DAINIK AIKYA 26-08-2007कविता भालेराव यांनी महत्त्वाच्या शोधांची माहिती देणारे एक सदर वृत्तमान चालवले. त्यात सुमारे पावणेदोनशे, शोधांचा समावेश झाला.
सौरऊर्जा, उपग्रह, झेरॉक्स, अग्निबाण, यंत्रमानव, लेसर, विमान, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे अत्याधुनिक शोधांनी आपल्या जीवनात जशी करांती केली तशीच प्राचीन मध्ययुगीन काळापासून माणसाने दैनंदिन जीवनातील सुखसुविधांच्या दृष्टीने शोधून काढलेल्या चाक, कागद, मासेमारी, तराजू, आगकाडी, साबन, बटन, समत, काच, विणकाम, घड्याळ, कुलूप, चष्मा, पूल, गलबत, होकायंत्र, सूक्ष्मदर्शक, सायकल, सिग्नल, रबर, बॉलपेन, स्टेथॉस्कोप, धान्य कापणी यंत्र, शिवणयंत्र या प्राथमिक शोधांनीही मानवी संस्कृतीला आकार दिला.
विजेचा बल्ब, टाइपरायटर, प्लॅस्टिक, लिफ्ट, कॅमेरा, सिनेमा, टेपरेकॉर्ड, फ्रीज, वॉशिंग मशीन मानवी जीवन सुखावह, रंजक आणि आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली.
या सर्व शोधांच्या हकिकती वाचणे म्हणजे आपल्या मानवी संस्कृतीच्या विकासाची रुपरेखा जाणून घेणे. या पुस्तकात शोधांची माहिती देताना कुठलाही विशिष्ट क्रम पाळलेला नाही किंवा विषयानुसार वर्गीकरणाचाही अवलंब केलेला नाही. सदर म्हणून ज्या क्रमाने पुस्तकात ते दिले आहेत. त्यामुळे कुठलेही पान उघडून वाचू लागले तरी चालते. पहिल्या पानापासून सलग तीनशे पाने कादंबरीप्रमाणे वाचण्याची येथे गरज नाही. कुठला शोध कुठल्या वर्षी लागला आणि तो कोणी लावला याचा कालक्रम शेवटी दिला आहे. माहिती आणि मनोरंजन या दोन्ही दृष्टींनी ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक कुमार वाचकांना उपयुक्त ठरेल.
या शोधांच्या तपशिलातून खूपच गमतीदार माहिती मिळते.
अनेक शोध योगायोगाने लागले. करायला गेलो एक आणि झाले भलतेच असा प्रकारही दिसतो. कोणाच्या डोक्यात कुठली कल्पना येईल याचा नेम नसतो. पण ती कल्पना सुचल्यावर ती प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी त्या व्यक्तीने कधीकधी आपले उभे आयुष्य वेचलेले दिसते; तर कधी, कधी त्या कल्पनेला वेगळेच फाटे फुटले असेही दिसते. माणसाला जाणवणाऱ्या समस्या, माणसाच्या गरजा या शोधांना जन्म देतात, अमुक अमुक सोय असायला हवी होती. अशी कल्पना मनात यावी आणि कोणीतरी ती पूर्ण करण्याचा वसा घ्यावा असा प्रकारही दिसतो.
