SHABD RUCHI, MAY 2018मातृत्वाचा जल्लोष दि मदर डान्स...
वाढत्या मुलांशी कसे वागावे हा पालकांसमोरचा कळीचा प्रश्न! जगभरातील माता या प्रश्नाने धास्तावलेल्या असतात. ‘मदर डान्स’ या पुस्तकात हॅरिएट लर्नर ही लेखिका प्रत्येक आईशी मनमोकळा संवाद साधत या मानसशास्त्रीय प्रश्नाला भिडे.
मुले मोठी होईतोवर म्हणजे कायदेशीररीत्या पाहिले तर वय वर्षे १८ नंतर, सज्ञान होईपर्यंत पालकांवर त्यांच्या सांस्कृतिक पालनाची जबाबदारी आहे असे समजले जाते. जगभर ही प्रथा आहे पण आपल्या समाजात मात्र विशेषत: मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय समाजात मुले, म्हणजेच मुलगे आणि मुलीसुद्धा बराच काळपर्यंत, पालकांच्या छत्रछायेखाली असावीत असे मानले जाते, विशेषत: विवाहापर्यंत. जातीच्या शुद्धतेचे महत्व असल्याने त्यांची लग्ने एकदा जातीत करून दिली की मग आईबाप निश्चिंत होतात, पण हे छायाछत्र कसे सांभाळायचे, आर्थिकह्ष्ट्या नाही पण भावनिकह्ष्ट्या याबद्दल मात्र फारच कमी चर्चा होतांना दिसते. आजकाल जागृत पालक काही प्रमाणात मानसशास्त्रज्ञांची मदत घेऊ लागले आहेत, पण तीही एखादी केस फारच हाताबाहेर जाऊ लागली आहे असे वाटले तर! नाहीतर शिस्त लावणे म्हणजे चांगले वाईट आपणच ठरवून किंवा परंपरांचा आधार घेऊन मुलांना जरबेत ठेवणे, ती आपल्यावर विशेषत: आर्थिकह्ष्ट्या अवलंबित आहेत याचा फायदा घेऊन, त्याचा उच्चार करत किंवा वेळप्रसंगी त्यांना आवडत्या वस्तूपासून वंचित करून, मारहाण करूनही त्यांच्यावर आपल्याला योग्य वाटतील ते संस्कार करणे यातही त्यांना काही वावगे वाटत नाही. अर्थात पालक म्हटले की त्यामध्ये आई आणि वडील किंवा दोघांपैंकी एक किंवा दोघेही नसतील घरातील दुसरी मोठी माणसे त्यांना या संस्कारांचे ओझे सांभाळावे लागते. पण मुख्यत: आई ही मुलांसाठी अधिक जबाबदार ठरविली जाते.
ही एकाअर्थाने जगभरची परिास्थिती आहे. हे जबाबदार असणे आईनेही आजपर्यंत मान्य केले आहे. ते खरोखर आवडीने की वडील जबाबदारी घेत नाहीत असे वास्तव असल्यामुळेही असावे असे मला वाटते. आई नोकरी करतानाही ही जबाबदारी सांभाळत असते आणि त्यासाठी गरज पडली तर नोकरीचा त्याग करणे किंवा कमी जबाबदारीची नोकरी घेणे, करिअरिस्ट न होणे असेही मार्ग ती शोधून काढत असते. संस्कार करताना, चांगले वाईट शिकविताना नवऱ्याची साथ मिळावी, निदान त्याने तिने घेतलेले धोरण समजावून घेऊन साथ करावी, मुलांदेखत तिच्या धोरणाला विरोध करू नये, पैशाच्या जोरावर, मुलांचे हट्ट पुरवीत मुलांचे मन सहज किंवा स्वस्त पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करून आईबद्दल त्यांच्या मनात द्वेष, किंवा दूरत्व निर्माण करू नये एवढी तिची अपेक्षा नक्कीच असते.
