Ashiwini Gore` तत्वमसि` ही रूढार्थाने कादंबरी असली तरी ते एक मुक्त चिंतन आहे. ते चिंतन रंजक वाटावे म्हणून त्याला कथेत परावर्तीत केले आहे असे फार तर आपण म्हणू शकतो. ध्रुव भट्ट ह्या प्रसिद्ध गुजराती लेखकाची ही कादंबरी अंजली नरवणे ह्यानी मराठीत अनुवादित केली आहे. गुराती आणि भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार ह्या कादंबरीला मिळालेला आहे . लेखक म्हणतात ही कादंबरी म्हणजे नर्मदा नदी, तिच्या आजूबाजूचे आदिवासी , तिच्या काठच्या मंदिरांमधून किंवा आश्रमांमधून राहिलेले परिक्रमावासी ह्या सगळ्यांकडून ऐकलेल्या गोष्टी आणि काही माझ्या स्वतःच्या कल्पना ह्याचे फळ आहे.
भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडण्याऱ्या नर्मदेच्या काठी ही कथा आकार घेते. कथेला नायक नाही, वाचकच त्याचा नायक होतो इतकी ही कथा आपली होऊन जाते. बालपणीचा काही काळ हा आपला नायक भारतात राहिलेला असतो नंतर मात्र तो परदेशात जातो आणि जवळजवळ १८ वर्षानंतर परत येतो, ह्या मधल्या काळात तो आपल्या ह्या मायभूमीपासून दुरावलेला असतो त्यामुळे त्याचे प्रोफेसर रुडॉल्फ जेव्हा त्याला आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासासाठी भारतात जायला सांगतात तेव्हा तो काहीसा नाखूष होतो, त्यांच्याकडे बरीच रदबदली करून बघतो, दुसऱ्या एका योग्य सहकाऱ्याचे नाव सुचवतो परंतु काहीही उपयोग होत नाही. `सुप्रिया भारतीय` ह्या तिथे आदिवासींमध्ये काम करणाऱ्या एका स्वयंसेविकेचे नाव प्रो. रुडॉल्फ त्याला सांगतात तेव्हा तर ही कोणीतरी ६०-६५ वर्षाची चष्मा घालणारी, खादी वापरणारी, भाषणं देणारी स्त्री असेल अशी त्याची खात्रीच होते. शेवटी ` तू आदिवासींमध्येच रहा, तिथे एक शाळा काढ, त्यांचं रोजचं आयुष्य बघ आणि त्याची टिपणं काढून मला पाठव` ह्या बोलीवर त्याची रवानगी भारतात होते. भारतातला त्याचा पहिलाच रेल्वेप्रवास म्हणजे बालपणीच्या आठवणींचं मोहोळ असतं. लहान वयातच आईला पारखा झालेल्या त्याने नंतरचं एक वर्ष गुजरातमधल्या एका छोट्या खेड्यात नानीजवळ काढलेलं असतं. सकाळी उठल्याबरोबर झालेलं नर्मदेचं पाहिलं दर्शन त्याला त्याच्या बालपणीच्या काळात घेऊन जातं. परदेशातल्या खाजगीपणाची सवय झालेल्या त्याला माणसं ओळख नसतांना इतकी एकमेकांशी कशी बोलतात,किंवा काय काय बोलू शकतात, ह्याचं भयंकर आश्चर्य वाटतं ` भारतीयत्व` म्हणून जे काही आहे ते म्हणजे काय ह्याची ओळख त्याला व्हायला लागते. भोपाळहून पुढे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जायला म्हणून आपला नायक रेल्वेत बसतो आणि आदिवासींशी त्याची पहिली तोंडओळख होते. आपल्यातच मग्न होऊन गाणाऱ्या एका आदिवासी युवतीला बघून नायकाला प्रश्न पडतो ` अनेक गोष्टींचा अभाव असतांना , अंगभर कपडे आणि पोटभर अन्न नसतांना सुद्धा ही मुलगी एवढी आनंदी कशी ?