NEWSPAPER REVIEWजीवनाचे सार्थक करणारा एक विलक्षण अनुभव म्हणून मातृत्वाकडे पहा...
`मदरहूड वुइथ ए स्टाइल` या पुस्तकाच्या आधाराने गरोदरपण आणि बाळंतपण याविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन करणारे `सुखद मातृत्व` हे पुस्तक प्रत्येक मातेला आणि विशेषत्वाने ग्रामीण भागातील प्राथमिकआरोग्य केंद्रांमधील मिडवाइफ परिचारिकांना व दायांनाही उपयुक्त ठरेल.
जन्माला येणारे प्रत्येक मूल हा एक चमत्कारच असतो, हे तर खरेच आहे; परंतु त्याच बरोबर तो एक परमेश्वराजवळ जाण्याचा ईश्वरी संकेत असतो. प्रत्येक मूल हे ईश्वराचेच रूप असते आणि गरोदरपणात त्या गर्भाची व्यवस्थित काळजी घेणे ही परमेश्वराचीच पूजा आहे, अशा श्रद्धेने डॉ. रत्नावली दातार अपत्यसंभवाकडे पाहतात.
परमेश्वराने आपल्याला मानवाचा जन्म दिला आणि मानव हा या सृष्टीतील सर्वात प्रगत, बुद्धिमान आणि प्रयोगशील अशी निर्मिती आहे. या मानवी जन्माचे सार्थक होण्यासाठी ज्या अनेक गोष्टी कर्तव्यभावनेने पार पाडाव्या लागतात त्यापैकीच वंशसातत्य ही देखील एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे हे आपापल्या गुणसूत्रांमध्येच अंर्तिनहित असते आणि त्यासाठी योग्य त्या प्रेरणा वा उर्मी विशिष्ट वयात प्रभावी व्हाव्या अशी निसर्गाची योजना असते. आपल्याच रक्तामासांतून, आपल्याच कुशीतून एक नवीन जीव जन्माला घालण्याचा आनंद हा अवर्णनीयच होय.
स्त्री-पुरुषाच्या मीलनाने गर्भसंभव होतो; परंतु त्या गर्भाचा भार स्त्रीलाच स्वशरीरात वाहिला लागतो; त्याला गर्भाशयातच परिपुष्ट करून एका सक्षम स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आकार दिला जातो. ही सर्व प्रक्रिया म्हटले तर स्वाभाविक सरळ सहजसाध्य आहे, म्हटले तर जगातली अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
९ महिन्यांच्या काळात गर्भाशयात गर्भाची वाढ निरोगी, निकोप होणे, प्रसूती सुलभपणे होणे, आणि अनंत भावनिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता असणाऱ्या एका व्यक्तित्वाचे या जगात पदार्पण होणे ही सर्व प्रक्रिया घराघरात अनुभवाला येणारी सर्वसामान्य घटना आहे; परंतु ती कधीकधी अत्यंत जीवघेणी आणि गुंतागुंतीचीही होऊ शकते; आणि मातेला तसेच बाळालाही घातक ठरू शकते. बीजाचे रोप, क्षेत्र निकृष्ट असेल तर किंवा त्यात रुजणारे बी कमजोर असेल तर येणारे रोप खुरटलेले असेल. स्त्री-पुरुष निकोप असतील, तर त्यांच्या मीलनातून निर्माण होणारा अंकुरही सुदृढच निपजेल; स्त्री-पुरुष अशक्त, रोगी, कमजोर असतील तर जन्मणारे बालकही अनेक समस्या निर्माण करीत पालकांची तसेच स्वत:चीही फरफट करीत राहील. माता-पित्याकडून मिळणाऱ्या गुणसूत्रांनी जन्माला येणाऱ्या नव्या जीवाचे स्वरूप ठरते. स्त्री-पुरुषांच्या प्रत्येकी २२ जोड्या या सारख्याच असतात. पुरुषाकडून मिळणाऱ्या २३ व्या क्रोमोझोममधील एक्स किंवा वाय या क्रोमोझोमनुसार गर्भाचे लिंग ठरते. वाय क्रोमोझोममुळे गर्भाला पुरुषत्व लाभते. एक्समुळे स्त्रीत्व. नेहमी मुलीच होतात म्हणून स्त्रीला दोष देणे हा प्रकार पूर्वी समाजात सर्रास रूढ होता. नव्या संशोधनाने स्त्रीच्या ऐवजी पुरुषच यासाठी जबाबदार ठरतो.