एका समंजस आईला, (केवळ शिकलेली नाही) काय-काय प्रकारचे ताण सहन करावे लागतात, डोळ्यात तेल घालून आपली मुले वाईट मार्गाला जाणार नाहीत ना, यासाठी केवळ धाकदपटशा न दाखविता, पण वेगवेगळ्या मार्गाने त्यांची मने कशी वळवता येतील याचा विचार करायला लावणारे पुस्तक म्हणजे ‘मदर डान्स’. मी मुद्दाम ‘शिकलेली आई’ असा शब्दप्रयोग न वापरता जाणूनबुजून समंजस आई असा वापरला आहे त्यामध्ये एखादी गरीब घरातील आईसुद्धा मला अभिप्रेत आहे. सुशिक्षित असणे आणि आईची भूमिका समजावून घेऊन, वेळप्रसंगी स्वत:च्या इच्छा, आकांक्षा मागे सारून मुलांना एक समंजस, मानवाधिकाराची जाण असलेला, लोकशाही मूल्यांवर विश्वास असणारा आदर्श नागरिक बनविणे ही महत्त्वाकांक्षी भूमिका एखादी गरीब घरातील, कनिष्ठ जातीतील आईसुद्धा सार्थ करते अशी उदाहरणे आहेतच. कुटुंबातील नातेसंबधांचे बारकावे, गुंतागुंत समजावून घेत-घेत ही आई मुलांना सुसंस्कृत करत असते. त्यांच्या राग लोभांचे निरीक्षण करत अनेक कठीण प्रसंगी सर्वांना न्याय्य वाटेल असा मार्ग काढायचा प्रयत्न करते. भावंडांमध्ये ‘तो तुझा अधिक लाडका, मी दोडकी’, किंवा उलट अशा पद्धतीचे रिमार्क्स/टिप्पण्या तिला नेहमीच ऐकायला मिळतात. त्यापासून स्वत:ला सोडवून घेत, ‘तू जुनाट मतांची आहेस, जग किती बदललंय’ अशीही टिप्पणी ऐकायची तिला सवय करावी लागते. बदलत्या वयानुसार वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या विषयांना सामोरे जात त्याविषयी धोरण आखण्याची तिची जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडण्यासाठी विश्लेषण करण्याची सवय लावणे, स्वत:लाही तपासून पहाणे कसे महत्त्वाचे आहे हे ह्या पुस्तकातून लेखिका समजावून देते. लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि त्यातूनही कुटुंब व नातेसंबंध यातीलही खास शिक्षण तिने घेतले आहे. समुपदेशनाचे कामही ती करते. त्यामुळे खूपशी उदाहरणे स्वत:च्या मुलांच्या संबंधातील तसेच तिच्याकडे येणाऱ्या पालक व मुले यामधील संबंधातील, तिच्या लेखनात येतात. साधी, सोपी भाषा, नर्म विनोद यामुळे पुस्तक वाचताना प्रसन्न वाटत रहाते.
लेखिकेने आई व मुले यांच्या संबंधातील चार टप्पे येथे चित्रित केले आहेत. ‘आरंभ’ या पहिल्या टप्प्यात गर्भधारणा आणि जन्म, या कालावधीत थोडी संभ्रमित अवस्था ज्यामध्ये आपण माता होण्यासाठी योग्य आहोत का? या प्रश्नाची तपासणी करण्याचा अवसर मिळतो आणि त्याची आवश्यकता असते असे प्रतिपादन केले आहे. त्याचवेळी एक व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून तुमचा एक मार्ग तुम्हाला खुणावत असतो आणि त्याच वेळी तुमच्या मुलाशी संलग्न माता म्हणून नवीन आयुष्याला सुरवात होत असते.