` सुखाची हिची व्याख्या नक्की आहेतरी काय ?. ही वनकन्या म्हणजे पुरिया पुढे नायकाला त्याच्या इच्छित स्थळी घेऊन जाते. कादंबरीत मध्ये मध्ये येणारी आदिवासींची भाषा खूप गोड वाटते , अर्थात लगेच त्याचा अनुवाद केलेला आहे त्यामुळे कथा सहज पुढे जाते. ह्या निर्मनुष्य स्थानकावर काही वेळ वाट बघून नायक एकटाच पुढे निघतो, इथला निसर्ग हळूहळू त्याच्या नजरेसमोर जणू उलगडत असतो. एका मोठ्या रायण वृक्षाच्या सावलीत बसल्यावर `मुनि का डेरा` आणि `बित्तुबंगा` असं लिहिलेले दोन दगड आणि त्यावरची व्याधाची आकृती त्याचं लक्ष वेधून घेते आणि लगेच तो आपली संशोधक मैत्रीण ल्युसी हिला त्याबद्दल कळवतो. थोड्यावेळाने त्याला घ्यायला येणारे गुप्ताजी आपल्याबरोबर सुप्रिया भारतीय ला घेऊन येतात आणि तिला बघून आपला नायक आश्चर्यचकित होतो, आनंदी, तरुण सुप्रिया बघून हिला काय दुःख असेल म्हणून ही इथे येऊन राहतेय ? असा अगदी सामान्य माणसाला पडेल असा प्रश्न त्यालाही पडतो. अतिशय हुशार, तंत्रकुशल अशी ही चुणचुणीत सुप्रिया आदिवासींची, गुप्तांजींच्या परिवाराची खूप जवळची असते, त्या साध्या लोकांनी तिचं नावही साधं सोपं करून टाकलेलं असतं, ते तिला `सुपरिया` म्हणत असतात. आपला नायक सुपारियाला बित्तुबंगा बद्दल विचारतो पण ती त्याला ताकास तूर लागू देत नाही, गुप्तजींबरोबर राहून तो इथली सगळी माहिती घेत असतो, इथल्या लोकांचे आचारविचार,त्यांची भाषा , संस्कृती ह्याबद्दलचं त्याचं गूढ मात्र वाढतच जात असतं. नकळत तो ह्या सगळ्यांमध्ये रमायला लागतो, कुठेतरी ह्यांच्यात आणि आपल्यात काहीतरी समान धागा आहे हे त्याला जाणवायला लागतं. इतकी वर्ष विस्मरणात गेलेलं कच्छच्या छोट्याशा खेड्यातलं त्याचं एक वर्ष पुनः पुनः त्याच्या डोळ्यासमोर उभं राहायला लागतं, त्याची नानी, मामा, मामी ,त्याच्या नानाजींचे एक चुलतभाऊ जे मंद बुद्धीचे होते ह्यांचं एकमेकांशी जोडलेलं असणं, एकमेकांना जपणं, सांभाळून घेणं, सहजपणे सामावून घेणं आज तो परत नव्याने अनुभवू लागतो. नायक म्हणतो तसं ऐशोआराम, भरपूर संपत्ती, पद, प्रतिष्ठा हे सगळं मिळवूनही सुखी, सुंदर नसलेले चेहरे आपल्या अवतीभवती सतत वावरत असतात किंवा बरेचदा तर आपणही त्यात असतो मग ह्या सगळ्याचाच अभाव असतांना इथे ह्या जंगलात सुपरियाच्या, पुरियाच्या, आदिवासींच्या किंवा लहानपणी पाहिलेल्या वरवर कठोर भासणाऱ्या नानीच्या रुपात एवढं नितळ निर्मळ सौन्दर्य कसं काय असू शकतं ?...ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल त्याला आदिवासींच्या सहवासात मिळत जाते. बित्तुबंगा ह्या नावाबद्दलचं गूढ उकलतं हे दोघे आदिवासी भाऊ असतात पुढे एका नरभक्षीण वाघिणीच्या हल्ल्यात त्यातला एक मरण पावतो , आपल्या भावाचा बळी घेणारी ही वाघीण नंतर बित्तुच्या मदतीने वनविभागाच्या जाळ्यात पकडल्या जाते, सुडाने बेभान झालेला बित्तु तिला खरंतर ठार मारणार असतो पण ही वाघीण जेव्हा थोड्याच काळात पिल्लाला जन्म देणार असते हे त्याला कळतं तेव्हा तो सहज तिला मुक्त करतो. इतक्या सहजपणे क्षमा करण्याची वृत्ती कुठलेही तथाकथित शिक्षण न