कुठल्याही मजकुराची, चित्राची प्रत जशीच्या तशी मिळावी असे न्यूयॉर्क इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या पेटंट विभागात काम करणाऱ्या वेस्टर एफ कार्लसनला वाटले. कारण पेटंटसाठी अर्ज करताना कागदपत्रांच्या बऱ्याच प्रती द्याव्या लागत. त्या प्रती करण्याचे काम कंटाळवाणे वाटे. फोटो काढायचे तंत्र तर अवगत होते. पण ते वाटेल त्या मजकुराच्या स्वस्तात प्रती काढण्याच्या दृष्टीने व्यावहारिक नव्हते. तेव्हा भौतिकशास्त्राच्या पदवीधर असलेल्या कार्लसनने गंधकाचा लेप लावलेल्या विद्युतभारित काचेच्या प्लेटवर मजकूर लिहिलो कागद काही काळ ठेवून बाजूला केला. तेव्हा त्या प्लेटवर ती अक्षरे उमटलेली दिसली. आता ती अक्षरे काचेच्या प्लेटवरून कागदावर कशी उमटतात हा पुढचा टप्पा त्यासाठी त्याने प्रयोग केले. १९३८ साली तीन वर्षांच्या प्रयोगानंतर त्याला त्यात यश आले. पहिले झेरॉक्स मशीन तयार झाले. या यंत्राचे उत्पादन व्यापारी तत्त्वावर व्हावे म्हणून अनेक कारखानदारांना तो भेटला. १९४४ मध्ये जोसेफ विल्सनने त्याला मदतीचा हात दिला. सेलोनियन हे प्रकाशाला संवेदनशील असणारे मूलद्रव्य त्यांनी बॅटेले इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत शोधून काढले. १९६० साली झेरॉक्स ९१४ हे ऑफिस कॉपियर तयार झाले. कार्लसने हे मशीन अवाढव्य आकाराचे आणि कॉपी करण्यासाठी बराच वेळ खाणारे होते. पण ते काही काळ एकमेवाद्वितीय म्हणून वापरात राहिले. झेरॉक्स कॉर्पोरशेनला खूप कमाई करून देणारे ठरले. पुढे १९७३ मध्ये कॅनन या जपानी कंपनीने रंगीत झेरॉक्स मशीन काढले. १९८६ मध्ये लेसर कलर कॉपियर तयार केले. पॅनॅसॉनिक कंपनीने पॉकेट फोटोकॉपियर तयार केला.
झेरॉक्ससारख्या एका नव्याच तंत्रज्ञानाचा हा विस्मयकारक विकास कार्लसनच्या आरंभीच्या कल्पनेपासून दोन-तीन दशकांच्या अविरत संशोधनाद्वारे झाला. त्याला स्पर्धक कंपन्यांनीही सतत सुधारण करून आज लहान मुलही हे मशीन सहजपणे हाताळू शकेल इतके सोयीस्कर, सोपे बनवले आहे.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू बनली आहे. माणसाने या सर्वांचा उपयोग करून घेतला आहे.
सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या ऊर्जेचे उगमस्थान. सूर्याची उपासना भारतात प्रचीन काळापासून सुरू आहे. सौरऊर्जेचा उपयोग अंतर्गोल ढालींच्या माध्यमातून करून आर्किंमिडीजने रोमनांना लढाईत हरवले. या अंतर्गोल ढालींवर सूर्याचे किरण केंद्रित होत. त्यामुळे रोमन सैनिकांना ग्रीकांच्या सैन्याशर मुकाबला करणे अवघड जाई. सूर्यशक्तीचा उपयोग करण्यासाठी माणूस वेगवेगळे प्रयोग करीत राहिला.
१७१४ मध्ये आन्तान लव्हाशिए या फ्रेंच संशोधकाने सौरऊर्जेवर चालणारी भट्टी तयार करून तिच्यात धातू वितळता येतात हे दाखवून दिले.
१८८० मध्ये सौरशक्तीवर चालणारे वाफेचे इंजिन तयार केले गेले. सूर्याच्या उष्णतेने पाणी तापविण्यासाठी सौरबंबाचा वापर मात्र विसाव्या शतकांत सुरू झाला. सौरऊर्जेचा वापर करून स्वयंपाक करणे, पाणी गरम करणे, वीज निर्माण करणे यासाठी आता सर्रास होऊ लागला आहे. सौरऊर्जेसाठी लागणारी पॅनल्स अजून महाग आहेत; ती स्वस्त व सुटसुटीत करता आली तर भारतासारख्या देशात वीजनिर्मितीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