मुलांना त्यांचे असे व्यक्तिमत्त्व हळूहळू प्राप्त होत जात असते. त्यांच्यावर संस्कार करणे ह्या जबाबदारीने आई सतत काळजी करायला लागते. मुले पडली धडपडली तरी त्यांची काळजी आणि त्याच वेळी हे सर्व आपल्या चुकीमुळे घडतंय का? आपण पुरेसे जागृत नाही आहोत का? असे स्वत:कडे दोषी म्हणून पहाण्याचे हे दिवस. मुलांचे हट्ट चुकीचे असतील तर आपली मते लादू न देता त्यांना कसे पटवायचे, किती प्रमाणात त्यांचे स्वातंत्र्य अधोरेखित करायचे आणि किती प्रमाणात ती आपल्यावर अवलंबून आहेत याचे भान त्यांना द्यायचे अशी तारेवरची कसरत आईला करावी लागते. असा आईच्या अग्निपरीक्षेचा टप्पा हा दुसरा टप्पा आहे.
तिसरा टप्पा ‘मोठी मुले-मोठी आव्हाने’ यावर लक्ष केंद्रित करतो. येथे अन्नाच्या योग्य सवयी आणि लैंगिकतेचे भान येऊ लागल्यावर आईची उडणारी धांदल याचे अतिशय सुंदर वर्णन लेखिकेने केले आहे. आपल्याकडेही आईच्या जिवाला या काळामध्ये घोर लागतोच. विशेषत: मुलीच्या आईला! पण काही प्रमाणात मुलाच्याही बाबतीत हे खरे असते. समाजाच्या संकेतांविरोधी काही घडत नाही ना, याची काळजी जीव पोखरून काढते. बरं मुलांबरोबर बोलायचीही चोरी त्यामुळे त्यांच्या वागणुकीच्या निरीक्षणातून काही कळले तरच धोका टाळण्याची शक्यता. त्यामुळे आपल्याकडील बहुतेक पालक, विशेषत: वडील तर सतत मुलांना अतिरेकी पद्धतीने धारेवर धरत असतात. आई अधिक संवेदनाशील असायची शक्यता पण तीही नवऱ्यापुढे नांगी टाकते आणि शरीरभान आलेल्या मुलामुलींना स्वतंत्रपणे हाताळण्याची जबाबदारी टाळत जाते. अमेरिकेत तर व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना पिढीबरोबरच बरीच पुढे जात असल्यामुळे आईला सतर्क राहूनच गरजेप्रमाणे मुलांच्या मदतीला कसे जाता येईल याचा संवेदनशीलतेने प्रयत्न करावा लागतो. याच काळात मुले भावंडे म्हणून एकमेकांच्यापासून दूर जात असतात. त्यांच्या प्रत्येकाचे वेगळे विेश तयार होत असते. आणि आईला एक प्रश्न सतावत राहतो की आपण हे कुटुंब एकत्र रहावे म्हणून खूप प्रयत्न केले आणि भविष्यामध्ये मुलांना अडचणीच्या काळात एकमेकांची साथ मिळावी अशी मनापासून प्रार्थना केली, पण त्यांचा संवाद टिकून राहील का?
चौथा टप्पा खरं म्हणजे मुले उडून गेली, ‘घरटे रिकामे’ झाले की मातेचे मन कसे होते याचे वर्णन करणारा आहे. त्यामध्ये नवऱ्यालाही आणले आहे. मुले दूर गेल्याचा त्यालाही त्रास होत असतो असा तिचा अनुभव आहे. तिच्या मैत्रिणीने मात्र ह्या ‘रिकामे घर सिंड्नोम’ संकल्पनेला खूप विरोध केला आहे. तिच्या मते सतत बायका या बिचाऱ्या आहेत असे म्हटले जाते तसेच मुले घर सोडून गेली की पालकांना आयुष्यच रहात नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मग तिने तिच्या आईचे उदाहरण दिले आहे. तिच्या आईने आपल्या आवडत्या विषयाला, पेंटिंग्जना पूर्ण वेळ देऊन टाकला होता. तिला लोकांनी असेही सांगितले की घरटे रिकामे झाल्यावर दोन पिढ्यांमधील संवाद अधिक मोकळा होतो. तिचा सल्ला आहे की आभासमय जुन्या विशाकडे स्वप्नवत् पाहाणे सोडून देणे आवश्यक आहे. जुन्या सोनेरी दिवसांची आठवण काढून आपण त्यामध्ये रमू शकणार नाही.