डॉ. रत्नावली दातार यांनी या पुस्तकात प्रथम आई होण्यासाठी प्रत्येक विवाहित स्त्रीची मनोभूमिका पक्की होण्यापासून आरंभ केला आहे. शरीरातील विशिष्ट इंद्रियांची रचना मातृत्व, गर्भसंभव, गर्भसंगोपन वगैरे दृष्टींनी कशी कार्यरत असते याचीही कल्पना दिली आहे. गर्भारपण कसे ओळखावे, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्या, गरोदरपणी घ्यावयाची काळजी, गरोदरपणात आढळणारी सर्वसामान्य दुखणी, (ओटीपोटात दुखणे, पांढरा स्त्राव वाहणे, त्वचा ताणली जाणे, रक्तदाब अचानक वाढणे, स्तनांची वाढ होणे, पोटात दुखणे, मळमळणे, उलट्या होणे, छातीत जळजळणे, रक्तातील लोह कमतरता जाणवणे, अपचन, वांब येणे, लघवी अडकणे, गर्भाशयात जास्त पाणी होणे, स्तनांमध्ये दुखणे इ. इ.) यांची कल्पना दिली आहे.
स्तनपानाच्या दृष्टीनेही पहिलटकरणीच्या मनात अनेक शंका असतात. स्तनपान हे सर्वात स्वस्त आहे; ते पूर्णत: निर्जंतुक असते. आईचे दूध बालकाला पचायला सोपे असते. त्यात अॅलर्जीचा धोका नसतो. वरच्या दुधाप्रमाणे जीवाणू-विषाणू बाधा होण्याची शक्यता नसते, बाळाची प्रतिकारशक्ती वाढते, स्तनपानामुळे आई व मूल यांच्यामध्ये जवळिकीचे प्रेम-विश्वासाचे नाते दृढ होते. स्तनपानामुळे स्तनांचा देखणेपणा कमी होतो, सौंदर्यात तो उणेपणा आणतो या आक्षेपात तथ्य नाही असे डॉ. दातार आवर्जून सांगतात. अर्थात दूध पाजणाऱ्या मातेने स्तनांची योग्य प्रकारे काळजी घ्यायलाच हवी असेही त्या बजावतात. स्तनाग्रे स्वच्छ व कोरडी ठेवणे, बाळाला पाजायला घेताना कोमट पाण्यात मऊ रुई वा कापड भिजवून स्तनाग्रे पुसून घेणे, दूध खूप गळत असल्यास ब्रेसियर दिवसातून तीन-चार वेळा बदलणे, स्तन दाटू न देणे, स्तनाग्रे दिवसात थोडा वेळ तरी मोकळी हवेवर उघडी राहू देणे, दोन स्तनपानांमध्ये क्रीम वा तेल लावणे, स्तनपान करणाऱ्या स्त्रीने योग्य आहार घेणे, (मद्यपान-धूम्रपान टाळणे, विशिष्ट औषधे टाळणे), इ. टिप्स लक्षात ठेवायला हव्या.
गरोदरपणाच्या काळात अनेक प्रकारे सावधगिरी बाळगावी लागते. तीन-तीन महिन्यांचे तीन टप्पे पाडून त्या त्या टप्प्यात काय करावे, काय करू नये, काय खावे-प्यावे, व्यायाम कुठला करावा, याबाबत बहुमोल सूचना दिल्या आहेत.
बाळाच्या जन्माच्या आधीचा व नंतरचा काळ हाही अनेक दृष्टींनी कसोटीचा असतो. बाळंतपणासाठी तयारी करताना कितीतरी गोष्टींची जमवाजमव करावी लागते. बाळंतपण ही एक कठीण स्थिती आहे. जी स्त्री प्रसूती कळा सहन करते ती जगातली कोणतीही वेदना सहन करू शकते, असेही म्हटले तर चालेल.
