- सौ अपर्णा अनंत मिसे, ठाणे पश्चिम
* नमस्कार मंडळी, *वलय* मराठी भाषेला आणि मनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे वपु काळे हे उत्तम लेखक आहेत. त्यांच्या लिखाणाची शैली ही अतिशय सहज सोपी आहे. आयुष्याचा सार समजावून सांगणं हे प्रत्येक लेखकाला जमत नाही. योग्य रीतीने शब्दांची सांगड घालून तो विचा लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही कला वपुंना लिलया जमली. वपुंचा एक सुंदर विचार खूप आवडतो, *कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये असह्य झालं तर, अलिप्तच व्हावं पण उपदेशक होऊ नये* नात्यांचा भक्कम पाया हा संवादच असतो. म्हणून वपुंनी जास्त भर दिला तो संवादावर. तर चला बघूया वपुंची ही संवादात्मक कथा. या पुस्तकात एकूण १२ लघुकथा आहेत. त्यातील निवडक तीन कथांचा सारांश देत आहे. *शेखर वर्गात बसलेला आहे* समोरच्या इमारतीतून मुलांचा लोंढा फुटलेल्या पाटातून पाणी वाहून जावं तेवढ्या वेगाने बाहेर रस्त्यावर लोटत होता. "शाळेतून सुटणारी मुलं म्हणजे उतरत्या पाटावरून सैरावैरा धावणारे मोहरीचे दाणे." कालच्याप्रमाणे ती आजदेखील अवघडून उभी होती. वर्ण सावळा, उंची बेताचीच, कपाळाला ठसठशीत कुंकू हे सर्व न्याहाळत मी तिच्यासमोरून शाळेच्या दरवाज्यापाशी पोहोचलो. मुलांची झुंबड दूर लोटीत मी सुहासच्या वर्गापाशी थांबलो .मला पाहताच तो म्हणाला ,"बापू .आज काही अभ्यासच दिला नाही." "मग काय मजाच". मी त्याला घेऊन रस्त्यावर आलो. ती अजून तशीच उभी होती. नजरा नजर झाली व ओळख असल्याप्रमाणे सुहास कडे बघून म्हणाली," मुलगा का"? "गोड आहे". "तुमचं कोणी यायचं आहे का?" माझा भाचा यायचा आहे अजून. मुलांची ही गर्दी सर्वांचे सारखेच युनिफॉर्म असल्यामुळे ओळखता येत नाही. त्यावर पटकन ती म्हणाली, "आज त्याचा वाढदिवस आहे. सलवार आणि झब्बा वर जॅकेट घातलेलं आहे". "मग सोपं आहे मी आणतो वर्गात जाऊन तुम्ही थांबा इथंच". "सुहास, मावशी जवळ थांब मी आलोच एवढ्यात. "तुमच्या भाच्याचं नाव?" "शेखर,पहिलाच वर्ग डाव्या हाताचा." गर्दीतून मी परत आत गेलो पण वर्गात कोणीच नव्हतं. "वर्गात कोणीच नाही"? "वाटलंच मला असा हुड आहे अगदी मी यायच्या आत पळ काढतो ." "घरीच जाईल ना व्यवस्थित?" "जाईल हो, पण वाटेत दोन मोठाली क्रॉसिंग आहेत, भीती वाटते." दुसऱ्या दिवशी ती मला परत शाळेपाशी दिसली. माझ्याकडे पाहून ती हसली. मी पटकन विचारलं ,"काय शेखर बरोबर आला होता ना घरी?" "अय्या , तुमच्या लक्षात होतं वाटतं ?" "आमचं घर एवढं जवळ आहे. म्हणजे शाळेची घंटा ऐकायला येते. तरीही माझी सुहासला सक्त ताकीद आहे की, मी किंवा आई आल्याशिवाय शाळा सोडायची नाही ". "तुम्ही इथेच राहता?" ती म्हणाली, "मी बहिणीकडे राहते". "मी जर इथे बहिणीकडे रहायला नसते तर ,तिची खूपच ओढाताण झाली असती. माझी अक्का तर मला यासाठी दिवसातून दहा वेळा शाबासकी देते". असे म्हणत निरोप घेऊन दोघेही निघाले. दुसऱ्या दिवशी सुहासची आई म्हणाली, `तुमचे मित्र आले की तुम्हाला वेळेचे भानच राहत नाही`. "सुहासला आणायला तुम्ही जाता की मी जाऊ" .पण दोघांवरही तशी पाळी आली नाही. कारण सुहासने बाहेरूनच आरोळी दिली "बापू ,आई मी आssssलो!" त्याच्याकडे पहात तू एकटाच आलास ना?" त्याने गेट कडे बोट दाखवून "मावशीने पोचवलंन" "तुम्ही आलात होय ! या ना या, तुमची ओळख करून देतो. ही आमची सौ. आणि बरं का ग, ह्या शेखरच्या मावशी." नाव माहित नाही. मंगला नाव माझं. "बरं पण शेखर ?" त्याला खालीच उभा केला, तुम्ही त्याला आणायचं होतं. " जा हो तुम्ही घेऊन या त्याला" "नको नको, आज नको पुन्हा येईल परत. घरी व्यवस्थित सांगून येईल मग जाण्याची घाई राहणार नाही. येते मी!" तेवढ्याच सौ नी थांबवून पटकन शेखर साठी चॉकलेट आणून दिलेत.