अविनाश गडवेसुख कुणाला नको असते? अनेक अवतार, साधु, संत,महंत, साऱ्यांनीच आपले आयुष्य सुखाच्या शोधातच तर घालवले पण सुख मिळाले? की सुखाच्या शोधात असताना प्रत्येकाच्या वाट्याला येतात ती दुःखेच? असं म्हणतात, "सुख पाहता जीवा एवढे दुःख पर्वता एवढे" पण त्या जीवा एवढ्याश सुखासाठीच माणूस आयुष्यभर धाप लागेपर्यंत धावत असतो.
पण...लागतो का सुखाचा शोध? आपल्या पैकी प्रत्येकाचीच सुखाची कल्पना अनेक हव्या हव्याशा वाटणाऱ्या अतृप्त गोष्टींनी भरलेली असते. कितीही पूर्ण झाल्या तरीही काही शिल्लक उरतातच आणि सुरुच राहतो सुखाचा शोध.
आज मी ज्या पुस्तकाचा परिचय तुम्हाला करून देणार आहे, ते आहे मराठी साहित्याचा माणिक मणी, पज्ञभुषण, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्यांना `ययाती` बद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ते प्रसिद्ध मराठी साहित्यक वि. सं. खांडेकर यांचे, "सुखाचा शोध". (१९३९) साली आमच्या जुन्या पिढीतील सदस्यांनी हा सिनेमा देखिल बघितला असेल. बाबुराव पेंढारकर , मिनाक्षी, विमला सरदेसाई,दामुआण्ण मालवणकर, विष्णू पंत जोग,उषा मंत्री आणि शांता ठकार अशी प्रचंड भारी स्टारकास्ट, वि.स. खांडेकर आणि भा. रा. तांबे यांची गाणी, हाच सिनेमा हिंदीत `मेरा हक` म्हणून प्रदर्शित झाला होता.
याचेच हे थोडक्यात कादंबरी सदृश कथानक.
या कादंबरीत एक एक पात्र स्वतःला व्यक्त करत जाते आणि आपण अधिकाधिक त्या सुखाच्या कल्पनेत गुंतत जातो. पुस्तक संपले की नकळतच डोळ्यात आसवे जमा होतात ही जादु वि.स. खांडेकरांच्या लेखनीची.
कादंबरी फिरत जाते ती आप्पा, आनंद, उषा, चंचला या पात्रांभोवतीच. स्वतंत्र्य लढ्याचा काळ, ज्याला घरचा कर्ता पुरुष म्हणावे असा अप्पा समाजसेवेचे कंकण बांधून सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेला. लोकांनी आपल्याला एक मोठा नेता मानावे म्हणून अहोरात्र झटणारा आणि प्रसंगी गरोदर पत्नी, तिची प्रकृती ठीक नसतानाही आणि आपणच घरचे कर्ते पुरुष आहोत याचा विचार न करता नोकरी करायचे सोडून व्याख्याने, सभा यांत रममाण होणारा.
आधीच कसेबसे लग्न लावून दिलेल्या पण मुलाला जन्म देऊन इहलोक त्यागलेल्या आपल्या मुलीच्या मुलाला, आपल्या नातवाला सावत्र आईचा जाच नको म्हणून त्याला आपल्या घरी घेऊन येणारी, त्याचे पालन पोषण करणारी आनंदची आई, आणि याच लाडाने पुढे वाढत गेलेला, बिघडत गेलेला, स्त्रीसुखाची आस बाळगत वावणारा भैय्या!
अप्पाने समाजसवेचेच्या नादात दुर्लक्षित केल्याने बाळ आणि मिरा या दोन जीवांना सोडून गेलेल्या आईविना पोरके झालेल्या मुलांचे संगोपन, आईच्या व्याकुळ डोळ्यातील आजर्व, यात खूप शिकून मोठे व्हायचे, वकील व्हायचे स्वप्न बघणाऱ्या आनंदला मात्र आईचे दुःख, घराच्या जबाबदाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्या सुखाला तिलांजली देणे भाग पडते. तो शिक्षण अर्धवट सोडून विमा एजंट होतो.
