DAINIK AIKYA 12-02-2006यशस्वितेचा राजमार्ग...
दि मॅजिक ऑफ द थिंकिंग बिग (भव्य विचार करण्याची जादू) हे डेव्हिड जोसेफ श्वार्त्झ यांचे बेस्ट सेलर पुस्तक. त्याचा मराठी अनुवाद प्रशांत तळणीकर यांनी केला आहे.
पुस्तकाच्या शीर्षकातच आपले विचार, आपल्या कल्पना भव्य हव्या हे सूचित ेले आहे. अशा विशाल, भव्य, व्यापक, विचार कल्पनांमुळे मोठी किमया घडून येते. त्यामध्ये अद्भूत, विलक्षण शक्ती किंवा जादू असते. त्यामुळे मोठे परिवर्तन घडून येऊ शकते, याकडे हे शीर्षक लक्ष वेधते. हा भव्य विचार आपण प्रत्येक बाबतीत करू शकतो. करावा. आपली आत्मप्रतिमा आपण उन्नत स्तरावर न्यावी; आपले ध्येय व उद्दिष्ट भव्य असावे, आपला आत्मविश्वास वाढावा, आपली कार्यप्रवणता वाढावी, उत्तम कृती घडून यावी आणि इतरांपेक्षा अधिक काहीतरी आपण करून दाखवावे, यशस्वी व्हावे... याला प्रेरक ठरणारे एकूण वातावरण आपण निर्माण करावे, हे या पुस्तकाद्वारे अधोरेखित केले जाते. नो फेल्युअर बट लो एम इज क्राईम - अपयश हा गुन्हा नव्हे, अल्प वा क्षुल्लक आकांक्षा हा गुन्हा नव्हे, ध्येय नेहमी उच्च आणि उदात्त हवे. जगात चांगलं किंवा वाईट असं काहीही नसतं. आपण ज्या प्रकारे विचार करतो. त्यावरून एखाद्या गोष्टीवर आपण चांगल्या वाईटपणाचा शिक्का मारत असतो. असे शेक्सपिअर म्हणतो, तेव्हा आपणास आश्चर्य वाटते. आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या, यशस्वी ठरलेल्या व्यक्तींच्या आयुष्यावर दृष्टिक्षेप टाकला, त्या यशाला पायाभूत ठरलेल्या गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर काय लक्षात येते? डेव्हीड श्वार्त्झ यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना भव्य विचार करण्याची क्षमता, मोठं यश मिळवण्याची जिद्द ते भव्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य त्या साधनांचा किंवा मार्गाचा अवलंब करण्याची क्षमता याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
हे संपूर्ण पुस्तक या सूत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक ती सामग्री पुरवते. त्यासाठी सोप्या पद्धती सुचवते. या सोप्या पद्धती जगात कुठेही आणि केव्हाही काम करतात. जादूसारख्या चमत्कार करून दाखवतात, असा लेखकाचा आत्मविश्वास आहे. ‘भव्य विचार कराल तर भव्य जीवन जगाल. अधिक आनंद मिळवाल. पैसा, मित्र, मान-सन्मान, यश यादृष्टीने समृद्ध जीवन जगाल, अशी धारणा लेखक व्यक्त करतो.
या पुस्तकातील प्रकरणांच्या मांडणीतून या सर्व सोप्या पद्धती स्पष्ट होत जातात. एकापुढे एक तर्कसंगत असा युक्तिवाद त्यातून समोर येतो.
१. आपण यशस्वी होणार, असा आत्मविश्वास बाळगा.
२. कारणेरिया (अपयशाबद्दल इतरांना दोष देत बसणे, कारणे सांगत बसणे) या रोगापासून सोडवणूक करून घ्या.
३. आत्मविश्वास वाढवा. भयाला हद्दपार करा.
४. भव्य विचार करा. तो करण्यासाठी पाळावयाची पथ्ये कोणती?
५. सृजनात्मक विचार करा. सर्जनशील स्वप्ने बघा.
६. तुमची आत्मप्रतिमा जी असेल, ती प्रत्येक बाबतीत निर्णायक ठरते. तुम्ही स्वत:ला जे समजता, तेच तुम्ही असता; तेच तुम्ही बनता.
७. तुमच्या भोवतालच्या वातावरणाचं योग्य व्यवस्थापन करा. ते करताना उच्च दर्जाची कास धरा.
८. तुमच्या मनोभूमिकेचा विधायक उपयोग करून घ्या.
९. इतर लोकांबद्दल विचार करताना तो सकारात्मक राहील, अशी काळजी घ्या.