व ती निघाली . "हसतमुख आहे नाही मुलगी"? मंगला गेल्यावर सौ. म्हणाली. "आपल्या मास्तरांना कशी काय आहे?" " छानच आहे" मग आता तिची माहिती काढा. तिला पुन्हा घरी यायचं आग्रहाचे आमंत्रण द्या. बरं ....."भेटली की देईन"? संध्याकाळी साडेसात वाजता मंगलाला शाळेजवळ बघून नवल वाटलं ,"तुम्ही आता इथे कशाला"? " शेखर ट्रीपला गेलाय वर्गाबरोबर अजून आला नाही." " मास्तर असतील ना बरोबर"? "हो हो आहेत ना ?" "हात्तिच्या ,मग कसली काळजी?" "नाही हो, एव्हाना यायला पाहिजे होता" चला आमच्या घरी बसा. आमच्याच घरासमोरून बस जाईल. नको दहा मिनिट थांबते आणि जाते, पुन्हा येते. एक दिवस अचानक सुहास बरोबर मुख्याध्यापकांची चिठ्ठी आली. भेटायला बोलावलं म्हणून. काहीच अंदाज येईना. मधल्या सुट्टीत साडेनऊ वाजता शाळेत गेलो. "या, बसा "म्हणत मुख्याध्यापकांनी माझं स्वागत केलं. दरवर्षी पाठांतराची चढाओढ होते. तुमच्या मुलाच पाठांतर चांगलं आहे .तेव्हा त्याच नाव देत आहे. जर तो पहिला आला तर शाळेकडून एक बक्षीस. त्याशिवाय `पटवर्धन प्राईझ` मिळेल .अशी दोन बक्षीस त्याला मिळतील. गेल्या वर्षीपासून पटवर्धन नावाच्या गृहस्थांनी त्यांच्या मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ बक्षीस सुरू केले. याच शाळेत होता तो. "होता? म्हणजे?" "मागच्या वर्षीच गेला बिचारा मोटार अॅक्सीडेंटमध्ये". हा काय त्याचा फोटो लावलाय. " शेखर पटवर्धन"? मी ताडकन उभा राहिलो" हा मुलगा हयात नाही? काय सांगता?" " तो आणि त्याची मावशी जात असता ट्रकचा धक्का लागून मुलगा गेला. मावशी थोडक्यात बचावली." "इम्पॉसिबल!" मी जवळजवळ ओरडलो व खिडकीजवळ आलो .बाहेर मंगला उभी होती. माझ्या मागे सर उभे राहून म्हणाले," तीच त्याची मावशी ;डोक्यावर परिणाम झालेली!सारखी शाळेच्या आसपास असते.माझ्यामुळे भाचा गेला.बहिणीचा विश्वासघात केला. या विचाराने वेडी झाली. सोन्यासारखी पोर,पण पहा अवस्था!" बधिरपणाने मी विचारलं . "किती दिवस चालणार असं?" "कसं सांगायचं?... घंटा झाल्यावर पाच मिनिटांनी मी जातो व तिला सांगतो शेखर वर्गात बसलाय..... आणि शाळा सुटल्यावर पण, शेखर तुमची वाट बघून एवढ्यात घरी गेला असं सांगतो. केव्हा केव्हा तर त्याच्या अभ्यासाची चौकशी करते. अशी सुन्न करणारी कथा. *अर्थ* अनंताने घरात पाय ठेवताच उषाने ओळखलं की,` स्वारी आज बिथरली आहे. रमीत मार खाल्लेला आहे.` आणि तसंच होतं. अनंताने बुट भिरकावून दिले.उषा हे सर्व पहात होती. झोपेपर्यंत असा चिडचिड करीत राहील.आप्पा ही आता कामावरून दमून येतील त्यांच्याशी नीट बोलणार नाही. हे सगळं तिला स्वच्छ दिसत होतं. आता अनंता नीट जेवणार नाही. अनेक वेळा दोघांची पत्त्यावरून भांडणं झाली होती.अबोले धरले होते. पण अनंता खेळायचा थांबला नाही. दिवस दिवस पत्ते खेळायचे ?. दुसरं आयुष्य नाहीच माणसाला.? सकाळी नाहीसं व्हायचं ते असं रात्री परतायचे. पण त्यात कमावलं तर बायकोशी गोड नाही तर चिडचिड.खरं तर तिला आज अनंता बरोबर आप्पा विषयी खूप बोलायचं होते.तो आज आप्पा बरोबर हॉलवर गेला होता. आप्पांनी रंगवायला घेतलेला नवीन पडदा कसा झालाय? आणखीन किती दिवस त्यावर काम करायचं? अशा अनेक गोष्टी तिला आज अनंताला विचारायचे होते . "आप्पा अजून नाही आले?"अनंताने विचारलं. नाही आले, "सकाळी तुम्ही गेला होता"? "सकाळी गेलो होतो?" "मग ?" "मग काय? यूसलेस राॅटन प्लेस." "म्हणजे काय"? "तू ती जागा बघ, खडबडीत जमीन ,पडदा नीट अंथरता येत नाही. दुर्गंधी ..... पाणी मागवं तर एक हॉटेल नाही जवळ .