घेतलेल्या बित्तुकडे कुठून येतात ह्याचं नायकाला महादाश्चर्य वाटतं. मध्ये एकदा नायकाला एक छोटासा अपघात होतो आणि बेशुद्ध अवस्थेत नर्मदा तीरावरच्या गणेश शास्त्रींच्या आश्रमात त्याच्यावर उपचार होतात गणेश शास्त्री , गुप्ताजी किंवा सुप्रिया हे सगळे आदिवासीसाठीच काम करणारे असतात. गणेश शास्त्रीशी इथला धर्म,संस्कृती ,परंपरा रीतिरिवाज ह्या विषयांवर भरपूर चर्चा होते. शास्त्रीजी त्याला समजावून सांगतात तुला इथे काम करायचे असेल , इथल्या लोकांच्या चुकीच्या समजुती बदलायच्या असतील, त्यांना काही नवं द्यायचं असेल तर आधी तुला त्यांना समजून घ्यावं लागेल, त्यांच्याशी मैत्री करावी लागेल, हळूहळू नायकाच्या विचारात परिवर्तन होऊ लागतं तो बदलू लागतो, त्याला ह्या लोकांबद्दल आत्मीयता वाटायला लागते, स्वयंसेवकांच्या मदतीनी तो इथे शाळा, मधुमक्षिका पालन असे छोटे उद्योग सुरु
करतो.
अतिशय साध्या वाटणाऱ्या ह्या आदिवासींची क्रूर बाजू सुद्धा पुरियाच्या निमित्ताने त्याच्या समोर येते तेव्हा तो हबकतो, अल्लड निरागस पुरीयाला काही कारणानी `डाकिण` ठरवलं जातं आणि मग अशी डाकीण नको म्हणून सगळे आदिवासी तिला ठार मारायला निघतात अशावेळी `साठसाली` ह्या आदिवासी जमातीची प्रमुख `कालेवाली माँ ` तिथे पोहचते आणि हकनाक बळी जाणारी पुरीया वाचते, तेव्हापासून हे `साठसाली` कोण आणि हि नखशिखांत बुरख्यात वावरणारी ` कालेवली माँ` काय प्रकरण आहे ह्याबद्दल नायकाला उत्सुकता वाटायला लागते . आदिवासींच्या सांगण्यानुसार साठसाली हि जंगलातल्या आतल्या भागात राहणारी अतिशय कट्टर अशी आदिवासी जमात आहे आणि त्यांच्या भागात कोणालाही सहज प्रवेश मिळत नाही, `कालेवली माँ ` चा रहस्यभेद मात्र लगेच होत नाही.
नायकाला आता ह्या भागात येऊन 2,3 वर्ष झालेली असतात, उन्हाळ्याच्या दिवसांमधे रखरखीत निष्पर्ण झालेल्या ह्या जंगलात आग लागते आणि ही आग हा हा म्हणता पसरत जाते, हा वणवा विझवण्याच्या कामी सरकार, तिथे काम करणारे स्वयंसेवक, आदिवासी सगळे एकत्र येतात, त्यात येणारी छोटी खेडी, आदिवासी पाडे रिकामी करायला लागतात, नायकाला हे संकट नवं असतं पण आता तो इथे सरावलेला असतो, ह्या प्रसंगामुळेच इथल्या प्राथमिक शाळेच्या ध्येयवेड्या शिक्षकाची आणि त्याची मैत्री होते. दरम्यानच्या काळात ह्या सगळ्या घटनांची माहिती, त्याचं निरीक्षण, अनुमानं हे सगळं तो जमेल तसं प्रो. रुडॉल्फ आणि ल्युसी ह्यांना पाठवत असतो, आपल्या अभ्यासाचा एक भाग म्हणून ल्युसी इथे येते, ह्या भागात फिरते तिला हवी ती माहिती गोळा करते, तिच्यासोबत फिरताना नायकाला कालेवाली माँ ला भेटण्याचा योग येतो ही कालेवाली माँ म्हणजे दुसरीतिसरी कोणी नसून सुपरियाची आई असते, ह्याच प्रवासात ` जिंदा सागबान ` चे सुद्धा नायकाला दर्शन होते. दैवी भासणारा हा सागचा सदाहरित वृक्ष म्हणजे जणू ह्या संपूर्ण जंगलाचा पुराणपुरुष असतो, अवघ्या चराचर प्राणिसृष्टीचा पोशिंदा असतो. तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं