक्काला आपल्या जगण्याचे प्रयोजन सापडते. ती माहेरी येते. माहेरचा ताबा घेते. घरातले मासाहेबांचे साम्राज्य आपल्या हाती घेते. सारेजण तिला अघोरी म्हणतात. राजाक्काच्या अशा वागण्याने मासाहेबांचा मृत्यू होतो. चंद्रहासचे एका मुलीवर प्रेम जडते. तो तिची आपल्या मावशीशी ओळख करून देतो. आता चंद्रहास आपल्याला दुरावणार या भावनेनं राजाक्काचं मन, शरीर अतिशय अस्वस्थ होते. त्या धक्क्यानंच तिला मृत्यू येतो. आपल्या मावशीच्या अस्थिविसर्जनासाठी चंद्रहास नाशिकला जातो. बोटीतून प्रवाहाच्या मध्यभागी जाऊन अस्थींचा कलश सोडण्यासाठी वाकतो; आणि नदीत पडतो. गटांगळ्या खाऊ लागतो. `शेवटी अघोरीनं डाव साधला` असे रघुभटजी म्हणतो... अशा `अघोरी`सारख्या कथेतही लेखिका अनेक कथासूत्रांची गुंफण करून कथेतली गुंतागुंत वाढवत जातात. अपघात योगायोग यांची रेलचेल त्यांच्या कथानकांची गाडी त्यांना अनपेक्षित त्या दिशेने वळवणे सुलभ करते. राजाक्काची आयुष्यभराची अतृप्ती. तिला अंतच नाही. त्याच्या उतारवयात त्यांना तृप्तीचे केवळ क्षणिक दर्शन होते. पण ती केवळ हुलकावणी ठरते.
``या शरीराच्या आत एक मनं असतं. त्या मनाला बरंच काही हवं असतं. चांगलं आणि वाईटही.`` हे नेल्सीचे शब्द गोव्याहून परतताना इन्स्पेक्टर चंद्रहासच्या जीवनाला झोके देत राहतात. साठीतली नेल्सी डान्टस् पन्नाशीतल्या चंद्रहासला आपल्या थॉमसबरोबरच्या सुखी सहजीवनाची कहाणी सांगते आणि त्याला म्हणते, ``चंद्रासाब, मला सोबतीची, मैत्रीची खूप गरज आहे. आता या साठ वर्षांच्या शरीराला काहीच नको आहे. पण शरीराच्या आत जे मन असतं ना त्याला खूप काही हवं असतं... त्यासाठी एक चांगली मैत्री हवी. चांगला सहवास हवा. द्याल तुम्ही तशी मैत्री! सर, बंगलीत याल राहायला?`` अरुंधतीच्या रूपात स्त्री जीवनाची कलंकित बाजू बघितलेल्या चंद्रहासला ही लखलखीत चांदणी जीवनाचे एक नवेच दर्शन घडवते; पण त्यामुळेच या कॅथॉलिक श्रीमंत भाटकरणीच्या त्या विनवणीला प्रतिसाद देणे जड वाटते. `उंच गेलेला झोका कधीच उंचीवर टिकत नाही... उंचीवर गेल्यावर क्षणभर दिसलेलं दृश्य मनात साठवून खाली जमिनीवर उतरायचं असतं` असा विचार त्याच्या मनात घोळत राहतो.
`अनमोल हिरा` ही कथा अंजनी, सुरंगा, हिरा या तीन मैत्रिणींच्या जीवनकथांची गुंफण करणारी कहाणी . वयस्कर हिराला नेनेसारखा निस्सीम प्रेम करणारा माणूस लाभला, तर अज्ञातवासात एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी राहण्यातही सुख लाभू नये असे म्हणून अंजनी सुरंगाची समजूत काढते आणि हिराला निरोप देताना सांगते.``जा हिरा विश्वासानं जा. तू ज्याचा शोध घेत होतीस ते तुला शोधतं आलं शेवटी.``
आपल्यावर प्रेम करणारा पुरुष लाभला -एवढचं तिला हिराच्या सुखाचं कारण वाटत नाही. तर निसर्ग, एकान्त अज्ञातवास हाही माणसाला अंतर्मुख करतो; आपल्याला काय हवं नको याचं भानं त्यामुळं येतं. स्नेह हाही आश्वासक असतो -असे अंजनीला वाटते. अनमोल हिराला नेने हे अचूक कोदण ठरेल असे ती मानते.