माझ्यासारख्या माणसाने कामाला नकार दिला असता. बस स्टॉप जवळ नाही टॅक्सी मिळत नाही. किती अडचणी? "तुम्ही एकदा त्या प्रभूण्यांच्या कानावर घाला". व विचारा,"अशा परिस्थितीत आप्पांनी काम कसं करायचं ?" "आज आप्पा आले की बोला त्यांच्याशी. या वयात एवढी काम करायचं, त्यात कामाचं चीज नाही, पैशाचा पत्ता नाही?" "अगं, पण अप्पांना कुठे काय त्याच?" "प्रभुण्यांना सरळ जाऊन सांगतो, अगोदर ॲडव्हान्स दिल्याखेरीज आप्पा काम करणार नाहीत". "हा प्रभुणे कोण?" " चंदनमल ड्रेसवाला, तिथला व्यवस्थापक". नाटक कंपनीत लागणाऱ्या सगळ्या वस्तू पुरवणारे दुकान आहे.पडदे पण भाड्याने देतो. शाळा कॉलेजची नाटकं होतात. गणपती, नवरात्र उत्सव."आप्पांचे पडदे व उत्पन्न चंदन वाल्याच !" "आप्पांच्या प्रमाणिकपणाचा एवढाच अर्थ का?" "दुसरं काय !".... रात्रीचे नऊ वाजले. "अहो, अजून आप्पा नाही आले?" तितक्यात अप्पा आले.अप्पांशी आज कडकडून भांडायचं अनंताने ठरवलं होतं. `तुमचा त्याग व कष्ट मातीमोल होत आहेत` हे पटवून द्यायचे. शांतपणे जेवण झाली. " आज एवढा उशीर?" " पडदा संपवून टाकला?" "सकाळचा?आजच्या आज?" "हो,लवकर काम संपवायचं होतं." "तुम्हाला त्या हॉलमध्ये काम सुचतं ?" आप्पा शांतपणे म्हणाले," एकदा हातात ब्रश घेतला की लक्ष कशाच जातय इकडे तिकडे?" "अप्पा पैशाच काय?" "अरे, देतील सावकाश" "सावकाश? का म्हणून? " तुम्ही त्यांना पडदे ठरलेल्या दिवसाच्या आत द्यायचे आणि त्यांनी पैसे मात्र हवे तेव्हा द्यायचे नाहीत.ते तुम्हाला सरळ सरळ फसवतात." "आयुष्यात आनंद हवा असतो का पैसा? " "अनंता पटकन म्हणाला, आनंदाने जगण्यासाठी पैसा हवा असतो?" "चुकलास तू " "तू पत्त्यामध्ये आज किती हरलास?"काय वाटलं तेव्हा?" हरल्यानंतर चपला भिरकाव्याशा वाटतात, कपडे फेकावेसे वाटतात, अर्ध्या पानावरून उठावसं वाटतं.".. मुळीच नाही. "मला माहित आहे ना म्हणूनच मी तुला दोष देत नाही". कारण, तुला माझं जीवनच समजलं नाही. मी पैसा नाही कमवू शकलो आयुष्यात, पण आनंद मात्र खूप मिळवला. तुला एक सांगू,?" "माणूस केव्हा फसतो ते ?...... आपल्याला काय मिळवायचं होतं हे जेव्हा माणसाला समजत नाही तेव्हा तो फसलेला असतो. आणि एवढ्याचसाठी तू उद्यापासून पत्ते खेळायला जात जाऊ नकोस. कारण पैसे लावून खेळताना पैसे मिळवणं हा हेतूच होऊ शकत नाही. तिथं मिळवायची असते ती धुंदी. गमावण्यातही एक कैफ उपभोगायचं असतो ;ते वातावरण चाखायचं असतं, स्वतःच्या मालकीचं तेवढेच असतं. आणि थोड्याफार फरकाने हेच असतं सगळीकडे. हातात ब्रश आणि रंग आले की मला विश्वाचा विसर पडतो. तहानभूक हरपते. त्या राज्यात मग दुर्गंधीला जागा नाही. फसवाफसवीला थारा नाही. उपेक्षा नावाची वस्तूच अस्तित्वात राहू शकत नाही. त्यामुळे ज्याला काय मिळवायचं हे समजले तो कुठेच फसत नाही. म्हणूनच या जगात व्यवहारी लोकांचे चाललंय आणि माझ्यासारख्यांचंही चांगल चाललंय. आप्पा धुंदीत येऊन बोलत होते. उषा आणि अनंता ऐकत होते. पण त्या दोघांनाही अर्थबोध होत नव्हता. कानावर अप्पांचे शब्द येत होते. पण त्यातला अर्थ पोहोचत नव्हता. *दिशाभूल*. `एका महत्त्वाच्या कामासाठी दुपारच्या गाडीने निघून संध्याकाळी मुंबईला येत आहे. जेवायला घरीच राहीन.बाकी सर्व समक्ष भेटीत.` ---आपला विसुकाका . असं विसुकाकाच पत्र आलं तेव्हा मी, आप्पा आणि आई काय काम असावं या विचारात चूर झालो. आपण बरं आणि आपलं काम बरं या समान धर्मामुळे अल्पावधीतच अप्पा व काका दोघांमध्ये स्नेह जमला.इतका की त्यांनी मला मुलगा मानले.