वाईट काम कधीही केलं नसेल तर तुम्हाला इथे कुठलाही धोका नाही उलट तुम्ही ह्या वृक्षाच्या छत्रछायेत अगदी सुरक्षित आहात अशी आदिवासींची समजूत असते. ल्युसी ह्या सगळ्याच प्रकरणाकडे खूप तार्किक,वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असते अर्थात नायकाचा सुरवातीचा दृष्टीकोन काही फारसा वेगळा नसतो पण आता इथे राहून तो ह्या सगळ्याबद्दल जास्त खोलात जाऊन विचार करू लागतो आणि त्यामुळेच ल्युसी जेव्हा त्याला इथून परतण्याबद्दल, स्वतःच्या नात्याबद्दल विचारते तेव्हा तो तिच्याकडे ह्या सगळ्यासाठी वेळ मागतो. नर्मदा ही निव्वळ नदी नाही तर ती एक जिवंत अनुभूती आहे हे इथल्या लोकांचा मानणं त्यानं सुरवातीला नाकारलेलं असतं पण त्याला आलेल्या काही अनुभवांवरून , अचानकपणे घडलेल्या परिक्रमेवरून तो गोंधळून जातो. शूलपाणीच्या जंगलात येणाऱ्या नायकाला तिथले आदिवासी लुटतात, त्याच्याजवळचं होतं नव्हतं ते सारं काढून घेतात आणि वरून हा नर्मदा मैय्याचा आदेश आहे असं सांगतात, नायक म्हणतो का असा आदेश देत असेल मैय्या ? आधीच निष्कांचंन, थकलेल्या जीवाकडून त्यांना काय मिळणार? पण जिवंत राहण्यासाठी तडफडणारा हा उपाशीतापाशी वस्त्रविहीन प्रवासी जेव्हा इथून बाहेर येईल तेव्हा `अहं ब्रह्मस्मि। ` हा त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट होईल आणि `तत् त्वं असि।` अर्थात ` ते तू आहेस` ह्या सृष्टीत जे काही दैवी आहे ते अंशरूपाने तुझ्यात आहे आणि जे तुझं आहे, तू प्राप्त केलं आहेस तेच ह्या सृष्टीत परत जाणार आहेस हे ज्ञान त्याला प्राप्त होईल. आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात नायकाच्या मनातल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतात, आपलं हरवलेलं मुल परत आल्यावर आई जसे त्याचे सगळे हट्ट पुरवेल तसंच त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नर्मदा मैय्या सुद्धा त्याला स्वतःच नाव सांगून दर्शन देते आणि इथे कादंबरी संपते .
ही कादंबरी वाचतांना आपल्याला सुद्धा अनेक प्रश्न पडतात, इतके विविध धर्म, समाज ,पंथ, जाती ,उपजाती त्यांचे आचारविचार असणाऱ्या आपल्या देशात असं काय आहे की जे भारतीय म्हणून आपल्याला इतकी शतकं एकत्र ठेवतय, हो अगदी एक देश म्हणून अस्तित्वात येण्याच्या अधीही आपण कुठल्यातरी सुत्राने बांधलेलो होतोच ते सूत्र वरीलपैकी काहीच नव्हतं तर कादंबरीत म्हटल्याप्रमाणे ते सुत्र होतं निसर्गाचं, त्यानं सुरु केलेल्या परंपरांचं, त्यानं रुजवलेल्या संस्कृतीचं, त्यानं दिलेल्या क्षमा, दान , परतफेड ह्या संस्कारांचं, धर्म हा कधीच इथल्या लोकांसाठी महत्वाचा नव्हता धर्म म्हणजे जीवन चांगल्या तऱ्हेने जगण्यासाठी सांगितले गेलेले नियम. इतका सरळ अर्थ सांगून कादंबरीचा शेवट होतो अर्थात आपल्या मनात मात्र ती सुरुच राहते कारण चिंतन , विचार ही एक प्रक्रिया आहे आणि तेच आपल्या जीवंतपणाचं लक्षण आहे .
© अश्विनी गोरे ...Read more