बाळंतपणानंतर येणारा लठ्ठपणा टाळण्यासाठी आहार आणि व्यायाम, यांचा योग्य तो वापर करावा लागतो. त्याबाबत स्वतंत्र प्रकरणाद्वारे मार्गदर्शन केले आहे. अनेक आकृत्यांद्वारे व्यायामाचे प्रकार स्पष्ट केले आहेत. ब्रेड, बिस्किट, केक्स, मटण, चिकन, फॅटी फिश, तळलेले पदार्थ, तेलतूप, कोकाकोला, बियर, वाईन वगैरे पदार्थ या काळात खाऊ नयेत. शाकाहारी लोकांनी चौरस आहार घ्यावा. दूध घ्यावे. मांसाहारी लोकांनी रोज एक अंडे आणि नॉन फॅटी तूप याची त्याला जोड द्यावी.
गर्भतेजाने स्त्रीचे अंगचे सौंदर्य झळाळून येते. कांती उजळ होते. चेहऱ्यावर हास्य येते. केसांनाही तकाकी येते. समतोल आहार, मानसिक प्रसन्नता, उत्तम वातावरण यामुळे हे तेज अधिक झळाळते. आईपण मौजमजेत जगा, जीवनाचे सार्थक करणारा एक अनुभव म्हणून त्याकडे पाहा. जाणकार मातृत्वाचा आनंद घ्या, असा संदेश देणारे हे पुस्तक आहे. ...Read more
DAINIK TARUN BHARAT 15-10-2000सुखद मातृत्वासाठी उपयुक्त पुस्तक...
जगातील सर्व नात्यांमध्ये आईचे व तिच्या अपत्याचे–बाळाचे–नाते सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. कारण ते अपूर्व त्यागाचे, प्रेमाचे, वात्सल्याचे असे एक पवित्र नाते आहे. आई बाळाला जन्माला घालण्यापासून त्याच्याजवळ असते, त्याच सर्व प्रकारची काळजी घेते. म्हणून बाळाची गर्भात चाहूल लागताच ती त्याच्यात हरखून जाते. त्याच्या आगमनाची योग्यप्रकारे तयारी करण्यासाठी ती सज्ज होते. यासाठी सर्व मातांना ‘सुखद मातृत्व’ हे डॉ. रत्नावली दातार यांचे पुस्तक उपयोगाचे ठरेल; परंतु अनुवाद करताना त्यांनी नवीन माहिती व संदर्भ घालून एक पुस्तक तयार केले आहे.
डॉ. रत्नावली दातार यांनी ‘सुखद मातृत्व’ या पुस्तकामध्ये स्त्रियांनी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊन ते अमलात आणण्यासाठी स्वत:ची शारीरिक व मानसिक तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. समाजात दोन स्वतंत्र भाग जाणवतात. एक शहरी भाग व दुसरा ग्रामीण भाग. शहरी स्त्रिया स्वतंत्रपणे विचार करू शकतात. विशेषत: स्वत:बद्दल! आपण लग्न, कसे, केव्हा व कोणाशी करायचे याबद्दल त्यांची स्वत:ची अशी खास मते असतात. त्यामुळे लग्नानंतर होणारी गर्भधारणा केव्हा होऊ द्यायची, त्याचे नियोजन मग बालसंगोपन वगैरे गोष्टींचे शास्त्र त्या अवगत करून घेतात. स्वत:चा व्यक्ती-विकास घडवताना सर्व कुटुंबाचेही शिस्तबद्ध नियमन, नियोजन व विकास कसा करायचा, याचे शास्त्रीय ज्ञान त्या मिळवतात! आपण स्वत: व आपले कुटुंब शारीरिक व मानसिक पातळीवर सुदृढ राखतात.