आई त्यांना गमतीने म्हणायची. "चार-दोन लाखांची इस्टेट ठेवा तरी नावावर! मुलगा मुलगा करता ना त्याला?" " मी त्याला मुलगा उगीचच का मानतो ?" "संयोगिताचे लग्न झालं की बाकीचे दत्तूचंच समजा". राधाकाकूंच्या निधनानंतर विसुकाकातला मोकळेपणा लयाला गेला. हसरी वृत्ती कोमेजली. तर असे विसुकाका वर्षानंतर येणार असल्याचे पत्र आले होते. पत्राप्रमाणे विसुकाका वेळेवर आले. जेवण आटोपली सुपारी तोंडात टाकत विसुकाका म्हणाले `संयोगिता च लग्न ठरलं` "कुठली मंडळी?" " इथलीच आहेत.बापट आडनाव.मुलगा छान आहे.मुलगी त्यांना पसंत आहे". " छान,अगदी उत्तम झालं शेवटच्या जबाबदारीतून तू सुटलास" " हो, पण तुला सरळ सरळ सांगतो, मला दोन हजार रुपये हवेत.पुढच्या वर्षी परत करीन." पण...." माझी परिस्थिती तुला".... "हो, माहित आहे." "आप्पा, गोंधळात पडू नकोस. मला दोन हजार फुकट नकोत. कर्जतला माझी थोडी जमीन आहे. ती मी दत्तूच्या नावाने करून देतो. तिच्या तारणावर मला एवढी रक्कम दे. तसा माझा विमा ही यायचा आहे पण त्याला थोडी मुदत कमी पडते." " बघू, तुझ्या जमिनीचा नकाशा.!" आप्पा म्हणाले "मी आणला नाही आज. उद्या संध्याकाळी याच वेळेला येतो सगळं घेऊन". असं म्हणून विसुकाका निघून गेले. आमचे बोलणे होतच होते तेवढ्याच दारावर टक टक चा आवाज आला.दरवाजा उघडला. बघतो तर आमचा मोहन कर्वे. " या वकीलसाहेब!" अगदी वेळेवर आलात." "का? काय झालं?" "आम्ही एक जमीन विकत घेत आहोत काय काय लागत ते सांग" "टायटल क्लिअर आहे ना? जमिनीवर आणखीन कुणाचे क्लेम वगैरे नाहीत ना? अशा बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. असे सविस्तर प्रश्नांची उत्तर मोहनने दिले. दुसऱ्या दिवशी मोहनला बोलावण्यात आलं दुसऱ्या दिवशी मोहन, विसुकाका येण्याच्या अगोदरच येऊन बसला होता. हे आमचे स्नेही विसुकाका आणि हे आमचे लीगल ॲडव्हायझर मोहन कर्वे. मध्ये थोडीशी शांतता गेली .पण लगेचच मोहन ने सुरुवात केली. "जागेचा प्लॅन आणलात का काका?" "अप्पा,मी पैशाची व्यवस्था करून आलो. ते सांगण्यासाठी आलो होतो. तुम्ही सर्वांनी लग्नाला यायचं चार दिवस अगोदरच या". आणि तडक उठून जायला निघाले. " का, जेवायचं नाही?" "नको आता वेळ नाही." म्हणाले आणि निघून गेले. त्यानंतर पंधरा दिवसांनी विसुकाकांचे आग्रहाचे पत्र आणि निमंत्रण पत्रिका आली. पत्र पत्रिका पाहून आप्पा म्हणाले "मला यायला प्रशस्त वाटत नाही तू एकटाच जा. माझी चौकशी केली तर सांग प्रकृती बरी नाही म्हणून." संयोगिता च लग्न व्यवस्थित पार पडलं .विसुकाकांचा मुलगा या नात्याने मस्त तेथे वावरलो. बापटांना मी दहा वेळा आग्रह केला घरी येण्याचा . तेव्हा विसुकाका म्हणाले, "जावईबापू, आता इथून पुढे यांच घर हेच तुमचं सासर." एकंदरीत छान सोहळा पार पडला. घरी आल्यानंतर आई-वडील खुशाली ऐकून खुश झाले. आणि पंधरा दिवसानंतर एक पत्र हाती आलं . प्रिय, दत्तात्रय लग्नानंतर पहिले पत्र अशा मजकुराचे लिहावे लागत आहे.हे महान दुर्दैव आहे. विसुकाकांना आठ दिवसापूर्वी देवाज्ञा झाली. हे लिहितांना अत्यंत यातना होत आहेत .तुम्हाला कळवायला विलंब लागला याची क्षमा असावी. घडलेली घटना एवढी जबरदस्त होती की मन अजून बधीर झालेलं आहे. कोणत्या तरी गोष्टीचा त्यांना धक्का बसला असावा. एकुलत्या एक मुलीच लग्न म्हणून ते जेमतेम उभे असावे. तुम्ही गाडीत बसला आणि त्यांना हृदय विकाराचा झटका आला. वाचतील असं वाटलं. पण सगळं संपलं. तुम्हाला देण्यासाठी काकांनी एक पाकीट ठेवलं ते पाठवत आहे. तुमचा आनंद बापट. आप्पांना मी ते पत्र दिलं.आणि दुसरा लिफाफा फोडला. प्रिय दत्तात्रय, सोबतच्या कागदपत्रावरून तुझ्या लक्षात येईलच की,कर्जतची माझी जमीन मी दोन वर्षांपूर्वीच तुझ्या नावावर करून ठेवली होती.