तिने तरुण मातांना अनेक टिप्स दिल्या आहेत. काही आया मुलांमध्ये काही दोष निघाला, उनाडपणा आला, किंवा उर्मटपणे वागायला लागली की स्वत:ला दोष द्यायला लागतात. सतत अपराधीपणाची भावना वागवितात. ते अगदी चुकीचे आहे. मुलांना रागवावे, कडक शिक्षा करावी, पण गरज पडली तर क्षमासुद्धा मागता यावी. मुलांना न्यायाची अपेक्षा असते. आपले सगळे निर्णय योग्यच असतील, आपण शंभर टक्के चांगली आई झाले पाहिजे, हा सर्वोत्तम होण्याचा अट्टाहास टाळा. अनेक आया मुलांची सतत चिंता करतात, मुख्यत: त्यांना काही अपघात होईल का, संकटे कोसळतील का याची भीती बोलून दाखवितात. काळजीमागील वेदना सतत ठसठसत राहाते. आपल्याला मरण आले तर मुलांचे कसे होईल? ती अनाथ झाली तर त्यांचा विकास कसा होईल अशा अनंत भ्रामक काळज्या मनात बाळगल्या तर त्यांना सृजनशीलतेने मुलांचे प्रश्न सोडविता येणार नाहीत. काळजी आणि सृजनता यांचे नाते परस्परविरोधी असते म्हणूनच लेखिका आयांना सल्ला देते की तुम्ही तुमच्या मनाची शांतता कशी टिकेल याचा विचार करा. जॉगिंग, ध्यान धारणा, एखादा छंद असे काही उद्योग निवडा.
दोन उदाहरणातून तिच्या सूक्ष्म ह्ष्टीचा परिचय करून देता येईल. तिचे आणि तिच्या दुसऱ्या मुलाचे, बेनचे, खोली आवरणे या विषयावरून खूप वाद होत असत. ती मुलांसाठी विशेष विचार करून नियम बनवीत असे आणि त्याची अंमलबजावणी तीव्रपणे व्हावी असे तिला प्रामाणिकपणे वाटे. ती सतत त्याला आठवण करून देई आणि तरीही तो तिच्या उपदेशाचे पालन अजिबात करत नसे. ती बोलून दाखवे की तिच्या मोठ्या मुलाने कसे हे कायदेकानून बिनातक्रार पाळले होते आणि हे त्याच्याच भल्यासाठी होते. उद्या होस्टेलला गेल्यावर त्याला उपयोगी पडतील असे होते. शेवटी तिने नाद सोडला. पंधरा-वीस दिवसांनी तिच्या लक्षात आले की बेन, धाकटा मुलगा आपणहून खोली आवरून ठेवायला लागला आहे. थोरल्या भावाशी केलेली तुलना त्याला आवडली नव्हती. तिने निष्कर्ष काढला होता की त्याला सारखं मोठ्या भावाचे उदाहरण दिलेले आवडायचे नाही. मी वेगळा आहे. ‘माझे निर्णय मी घेईन’, ही भावना त्याच्या पाठी होती. तसेच पुढे एकदा कानात डूल घालण्यावरून वाद झाला. त्याकाळी आजच्यासारखी सरसकट मुलांनी कानात डूल घालायची प्रथा नव्हती. तिने आणि नवऱ्याने पण विरोध केला. तरी बेनने पुन्हा-पुन्हा विषय धरून ठेवला. त्यांनी त्याला सोळाव्या वर्षापर्यंतची मुदत दिली. तोपर्यंत `तू आमचे ऐकले पाहिजे’ हे एकच धोरण ते पुन्हा-पुन्हा, न कंटाळता ते सांगत राहिले. त्यानेही एकच धोशा लावला. शेवटी पंधराव्या वर्षीच्या वाढदिवसाला त्यांनी त्याच्या हातात पैसे ठेवले आणि परवानगी दिली. बेन बेहद्द खूश झाला. त्याचा आईवडिलांवरील विश्वास वाढला आणि लेखिका म्हणते की मी शिकले, ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करता कामा नये. मुलांच्या मनात द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.’