माधवी देसाई यांची जीवनाकडे, स्त्री-पुरुष सहवासाकडे, नातेसंबंधांकडे, जगाकडे पाहण्याची दृष्टी आदर्शवादी आहे तशीच समंजसपणाची आहे. नियती या जीवनात खूप घोळ घालते, वादळे उठवते. पण मानवी मनाचा चांगुलपणा, भलेपणा त्या नियतीच्या भल्याबुऱ्या आघातांनीही पूर्णतया निष्प्रभ कधी होत नाही; तो टिकूनच राहतो. आपल्या आणि इतरांच्या दु:खवेदनांवर तो फुंकर घालतो. काळ हा देखील ही फुंकर घालण्यात पटाईत असतो. तरीही नियतीचे काही हिशेब असतातच. एकेकाचे भवितव्य घडवताना नियती त्या हिशेबाप्रमाणे खूप काही घडवून जमा-खर्चाच्या बाजूंची तोंड मिळवणी साधन असते. समानधर्म्याना जवळ आणत असते; आयुष्यात नवा आशय व अर्थ भरत असते. वेगवेगळे प्रश्न -कथावस्तूच्या पार्श्वभूमीसाठी निवडण्यातही माधवी देसाई यांची विविधतेची हौस जाणवते. भरपूर तपशील असणाऱ्या मेलोड्रॅमॅटिक परंपरेतल्या नाट्यपूर्ण घटनाप्रचुर कथांचा बाज त्यांना प्रिय आहे. बहुसंख्य वाचकांनाही त्यामुळे माधवी देसाई यांच्या कथा आकृष्ट करतात. अल्पावधीत निघालेले सहा संग्रह हे त्याचीच तर साक्ष पटवतात. ...Read more
DAINIK LOKSATTA 19-01-2003एकटेपणाच्या एकरंगी कथा…
कोणताही लेखक शोध घेत असतो माणसांचा, त्यांच्यातल्या नातेसंबंधाचा. या प्रवासात तो माणसाच्या मनात खोल शिरतो, मुळाशी भिडण्याचा प्रयत्न करतो. माधवी देसाई यांचा कथाकार म्हणून चाललेला शोध हा प्रामुख्याने स्त्रीवर केंद्रित झालेला आहे स्त्री, तिचं भावविश्व, त्यात येणारी माणसं, त्यातही पुरुष, त्यांच्यात काही काळ तिचं रमणं, जगणं पण तरीही शेवटी एकाकी राहणं यात आहे. ही स्त्री तुटलेली, एकटेपणा सोसणारी, भोगणारी आहे. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या त्यांच्या संग्रहात हा भाग वारंवार, येत राहतो. त्यांचे नव्याने आलेले कथासंग्रह ‘किनारा’ व ‘शुक्रचांदणी’ याच अनुभवावर प्रामुख्याने बेतलेले आढळतात.
बेतलेला हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरला आहे. सुरुवातीला त्यांच्या कथांत या प्रकारचे अनुभव उत्स्फूर्तपणे आले, पण आता त्या लेखनाचा साचा झालेला दिसतो. ‘शुक्रचांदणी’ या संग्रहातून त्याचा अनुभव येतो. स्त्रियांचे हे एकटेपण काही वेळा परिस्थितीतून तर कधी त्यांच्या मन:स्थितीतून आलेलं आहे. या स्त्रिया बहुतेक वेळा एकरंगी रंगवल्या आहेत. ‘अघोरी’ कथेतली राजाक्का पूर्ण खलनायिका दाखवली आहे तर ‘सगुणी’मधली नायिका सद्गुणांची पुतळी आहे. माणसांच्या वृत्तीमधली ही टोकं कथेला रंजकता देतात, त्या वाचनीय होतात. पण त्याच वेळी त्या वास्तवापासून दूर जातात. ‘हिस्सा’मध्ये दीपकच्या बहिणी दुष्ट प्रवृत्तीच्या तर बायको पराकोटीची सत्प्रवृत्त दिसते. या पार्श्वभूमीवर ‘अधांतर’ सारखी कथा उठून दिसते ती वेगळेपणामुळे. यात एका बाजूला स्त्रीत्व आणि दुसऱ्या बाजूला महत्त्वाकांक्षा यांच्या द्वंद्वात सापडलेली नीलांबरी आहे.
संग्रहाला दिलेलं नाव ‘शुक्रचांदणी’ हे अर्थपूर्ण आहे. शुक्राची चांदणी हे सुंदरतेचं प्रतीक मानलं जातं. पण आकाशात ती एकटीच दिसते. (खरं वैज्ञानिकदृष्ट्या ती नव्हे तर तो शुक्र) रात्र संपत चालली आहे व पहाट सुरू होते आहे, अशा संधिकालात दिसणारी ही चांदणी आहे. या संग्रहातल्या बहुतेक स्त्रियासुद्धा सुंदर, देखण्या, भोगविलासात रमलेल्या आहेत. एकेकाळी त्यांनी जीवनाचे स्वैर रंग अनुभवले आहेत. पण आता त्यांच्या आयुष्यातला जणू संधिकाळ आहे. या टप्प्यावर मग त्यांचं चिंतन सुरू होतं. जसे ‘अनमोल हिरा’ मधील हिरा. आजपर्यंत तिला अनेक चाहते, रसिक भेटले. पण या कलावतीला खरी ओढ आहे ती अशा पुरुषाची, जो तिला मनापासून समजून घेईल, एक माणूस म्हणून पाहील.