अशाच एका प्रवासात कोवळ्या वयात विधवा झालेल्या, दीर आणि सभोवतालच्या विखारी पुरुषी नजरांनी घायाळ झालेली उषा बोटीतून उडी मारुन जीव देण्याच्या प्रयत्नात असताना आनंद तीला वाचवतो, आधार देतो, घरी घेऊन येतो. तीला आनंदच्या नजरेत कधीच वासनेचा गंधही दिसत नाही, तिच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा तो कधीच प्रयत्न करत नाही. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम दाटून आलेले पण ते एका देव आणि भक्ताच्या नात्यासारखे पवित्र होते. आनंदला उषाचा भक्तिरुपी विश्वास तोडायचा नसतो तर उषाला त्याच्या नजरेत स्वतःचे प्रेम कमी होऊ दयायचे नसते. त्याचा अनादर करायचा नसतो.
पुढे अप्पाने आणलेल्या स्थळाशी, माणिक सोबत आनंदचे लग्न होते. पण अप्पा सारखाच समाजसेवेचा वसा सांगत माणिक स्वतःला व्याख्याने, सभा, छोटे मोठे कार्यक्रम यात रममाण करून घेते. आनंद तीच्या सहवासासाठी, तिच्या प्रेमासाठी झुरतच राहतो पण ती मात्र त्यात नाममात्र सुद्धा आकर्षण दाखवत नाही. उषाचा, मुलांचा देखिल ती दुस्वास करायला लागते. आनंदच्या आईच्या निधनानंतर तर ती पुरती बेभान, बेताल होऊन वागायला लागते. शेवटी नाईलाजाने आनंद, उषा आणि मुलांची व्यवस्था बोर्डिंगमध्ये करतो. इकडे विमा पॉलिसी निमित्ताने आनंदची ओळख चंचला नामक नटीशी होते. तीच्या सहवासासाठी, सोबतीसाठी, स्पर्शासाठी आजवर अनेक हपापलेले लोक तिने बघितलेले असतात. तिला आनंद वेगळा वाटतो. ती आनंदकडे आकर्षित होते पण आनंद तीला वश होत नाही, तिच्या सौदर्यावर भाळत नाही. हे बघून तीचा अहंकार दुखावतो. ती कसेही करून त्याला शरण आणायचा चंग धरते. त्यासाठी ती माणिक आणि आनंदमध्ये भांडण लाऊन त्याला आपल्या बंगल्यात घेऊन येते. त्याला दारुबाज बणवते. पण वेळोवेळी जागा होणारा सद्सदविवेक आनंदला तिचा गुलाम होऊ देत नाही. पुरुषी मत्सर जागा करायला ती परदेशी वास्तव्य केलेल्या, आप्पा आणि माणिकला समाजकार्यात सोबत असल्याची बतावणी करणाऱ्या धनंजयला घरात घेऊन येते आनंद समोर मुद्दाम धनंजय सोबत प्रेमाचे चाळे करते पण तरीही आनंद तीला शरण येत नाही बघून ती त्याला घराबाहेर काढते. आनंद पासून अपेक्षित सुख तीला मिळतच नाही.
दारुच्या पुरता आहारी गेलेला, आयुष्यात कुणीही जवळचे उरलेले नाही, ज्यांच्या सुखासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग केला ते कुणीच आपले झाले नाही या विदिर्ण अवस्थेत आनंद आत्महत्या करायचे ठरवतो पण नेमकी त्याचवेळी उषा त्याला पुन्हा भेटते, त्याला आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करते. एक खोली घेऊन त्यासोबत राहायला लागते. त्याच्यातले कर्तृत्व जागे करते. जगात किती वेगवेगळ्या प्रकारची दुःख आपल्या सभोवताली आहेत आणि लोक न मरता त्याचा कसा सामना करताहेत ते दाखविते. आनंदचे आयुष्य बदलत जाते. तो आत्मविश्वास मिळवत गोर गरीबांना मदत करणारा वकील होतो. आयुष्यात पुन्हा एकदा त्याच्या जीवनात रंग भरतील, सुखाचे दिवस येतील असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा माणिक चे वादळ त्यांच्या घरात घोंगावत येते. कॉलेजमधील जुना मित्र, आता अप्पा सोबत आणि तिच्या सोबत समाजसेवक म्हणून वावरत असलेल्या धनंजयला एका बेसावध क्षणी माणिक सर्वस्व देऊन बसते. मात्र ती गरोदर राहताच धनंजय तीचा स्विकार करायला स्पष्ट नकार देतो. तिच्या लाख याचनांकडे दुर्लक्ष करतो. तो पर्यंत तो चंचलेच्या पुरता नादी लागलेला असतो. एक दिवस धनंजय अप्पांनी संमेलनासाठी ठेवलेले पैसे परस्पर काढून घेऊन आप्पा आणि चंचलेच्याही हातावर तुरी देऊन फरार होतो. माणिक पुरती कोलमडते. तीला तिचे आनंद, उषा सोबतचे वागणे आठवून प्रचंड पश्चात्ताप होतो. आनंदला एक दिर्घ पत्र लिहून आणि आनंद उषाला नेहमीसाठी एक व्हायचे सांगून त्यांच्या आयुष्यातून कायमची दूर निघून जाते. उदरात वाढत असलेल्या अंकुरासोबत सुखाच्या शोधात.