१०. कृतिशील रहा.
११. पराजयाचे रूपांतर विजयात करणे शक्य असते. ते कसे होऊ शकते?
१२. स्वत:ची प्रगती साधण्यासाठी ध्येयांचा उपयोग करा.
१३. नेत्यासारखा विचार करा. नेतृत्वगुणांचा वापर करा.
भव्य विचार, भव्य उद्दिष्ट, भव्य प्रयत्न आणि भव्य यश यांचा ध्यास घेतला तर त्यात तुम्ही सफल होऊ शकता.
यश म्हणजे सुंदर, चांगल्या गोष्टी.
यश म्हणजे व्यक्तिगत भरभराट.
यश म्हणजे सुंदर घर, भरपूर सुखसोयी, भरपूर प्रवाह, नवनव्या वस्तू.
यश म्हणजे मुलाबाळांना विकासासाठी उत्तम वातावरण.
यश म्हणजे नेतृत्व.
व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान.
यश म्हणजे स्वातंत्र्य, आत्मसन्मान, आनंद, समाधान.
यश म्हणजे सिद्धी, विजय, पराक्रम.
तुमचं मन म्हणजे विचारांचा कारखाना.
भव्य विचार करा. संकुचित विचार टाका असे लेखक सुचवतो. तेव्हा आपण त्यादृष्टीने आरंभ कसा करावा, असा प्रश्न पडला तर तो स्वाभाविकच होय. त्यासाठी काही सोपे मार्ग चोखाळता येतात. आपण विचार करताना सकारात्मक असतो की नकारात्मक हे प्रथम जाणवून घ्या. म्हणजेच स्वत:ला जाणून घ्या. स्वत:चीच अशी चाचपणी करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्यातील पाच मुख्य चांगल्या गोष्टी शोधून काढा. चांगल्या गोष्टी म्हणजे शैक्षणिक पात्रता, कार्यानुभव, तांत्रिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, सुखी कौटुंबिक जीवन, नेतृत्वगुण, विधायक मानसिकता, मित्रमंडळी, आत्मविश्वास इत्यादी आणि त्या प्रत्येक चांगल्या गोष्टीखाली ज्याची अंगी तुमच्याएवढ्या प्रमाणात त्या नाहीत, पण तरं ज्यांनी सश मिळवलेलं आहे अशा तुमच्या माहितीतल्या किमान तीन-तीन अत्यंत सशस्वी म्हणता येईल अशा व्यक्तींची नावे लिहा.
या प्रक्रियेतून तुमच्या लक्षात एक गोष्ट नक्की येईल की अनेक यशस्वी लोकापेक्षा किमान एखाद्या बाबतीत तरी वरचढ आहात तुम्हाला वाटते त्यापेक्षा तुम्ही कितीतरी मोठे आहात. तेव्हा तुमचे विचार तुमच्या मोठेपण जुळवून घ्या. तुम्ही जितके मोठे आहात, तेव्हा भव्य विचार करा.
आपली स्वत:ची आत्मप्रतिमा विशाल, सकारात्मक करणे; समोर उच्च, भव्य ध्येय ठेवणे, आपली प्रतिमा लोकांना आवडेल अशा प्रकारे तयार करणे, मित्र व सहकारी यांच्या सकारात्मक दृष्टीने बघणे आणि आपल्या भव्य विचारांना कृतीत आणण्यासाठी आत या क्षणापासून आरंभ करणे असा हा मार्ग या पुस्तकाद्वारे आपल्यासाठी खुला होत आहे लेखकाने विवेचन करताना अनेक उदाहरणे दिली आहेत. त्यातून मानवी स्वभावाचे, वृत्ती वेगवेगळे नमुने पेश केले आहेत. निरनिराळ्या संस्थांच्या अडचणींचे व त्यातून त्यांनी काढलेल्या उत्तराचे विश्लेषण केले आहे.
त्यामुळे हे पुस्तक तुमच्या आयुष्याला एक वेगळे वळण देऊ शकेल. आसपासच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ ठरण्यासाठी तुम्ही फार प्रतिभावंत, बुद्धिमान आणि उपजत हुशार असायला हवे, असे नाही. यश मिळवून देणे, भव्य विचारांना कृतीची जोड देऊन, त्याचा सुनियोजित कार्यक्रमच या पुस्तकाद्वारे तुम्हा आत्मसात करता येईल. त्यायोगे आपल्या भावी आयुष्याला एक यशस्वी, सकारात्मक सुंदर आकृतिबंध देता येईल.
-संदीप अडनाईक ...Read more