UTTARARDH BY VIJAYA RAJADHYAKSHA- SHORT STORIES
‘उत्तरार्ध’ हा विजया राजाध्यक्ष यांच्या पूर्वप्रकाशित वाचनीय कथांचा संग्रह. यात त्यांच्या एकूण चौदा कथांचा अंतर्भाव आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात येणारं अटळ एकाकीपण (मग ते शरीराने येणारं असेल किंवा मनाने) या एका सूत्रात या सर्व कथा गुंफलेल्या आहेत. कथेतील मध्यवर्ती पात्रांच्या आयुष्यातील ‘उत्तरार्ध’ वेगळे संदर्भ, वेगळी पाश्र्वभूमी आणि वेगळे नातेसंबंध अशा वेगवेगळ्या रूपाने आपल्या समोर येतो. आपल्या ओघवत्या भाषेने विजयाताई वाचकांना त्या त्या व्यक्तिरेखेच्या भावविश्वात घेऊन जातात. मग ती व्यक्तिरेखा परिचयाची किंवा कदाचित आपल्या घरातील वाटू लागते. तिच्या भावभावनांशी, सुख-दु:खाच्या आंदोलनांशी वाचक एकरूप होतो. या व्यक्तिरेखा आयुष्यातील संधिकालाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रातिनिधिक वाटू लागतात. खरेतर इतरांकडून (घरातल्या आणि बाहेरच्या) बाळगलेल्या अपेक्षांचे ओझे सुख-दु:खाशी निगडित असते. आशा-निराशेचे चढ-उतार त्यामुळेच निर्माण होतात.
‘उत्तरार्ध’मधील कथांमध्ये आयुष्यातील विविध रंगांची सर्वसमावेशकता वाचायला मिळते. या कथा विजयातार्इंच्या प्रगल्भ जीवनचिंतनाचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. वाचनातला आनंद आपण सारेच या अशा पुस्तकातून अनुभवत असतो.