त्याशिवाय मृत्युपत्रात त्याची नोंद आहेच. श्री मोहन कर्वे यांचा परिचय झाला. तेव्हा हे सगळे कागदपत्र जवळ होते माझ्या. पण तुझ्या जमिनीचे कागदपत्र तुला काय दाखवायचे म्हणून गप्प बसलो. त्याशिवाय मला खात्री होती की, शब्दादाखल मला रक्कम मिळू शकेल. त्याला व्यावहारिक स्वरूप देऊन तिथे लगेच वकील वगैरे आला असेल असं मला वाटलं नव्हतं. असो. तुमच्या आमच्यासारख्या मध्यमवर्गीय, कुटुंबवत्सल माणसांची अनेकदा दिशाभूल होते. सद्हेतू आणि व्यवहार ह्यांची सांगड घालताना फसगत होते. संयोगितेला आई-बाप ...... दोन्ही नाहीत. पण तिला माहेर आहे.खरं ना? अप्पाला सांभाळा. त्याच्यावर माझा राग नाही. तुझा, विसुकाका. उत्तरे सहज समजणारी आणि तरीही समजून घ्यायला नाना प्रकारच्या अनुभवातून जावे लागते.वलयात गुरफटलेल्या कितीतरी माणसांची ओळख व्हावी लागते. शहाणी, मूर्ख, व्यवहारी आणि स्वप्नवेडी माणसं अशा माणसांच्या कथांचा हा संग्रह वाचकाच्या मनाला स्पर्शून जातो. धन्यवाद! ...Read more
- AALOCHANA - JULY, 1967
सफाईदार पोशाखाची कथा...
मराठी भाषेच्या कथाविषयांचे दालन समृद्ध होत असल्याचा निर्वाळा कथासंग्रहांवर सातत्याने होण्याच्या चर्चा-समीकरणाद्वारे दिला जातो. नवीन कथासंग्रहांचीही झपाट्याने भर पडते आहे. वाचकवर्गात तडाख्याने वाढ झालेली दिसून येते. या सगळ्या रिस्थितीवरून कथांबाबतचे निदान केले जात आहे. पण हे बरोबर नाही. इतकेच नव्हे तर संपूर्ण उलट आहे. समृद्धि हा शब्द संख्यावैपुल्यदर्शक ह्याच अर्थाने अभिप्रेत असावासा वाटतो. काही मोजके अपवाद वगळले, तर मराठीत ‘बरी’ कथा सफाईदार, पोशाखी आणि चकवणारी अशी आहे. तीच फार मोठ्या प्रमाणांत निर्माण होते. खुणवली जाते. ग्रंथगत केली जाते.
‘वलय’ हा श्री. वसंत पुरुषोत्तम काळे ह्या परिचित व प्रसिद्ध लेखकाचा नवा कथासंग्रह. बारापैकी दोन अपवादात्मक कथा सोडल्या तर बऱ्या, सफाईदार आणि पोशाखी कथांच्या हा संग्रह. श्री. वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या वैशिष्ट्यांनी आणि मर्यादांनी पूर्ण असलेला.
श्री. काळे यांचे पहीले वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कथा अत्यंत आकर्षक आणि बांधेसूद असते. जो कथाभाग ते सांगतात, त्यांतील अनेक छोटेमोठे मार्मिक तपशील देऊन ते वाचकांना स्तिमित करून सोडतात. ‘स्वप्नवेडी’ ही पहीलीच कथा ह्या दृष्टीने तपासता येईल. विषय हा सर्वपरिचित असणारा, रोज सकाळच्या धमाल गर्दीत ऑफिसची वेळ गाठण्यासाठी जिच्यावर उदार होऊन चालत्या गाडीत चढणारी तरुणी, तिला सावरणारा तरूण, भेटीगाठी, तिचे नाव कळणे, मध्ये तिचे अजिबात ओळख न देणे, गैरसमज, दिलजमाई, त्या मुलीच्या-मृणालिनी तिचे नाव-वडिलांकडे जाणे आणि अखेर धक्का देणारा खुलासा. सगळे कसे हिंदी बोलपटांतल्यासारखे. ‘अशा एखाद्या तरुणीला आपणालाही सांवरता आलं तर...’ असा विचार करीत काळ्यांच्या कथांचा वाचक चर्चगेट बोरी बंदर यायच्या आंत ती संपवितो आणि बेकार असल्याने यावर परिणाम झालेली मृणालिनी ह्या एका तरुण मुलीच्या आयुष्याची शोकातिका आपल्या मनावरून पुसून टाकतो.
फारशी गरज नसताना वडिलांनी तिला आपला मुलगाच असल्याची चेष्ट केल्यामुळे कारकुनी आयुष्याची सुखदु:खे आत्मसात करणारी, पाचं वर्षे नोकरीचा (गरज नसताना) सातत्याने प्रयत्न करणारी आणि डोक्यावर परिणाम करून घेणारी ही मुलगी काळ्यांनी रसिकाची सहानुभूति मिळविण्याइतकी जिवंत उभीच केली नाही. ऑफिसला जाणारी, पुरुषाचा प्रियकर-मित्र म्हणून आधार शोधणारी सुसंस्कारी हळवी तरुणी त्यांनी इथे उभी केली. फक्त पगाराच्या तारखेला ते वेड परमावधीला जाते, एवढ अन्वयार्थ सामान्यत: लागतो.