लैंगिकतेबाबतही लेखिकेने एका सल्ला मागणाऱ्या स्त्रीचे उदाहरण दिले आहे. पंधराव्या वर्षी तिच्या मुलीच्या खोलीत तिला तिच्या पलंगाखाली ठेवलेली मैथुनाची चित्रे दाखविणारी पुस्तके मिळाली. ती घाबरून गेली आणि धावत सल्ला मागायला आली. ‘आतापासून हे काय चाललंय? हे बरोबर आहे का?’ तिच्या मनात प्रश्न होते. मुलगी आतापासूनच लैंगिक व्यवहार करायला लागली असेल तर खूप जड जाईल आपल्याला. पाळत ठेवणेही प्रशस्त दिसत नाही. प्रश्न विचारायला लागले तर ती अधिकच दूर जाईल. लेखिका म्हणते की, मी तिला तिच्या मनात डोकावयाला सांगितले. ‘तू त्या वयात काय करत होतीस? तू ही माहिती मिळविण्याचे प्रयत्न कसे केले होतेस? कदाचित तुला ही शारीर भावना सोळाव्या वर्षी झाली असेल, पण नव्या पिढीमध्ये कदाचित ही भावना लवकर येत असेल. शिवाय व्यक्ती वेगवेगळ्या असतात. तू आणि तुझी मुलगी एकाच पद्धतीने वाढेल, विचार करत असेल असे तू का समजतेस? तिच्या शाळेतील वातावरण, मित्रमैत्रिणी हा माहोलसुद्धा वेगळा असेल. लेखिका म्हणते की, मी तिला दोष देत म्हटले की तू तिच्या खोलीत का गेलीस? आणि तिच्या बेडखाली शोधावेसे तुला का वाटले? मुलांचा खासगीपणा टिकविणे आवश्यक असते. नाहीतर ती अधिक दूर जातात.
मुलांबाबतीत अनेक छोटे मोठे निर्णय घ्यावे लागतात, पण त्यासाठी तर्कशुद्ध धोरण ठरविणे महत्त्वाचे असते. ती म्हणते की दोन टोकाच्या भूमिका पहायला मिळतात. मानसिकरीत्या सर्व ताब्यात ठेवणारे अतिरेकी पालक किंवा जबाबदार, शहाणे, समंजस पालक. आपण एकच प्रश्न विचारायला हवा की माता मुलांच्या मनाचा पूर्ण ताबा घेऊ शकते का? आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की प्रौढांकडे अधिक सत्ता असली की त्याचा नातेसंबंधांवर निश्चित परिणाम होतो. लेखिका आवर्जून सांगते की योग्य तऱ्हेने मातृत्वाच्या जबाबदाऱ्या राबविल्या गेल्या तर खरोखरंच ‘मातृत्वाचा जल्लोष’ अनुभवता येतो.
‘एखाद्या अनुभवी मातेने मारलेल्या गप्पा’ असे या पुस्तकाचे स्वरूप असल्याने ते वाचनीय झाले आहे. मराठीतही जयश्री गोडसे यांनी या पुस्तकाचा रसाळ अनुवाद केला आहे.
- छाया दातार ...Read more