ज्या समाजसेवेत नाव होईल, किर्ती होईल, आपण लोकनेते होऊ या सुखाच्या शोधात असलेल्या आप्पाला सूख भेटतच नाही. आणि घरात असलेले सूख त्याला दिसतच नाही.
आपल्या स्वप्नांना, सुखाच्या शोधात कधी आईसाठी, घरासाठी, भाच्यांच्या भविष्यासाठी, माणिकसाठी, उषाच्या निष्कलंक प्रेमाचा उपमर्द होऊ नये म्हणून आपले बोलूनही न दाखवणाऱ्या आनंदचा सुखाचा शोध सुरूच राहतो की खरंच तो सुखाचा शोध शेवटी उषाजवळ येऊन थांबतो?
सूखाच्या शोधात सुडाच्या आहारी जाऊन खाली हात राहीलेल्या माणिकवर सूख रुसलेलेच राहतं की उदरात वाढणाऱ्या बाळात ती ते शोधते?
अनेक प्रकारच्या संघर्षानंतर, शेवटपर्यंत आपल्या पेक्षा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या सुखाच्या कल्पनेतच आपले सूख मानणाऱ्या उषाच्या मनात असलेला सुखाचा शोध शेवटी थांबतो का?
सुंदर शरीर सारी सुखे मिळवून देऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर चंचलेच्या सुखाची धाव कुठे येऊन थांबते? "त्यागातच सुख असते" अशी परंपरागत जीवनमूल्ये मानणाऱ्या. आनंद आणि उषाला सुख का हुलकावणी देत राहते? प्रत्येकाची अशी सुखाची व्याख्या आपल्या डोक्यात थैमान घालत राहते.
भैय्या, अप्पा सारखी कर्तृत्वहीन माणसे एकावरच घराचे सारे ओझे टाकून मजा मारतात हे चित्र आम्ही सभोवताली बघतोच ना? थोडक्यात त्याग हा कुपात्री होता कामा नये. परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे कधी कधी आपल्या आणि समाजाच्या दृष्टीने देखिल योग्य नसते.१९३९ साली मांडलेले हे विचार आजही आमच्या समाजात तंतोतंत लागू पडतात.
पुस्तक वाचत असताना आपणही आपल्या मनातील सुखाच्या शोधात विचार करायला लागतो. आपण आपल्याला सुखी भासवतो की सुखाच्या शोधात धावतच आहोत, आणि कदाचित धावतच राहू शेवटच्या श्वासापर्यंत हा विचार मनात येत राहतो, त्या सुखाच्या शोधात अस्वस्थ वाटत जाणे ही या पुस्तकाची ताकद कारण हा सिनेमा बघायचे भाग्य लाभले नाही.
तरीही या पुस्तकात पानोपानी जी मनाला खिळवून ठेवतात अशी काही वाक्ये परिचय आटोपतांना तुमच्यासाठी...
" स्त्रीवर खरं प्रेम मृत्युच करू शकतो."
" अगदी सत्याग्रह करायचा बेत दिसतो तुमचा! ज्याचा आग्रह धरावा, अशी जगात `सत्य ` ही एकच गोष्ट आहे.
" त्यागाने देव प्रसन्न होतात, भुते नाही."
" संसार हा यज्ञ आहे पण ज्या यज्ञात ॠत्विजावरच बलिदानाचा पशू व्हायची वेळ येते."
" आंधळ्या त्यागाने जगाची प्रगती साधू पाहणे हे आंधळ्या मार्गदर्शकाच्या साहाय्याने हिमालय चढू पाहण्याइतकेच वेडेपणाचे आहे." ...Read more