हवेचे गुणधर्म ठाऊक असले तरी ते तपासून पाहण्यासाठी साधने उपकरणे उपलब्ध नव्हती. १६४०मध्ये हवेचा दाब मोजण्यासाठी पहिला दाबमापक गॅलिलिओचा शिष्य टॉरीसेली याने तयार केला. हवेला वजन असते आणि हवा जागा व्यापते हे त्यावरून सिद्ध झाले. पुढे रॉबर्ट बॉयले याने हवेचा दाब आणि घनता यांचा संबंध गणिती भाषेत मांडला. १७७० मध्ये हवेतील वेगवेगळ्या वायूचे घटक शोधण्याचे काम सुरू झाले. जोसेफ प्रीस्टले याने १७७४ मध्ये ऑक्सिजनचा शोध लावला. हा वायू ज्वलनक्रियेला मदत करतो हे त्याच्या लक्षात आले. लव्हॉयझर या शास्त्रज्ञाने ‘आम्ल तयार करणारे’ या अर्थाचा ऑक्सिजन हा शब्द त्यासाठी वापरला. तो रुढ झाला. १८००च्या आसपास हवेचे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, अरगॉन वगैरे घटक आणि त्यांचे प्रमाण याबद्दल बरीचशी निश्चिती झाली. १८१८ मध्ये वायूचे द्रवात रुपांतर करण्याची कल्पना मायकेल फॅरडेला सुचली. हायड्रोजन सल्फाइडला द्रवरुप देण्यात त्याला यश आले. ऑक्सिजनचे द्रवात रुपांतर करण्याचे तंत्र कायलिटेट या फ्रेंच लोहाराने त्यानंतर साठ वर्षांनी शोधून काढले. द्रवरुप ऑक्सिजन साठवण्यासाठी जेम्स देवार याने निवांत बाटली- थर्मासचा शोध लावला. श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी रेस्पिरेटर किंवा व्हेंटिलेटरचा उपयोग करतात. नाकातून नळ्या घालून रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. नाकावर मास्क बसवणेही शक्य होते.
अशा कितीतरी शोधांची प्राथमिक माहिती आणि त्या, त्या शोधातील प्रगतीचे टप्पे या पुस्तकातील छोट्या छोट्या लेखांत नोंदवले आहेत. कुठलेही पान उघडावे आणि वाचावे. त्या विशिष्ट शोधाची माहिती मिळवावी यासाठी हे पुस्तक फारच उपयुक्त आहे. ...Read more
NEWSPAPER REVIEWविज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपले दैनंदिन जीवन अतिशय सुकर झाले आहे. लिफ्टपासून फोटो कॉपीपर्यंत आणि लिफ्टपासून रेफ्रिजरेटरपर्यंत किती तरी विज्ञानदूत आपले कष्ट हलके करत आहेत. ही साधने वापरताना ती कशी तयार झाली असतील, कोणत्या परिस्थितीत त्यांची निर्मिती ाली असेल, असे प्रश्न आपल्याला पडतात. ही जिज्ञासापूर्ती करण्यासाठीच कविता भालेराव यांनी ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक आणले आहे. ‘युवा सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे पुस्तक वाचनीय आहे. भरपूर संशोधन आणि मेहनत दिसत असली, तरी ही माहिती अतिशय सोप्या शब्दांत आणि रंजकपणे मांडल्याने पुस्तक जड किंवा कंटाळवाणे वाटत नाही.
कविता भालेराव यांनी निवडलेले विषय ही या पुस्तकाची खासियत, साबण, निर्लेप तवा, चष्मा, लिफ्ट, सिग्नल, स्टेथोस्कोप, झिप वेल्क्रो, कुलूप, पेन, शिलाई मशिन अशा एरवी वाचायला न मिळणाऱ्या विषयांची निवड त्यांनी केली आहे. ही साधने कशी तयार झाली, त्या वेळची परिस्थिती, सुरुवातीची साधने कशी होती, त्यात बदल कसे होत गेले इत्यादी गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे. त्यापैकी अनेक साधनांची आता पुढची पिढी आली आहे किंवा येऊ घातली आहे. तो भविष्याचा धागाही या लेखांमध्ये जोडलेला असल्याने ही केवळ भूतकाळाची सफर ठरत नाही, तर वर्तमानाची माहिती आणि भविष्याची चुणूक यांचाही आनंद त्यात मिळतो. विषयांचे वैविध्य आणि कुतूहल वाढवणारी शीर्षके यामुळे पुस्तक वाचताना मजा येते. जवळजवळ नव्वद साधनांची ‘मुळाक्षरे’ पुस्तकात आहेत. इंटरनेटवर आणि इंग्रजीमध्ये विज्ञानावर खूप माहिती वाचायला मिळत असली, तरी मराठी पुस्तकांत मात्र विज्ञानविषयक लेखन मात्र तुलनेने खूपच कमी आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञानप्रेमींच्या संग्रहात हे पुस्तक असायलाच हवे. ...Read more