‘शेखर वर्गात बसला आहे.’ ह्या कथेतील नायिका ‘मंगला’ हीसुद्धा वर्षभर शाळेच्या ठराविक वेळांत मोटार अपघाताने दगावलेल्या भाच्याला आणण्यासाठी, त्याच्या अभ्यासाची चौकशी करण्यासाठी नेहमी शाळेत जाते. कथानिवेदकाच्या मुळाशी गट्टी करते. त्याला पत्ता लागतो तो बापट ह्या हेडमास्तरांकडून. ‘स्वप्नवेडी’ कथेतील वेडी ‘मृणालिनी’ आणि ‘शेखर वर्गात बसला आहे’ ह्या कथेतील ‘मंगला’ ह्यांना असे वागू देणारी त्यांची वडीलधारी मंडळी आणि सततच्या वेडाचे कोड पुरवून भावना जपणारे मुख्याध्यापक बापट श्री. काळ्यांच्या कथांतच मिळतात!
श्री. काळे यांच्या कथा ह्या नाट्यात्मक असतात. नाटक आणि नाटक्यांचे आयुष्य ह्यावर ह्या संग्रहांत दोन कथा आहेत : ‘लाट’ आणि ‘वलय.’पण ह्या निव्वळ नाटक्यांच्या जीवनावरील कथांव्यतिरिक्त ज्या कथा आहेत त्या भडक आहेत. वास्तवाच्या कक्षा ओलांडून कल्पकतेच्या जगतांत डोळे मिटून मन भरून गेल्याशिवाय ह्या कथा वाचतांना न अडखळणेंच कठीण. कथांतली सगळीच पात्रे अव्यवहारी, अतिधुंद, स्वप्नाळू, नाट्यवेडी आणि दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी आसुसलेली अशी आहेत.
‘नरमादी’ कथेतील आपली व्यभिचारी बायको खरी प्रेयसी कशी हवी पटवून देणारे व तिच्या बरोबर सुखाने संसार करणारे यशस्वी खरे वकील, ‘विश्वास’ कथेमधील ‘प्यून’चा मॅनेजर झालेला, कलंकित, व्यभिचारी, मालकाच्या रत्नप्रभा नावाच्या मुलीचा नवरा झालेला विश्वास पंडित, ‘सुख विकणे आहे’ ह्या विषय-कल्पनांचे केवळ नावीन्य असलेल्या कथेतील पात्रे, ‘पिऊन बीज मी फुले फुलविली’ मधील कॅन्सरच्या विकाराने त्रस्तग्रस्त असलेली लावण्यवती मंजू आणि अविनाश हे जोडपें, ही सगळी पात्रे अतिधुंद आहेत, म्हणून वास्तवाबाहेरची, असंभाव्य अथवा क्वचित् संभाव्य अशी असल्याने ह्या कथा जिव्हाळा निर्माण करू शकत नाहीत.
‘दिशाभूल’ आणि ‘हातमोजा’ ह्या दोन यशस्वी कथांचा मात्र आवर्जून उल्लेख करावा लागेल. एका कथेंतील साध्या घरगुती वातावरणात व संस्कारांत आणि संशयाच्या गोष्ट पारखून घेण्याच्या व्यवहारात मैत्री, माणुसकी व जगरहाटी ह्यांतील बदलांचे, विरोधांचे अत्यंत सूक्ष्म चित्रण श्री. काळे यांनी केले आहे. नियतीच्या व व्यवहाराच्या रहाटगाडग्यात मनामनांतील प्रगाढ बंधनांना भेदूनही कशी करुण रम्य ‘दिशाभूल’ होते, हे समर्थपणे काळ्यांनी रेखाटले आहे.
‘हातमोजा’ मध्ये भूयोनी आणि मानवी वासना व संस्कारांचा पगडा ह्यांतील अंर्तद्र्वद्व खेळकरपणे त्यांनीं चित्रांकित केले आहे.
काळे यांच्या ह्या संग्रहाच्या ज्या मर्यादा जाणवतात त्यांचे एक कारण म्हणजे त्यांची शैली. त्यांची शैली ही संस्कारी आहे. तशी ती प्रत्येक लेखकाची असते. पण हळूहळू तो त्यांतून मुक्त होऊन स्वतंत्रपणे ताठ उभा राहतो. काळ्यांची निवेदनशैली खुसखुशीत आहे. निवेदनाचे तंत्र कथानकाच्या दृष्टीनें मांडले तर जे घडते तेच नेमके त्यांच्याबद्दल घडले आहे. ‘अर्ध्यावर विरले गीत’ किंवा ‘पिऊन बीज मी फुले फुलविली’ ही काव्यमय शीर्षके, ‘माझ्या मना बन दगड’ हा करंदीकरांच्या कवितेचा उल्लेख, ह्यावरून त्यांच्या रसिक व्यक्तिमत्वाची जाणीव होते. पण हेच रसिक व्यक्तित्व जेव्हा निर्मिती करू पाहाते, तेव्हांही ते वेगळे होत नाही. मग धुंदी, असोशी, काव्यमयता, ही वरच्या श्रेणीने कथांत येऊन मिसळतात व रसिकांच्या सुजाणतेला सुरूंग लावतात.