‘जमीन आसमान’मधला प्रताप म्हणूनच विजयाला भावतो. तो म्हणतो, ‘स्त्री-पुरुष या संज्ञा काही वयानंतर संपून जातात आणि त्यापलीकडे उरतो तो फक्त माणूस! प्रेम करणारी माणूस! खरं प्रेम या जगात आहेच. खरं तर प्रेमच आहे फक्त!’ असं प्रेम करणारा प्रताप काय किंवा या भारतभूमीवर मनापासून रमणारी परकीय अॅना काय अशी आदर्शवादी माणसं आपल्याला वाचायला आवडतात, आपली आदर्शाची भूक ती पुरी करतात.
या कथांतून येणारं तत्त्वचिंतन हा यातला लेखिकेच्या विचारशक्तीचा प्रत्यय देणारा भाग आहे. ‘झोका’ ही या दृष्टीने जमलेली आहे. ‘या जीवनाच्या गाभ्याशी काही तरी सत्य नक्कीच लपलेलं आहे. मनावर साचलेली सारी मळभं काढून आत दडलेलं सत्य शोधणं म्हणजे तर जीवन नव्हे?’ असं चिंतन कथेतल्या आशयांशी एकरूप होऊन येतं. एखाद्या पात्राभोवती गुंफलेली कथा आणि शेवटी तत्त्वचिंतन असा रचनाबंध आपल्याला उमगतो आणि मग त्यातलं नावीन्य ओसरू लागतं.
‘किनारा’, ‘सोळावं वर्ष’, ‘तेरा दिवस’ यासारख्या शीर्षकाच्या एकूण अकरा कथा ‘किनारा’त येतात. ही शीर्षकं बोलकी आहेत. त्यामुळे कथाविषयीची उत्सुकता मनात जागी होते. पुन्हा त्यातून कथानकातलं वेगळेपण, वैशिष्ट्य प्रगट होतं. जसे ‘किनारा’ ही एका अनाथालयात राहणाऱ्या सॅम या अनाथ मुलाची कहाणी आहे. पण कथेच्या शेवटी आपल्याला कळतं एकटेपणाने जगणारा सॅम एकटा नाही; त्याला वडिलांचा, घराचा किनारा आहे. ‘सोळावं वर्ष’मध्ये एका प्रौढ कुमारिकेच्या मनात एका परिचिताच्या सहवासाने उमलत जाणारे नवथर तारुण्य, त्याच्याविषयीची ओढ यांचे वर्णन येते. त्या कथेच्या शेवटी निवेदन येतं ‘तिला भेटलेलं सोळावं वर्ष तिचं होतं. फक्त तिचं. त्या वर्षाला निरोप द्यायला ती आज चालली होती. आनंदाने कारण निरोप दिला तरी ते सोळावं वर्ष तिच्या मनातच राहणार होतं.’ ही एक चांगली जमून आलेली कथा आहे. माणसाच्या मनात जी स्पंदनं, ज्या गोष्टी चालतात, कधी कळत तर कधी नकळत, ते टिपण्याचा प्रयत्न या कथेतून साकार होतो. तसेच ‘अर्थ’ ही कथा आहे. कुष्ठरोगाने शरीर पार जाऊनसुद्धा मनातून शरीराची अभिलाषा जात नाही, मोह सरत नाही. अशा प्रकारचं चिंतन आपल्याला अंतर्मुख करतं.
परंतु काही कथांमध्ये ही तरलता, हे बारकावे पकडणं लेखिकेला अवघड गेलं आहे. जसे ‘झिंग’ मधला डी.एस.पी. रवींद्र, ‘वीस बाय दोन’मधली समष्टी, ‘सोनपुतळी’- मधली मित्रा या साऱ्या व्यक्तिरेखा दोन टोकांमध्ये दिसतात. आयुष्याच्या एका टप्प्यावर त्या रंगेल, चैनी, विलासी आहेत आणि दुसऱ्या टप्प्यावर त्या एकदम चिंतनशील, विचारी, झाल्यासारख्या वाटतात. ‘सोनपुतळी’ मधली मित्रा व्यभिचार करते, नवऱ्याकडून सारं काही मिळूनही प्रतारणा करते; पण ही जाणीव तिला होते ती नवरा मरण पावल्यानंतर. म्हणजे इथे अशा काही ठळक, तीव्र घटना घडल्यानेच आयुष्यविषयक चिंतन येतं. वास्तविक पाहता माणसामध्ये सतत सत् आणि असत् हा संघर्ष चालू असतो. काही वेळा ‘एखाद्या लहानशा प्रसंगाने, उद्गाराने तो वेगळे वळण घेतो, ही प्रगल्भता या कथांमध्ये क्वचितच दिसते.
‘किनारा’ व ‘शुक्रचांदणी’ या दोन्ही संग्रहातील कथाबीज, काही वेळा येणारं तत्त्वचिंतन यात ताकद दडलेली आहे, पण व्यक्तिरेखांच्या सरधोपटपणांमुळं कथा फारशी उंची गाठत नाहीत. चंद्रमोहन कुलकर्णी यांची मुखपृष्ठे अंतरंगाशी मेळ खाणारी आहेत.
-मनीषा र. रावराणे ...Read more