परंतु ग्रामीण भाग मात्र बराचसा मागासलेला आहे. ग्रामीण भागातील अस्वच्छता, आरोग्याबाबतचे अज्ञान आणि बेपर्वाई यामुळे तेथे भयावह स्थिती आहे. या ग्रामीण भागातील स्त्रियांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी, तसेच आरोग्य केंद्रातील मिडवाईफ नर्सेसना, तसेच दाईचे काम करणाऱ्या स्त्रियांना या पुस्तकाचा उपयोग व्हावा, यासाठी ‘आई’ होण्याच्या निर्णयापासून ते बाळंतपणानंतरच्या व्यायामापर्यंत सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे.
‘होय, आता मला आई व्हायचंय!’ या पहिल्या प्रकरणात त्यांनी आई होण्यासाठी योग्य वय, शारीरिक सुडौलता व सुयोग्यता तसेच वजनाचे महत्त्व सांगितले आहे. वैद्यकीय तपासणी, गर्भधारणेचे नियोजन व आखणी कशी करावी, स्त्रियांची पोटातील इंद्रिये चित्रासहित समजावून सांगितली आहेत.
‘मी, आई होणार हे नक्की ठरले.’ या दुसऱ्या प्रकरणात स्त्रीचे जनन अवयव तसेच संतती प्रतिबंधक उपाय कसे, कोणते करावे, त्याबद्दल कोणती काळजी घ्यावी हे सुचविले आहे. प्रसूतीचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. ‘गर्भारपणात आढळणारी सर्वसामान्य दुखणी म्हणजे रक्तदाब, मूळव्याध, त्वचेवरील परिणाम, योनी मार्गातून पांढरा स्राव वाहणे, ओटीपोटात दुखणे इत्यादी. तसेच बाळंतरोग, अपचन, मळमळणे, बद्धकोष्ठता इत्यादींबद्दल सविस्तर लिहून त्याचवेळी कोणती काळजी घ्यावी हे सुचविले आहे.’
‘स्तनपानाची तयारी’ या प्रकरणात प्रसूतीनंतर कोणते कपडे वापरावे, स्तनांच्या समस्या व स्तनपानाचे फायदे स्वत: आईसाठी व बाळासाठी सांगितले आहेत.
सर्वसामान्य स्त्रियांच्या मनातले पुढच्या प्रकरणात मांडले आहेत. त्यामुळे स्त्रिया नि:शंक मनाने बाळंतपणास सामोऱ्या जाऊ शकतात.
डॉ. दातार यांनी गर्भारपणाच्या कालावधीचे एकूण तीन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा पहिल्या तीन महिन्यांचा, दुसरा टप्पा त्याच्या पुढील तीन महिन्यांचा व शेवटचा टप्पा शेवटच्या तीन महिन्यांचा. या प्रत्येक टप्प्यांमध्ये गर्भार स्त्रीने काय करावे, कोणती काळजी घ्यावी यासंदर्भातल्या सूचना आहेत. गर्भाची वाढ कशी होते, या दिवसातील आहार कसा असावा. बसताना कसे बसावे याबद्दल माहिती दिलेली आहे.
बाळाच्या जन्माच्या आधीचा काळ व जन्मदात्यानंतरचा काळ यांत कोणती तयारी करावी हे सांगितले आहे. बाळंतपणानंतर बऱ्याच स्त्रिया लठ्ठ होतात. पूर्वीचा शारीरिक डौल राहत नाही. त्यामुळे पुन्हा तसेच सुंदर दिसण्यासाठी, शरीराची कमनीयता जपण्यासाठी कोणते व्यायाम करावे, ते कशा प्रकारे करावे या प्रत्येक आसनाची चित्रासहित माहिती दिलेली आहे.
गर्भार स्त्रीच्या लहानसहान शंकांपासून ते बाळंतपणासाठीची शस्त्रक्रियापर्यंतची अनेक दृष्टिकोनातून सविस्तर माहिती डॉ. रत्नावली दातार यांनी वाचकांना दिलेली आहे. नवीन बाळाच्या स्वागतासाठी व जगातल्या सर्वश्रेष्ठ प्रेमाचे प्रतीक म्हणजे आई होण्यासाठी, ‘आईपण मौजमजेत जगा. सुस्वभावी, सुज्ञ आणि बांधेसूद आई व्हा!’ अशा शुभेच्छा या पुस्तकात दिलेल्या आहेत. ...Read more