कथांच्या रसभंगाचे आणखीही एक स्पष्ट कारण दाखविता येईल. प्रत्येक साध्या विधानाला कुठलातरी तात्त्विक आधार असलाच पाहीजे, अशी जी जुन्या निबंधकारांची धारणा, तिचाही पगडा श्री. काळे यांच्या लिखाणत जाणवतो. सानेगुरुजी, खांडेकर, आदि लेखकांच्या लिखाणांत शोभावीत अशी कितीतरी वेचक तत्त्वसूत्रे ह्यांतून काढून देता येतील. वस्तुत: लेखकाचे, निवेदकाचे भाष्य किंवा मत पात्रांच्या सहज संवादांत सुव्यक्त व्हावे, पण येथे ते उपरे वाटते. काहीतरी अचाट-वेगळं आपण सांगतो, ही जाणीव निर्माता विसरू शकत नाही व ही तत्त्वचर्चा शैलीशी व्यक्तीशी, भाषेशी व रसिकतेशी जुळत नाही.
‘लोंबकळणारी माणसें,’ हा श्री. वसंत पुरुषोत्तम काळे यांचा पहीला संग्रह. ह्या पहील्या संग्रहांत जी धार, समज आणि रचनापद्धती व्यक्त झाली होती तिचा यथायोग्य आविष्कार झाला असता, तर गंगाधर गाडगीळ, जी. ए. कुलकर्णी, श्री. दा. पानवलकर, चिरमुले आणि बाबुराव बागुल ह्या अगदी स्वतंत्र व समर्थ लेखकाच्या सोबतच श्री. काळे यांच्या नावांचा उल्लेख करणे भाग पडते. पण वेळ काढू मासिकांची मागणी, ऑफिसमधली अनेक वाचनालये व मिळणारा पैसा प्रसिद्धी, ह्यानें लिखाणाचा झपाटा आणि पुस्तकांच्या संख्येत वाढ होते. कस अणि स्वत्व, मात्र नष्ट होऊन जाते.
‘लोंबकळणारी माणसे’ ह्या पहील्याच संग्रहाने ज्याने मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत, त्या लेखकाचा हा ताजा संग्रह वाचताना वाचकाचा फार मोठा अपेक्षाभंग होतो. प्रा. फडक्यांचे स्वप्नरंजन, खाडेकरांची अलंकारी शैली व मासमय तत्त्वसूत्री गुंफण, आणि पु. भा. भावे यांच्या कथात आढळणारी अनावर ओढ, ह्या त्रिकोणांत हा लेखक चमत्कारिकपणे अडकल्याचे आढळते. ‘वलय’ यात गुरफटणे ही वास्तवात खरी पण त्याला भेदून जाण्याची जिद्द प्रगट होणे हे श्रेष्ठ कलावंतांचे गमक श्री. वसंत पुरुषोत्तम काळे यांच्यासारख्या रसिक व्यक्तिमत्त्व लाभलेल्या लेखकाने ओळखायला हवे आहे. ...Read more
- MENAKA - SEP 1967
पंख फुटलेली प्रतिमा...
माणसाला चमत्कृतीची एक उपजतच आवड असते. वाचकाला, तशीच लेखकालाही ती असल्यास नवल नाही. व. पु. काळ्यांना ती तशी आहे. नुसती आहे नाही, विशेष आहे. ‘वलय’ हा त्यांचा नवा कथासंग्रह याचाच आणखी एक पुरावा.
कुठल्याही लेखकाचा मूळ उद्देश अखेरमाणसं शोधायचा असतो. ही माणसं जगाच्या अवाढव्य पसाऱ्यांत, व्यापात हरवलेली असतात, त्यांतली काही लपून बसलेली असतात. त्यांना शोधताना तो कथानकाचा आधार घेतो. म्हणजे कथानक जुळवणं आलं. हे कथानक जुळविण्यासाठी काळे बहुश: चमत्कृतींचा आधार घेतात.
ही माणसंही काहीशी तशीच चमत्कारिक. जगातलीच असूनही जगावेगळी. शहाणी, मूर्ख, व्यवहारी, स्वप्नवेडी–अनेक तऱ्हेची माणसं. अशी माणसं असतात का? याचं उत्तर फक्त ‘असू शकतात’एवढंच द्यावं लागेल. त्यांना समजून घ्यायला नाना प्रकारच्या अनुभवांतून जायला हवं. हे अनुभव म्हणजेच या बारा कथा.
ऑफिसला न जाता नेहमीच ऑफिसच्या वेळी बाहेर पडून संध्याकाळी परतणारी, सदैव ऑफिसच्याच गप्पा मारणारी मृणालिनी म्हणायची की ‘स्वप्न वेडी?’ ते वेडच खरं पण त्याची छटा चटका लावणारी. टी. बी. झालेल्या मुलीशी लग्न करून तिच्यासाठी आपलं जीवन वाहून टाकणारा, पण ती आजारी आहे म्हणून फक्त तिच्या गालाचंच चुंबन घेणारा दिना काही सामान्य मनुष्य नाही. ‘अर्ध्यावर विरलेलं’ हे गीत म्हणूनच न संपणारं ठरतं. ‘सुख विकणे आहे’ ही अशीच आणखी एक चमत्कृतीजन्य कथा. सुख विकण्याचं दुकान ही कल्पनाच जगावेगळी. इतरांना सुखाचा शोध देताना स्वत:चं सुख न समजलेल्या, किंवा गमावून बसलेल्या माणसांची ही कथा शेवटी मेलोड्रॅमॅटिक असली तरी त्याही मागचं तत्त्वज्ञान काही काळ विचार करायला लावील. ‘लाट’ची नायिका, तिची विभूतीपूजा, भक्ती सारंच काही नवलाईचं. व्यक्तिरेखेची उंची हीमालयापेक्षाही वाढविणारं!
आधुनिक वातावरणात स्त्री-पुरुष अनेक क्षेत्रांत एकत्र येतात. त्यांच्यात नसलेले संबंध जोडले जातात. कुत्सित नवरा नाही ते अर्थ काढतात. अशाच एका नाटकात काम करणाऱ्या एका स्त्रीच्या पतीला तिच्याविषयी इषारा देण्याचा उच्च (?) हेतूनं भेटतो. त्या पतीनं दाखविलेली तटस्थता, धुडकावून लावलेली त्याची सूचना ऐकून प्रथम धक्काच बसतोच पण पति-पत्नीमधील नात्याचा विश्वास, त्या नात्याचा अर्थ कळल्यावर ती व्यक्तिरेखा प्रभावी ठरते. त्याला शहाणपण सांगायला गेलेला गृहस्थ म्हणजे पर्यायायानं तुम्ही-आम्हीच कोता ठरतो. ‘नर-मादी’ मधील वकीलसाहेब मोठे ठरतात.
त्या मानानं ‘हातमोजा’, ‘शेखर वर्गात बसला आहे’ या कथा या संग्रहात न बसणाऱ्या वाटतात. ‘हातमोजा’वर मानसशास्त्राची थोडी झाक असली तरी तो एक रहस्यकथेचाच प्रकार वाटतो. त्यातही चमत्कृती आहेच. ‘शेखर वर्गात बसला आहे’ ही कथा एखाद्या स्त्रियांच्या मासिकात शोभून दिसणारी, ‘वलय’ कथासंग्रहातली ती तशी नव्हे.
लांब, पल्लेदार वाक्यांनी भाषेला जसा जोर येतो, तसा छोट्या, तुटक वाक्यांनीही आणता येतो. काळ्यांची भाषा दुसऱ्या प्रकारची. वर्णनावर त्यांचा भर नाही. संवादांतून निवेदनावर अधिक भर. तत्त्वज्ञानही ते कमीत कमी शब्दांत सांगतात. वाचकांनही बरंच समजून घ्यायचं असतं. ते काम काळे वाचकांवरच सोपवतात. वाचकाला म्हणूनच भरपूर खाद्य मिळतं नि त्यांच्या कथा वाचकांच्या डोक्यात सदैव घोळत राहतात. ...Read more
- विनायक
वास्तवतेच्या आभासाचा भूलभूलैय्या...
वसंत पुरुषोत्तम काळे नाव माठी साहीत्यसृष्टीत अपरिचित राहीलेली नाही. काळ्यांचे सर्व जीवन शहरात गेले असल्याने असेल कदाचित, पण त्यांच्या प्राय सर्व कथा शहरी वातावरणातच वावरणाऱ्या असतात. प्रस्तुत कथासंग्रहही त्याला अपाद नाही. या संग्रहात सुख विकण्याचे दुकान आहे, टी. बी. झालेला असतानाही केवळ कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी नोकरीत झिजत राहीलेली मिस केळकर आहे, बायकोचा एका प्रसिद्ध नाटाशी अनैतिक संबंध असलेला एक नामवंत वकील आहे. नामवंत नटाची भक्ती करणारी आणि (घरी त्याची लग्नाची बायको हे माहीत असूनही) त्याला तनमन अर्पण करणारी रसिक स्त्री आहे, दिवस दिवस रमीच्या कैफात घर विसणारा अनंत आहे आणि हजारो रुपयांचे पडदे तयार करून घेऊन पैसे द्यावयाच्या वेळी टाळाटाळ करणारी चंदनवाडा ड्रेस कंपनीही आहे.
काळ्यांची प्रतिमा अशी विलक्षण की या परिचित विश्वातील सहसा दुर्लक्षणीय असणारा पैलू ते नेमका टिपताता आणि त्याच्याभोवती कथेचे एक वेगळे विश्व उभे करतात. या वेगळ्या विश्वात गेल्यावर वाचक क्षणकाळ अवाक होतो आणि मग स्वत: काळ्यांनीच एका कथेत विचारलेली प्रश्नमालिका त्याच्या डोळ्यासमोर उभी राहते. बुद्धिबळातला राजा खरा असतो? परी कथेतल्या पऱ्या खऱ्या असतात? नाटकातली पात्रे खरी असतात? बिरबलाच्या कथेतील त्या तीन्ही प्रश्नांप्रमाणे या प्रश्नांचे उत्तरही ‘नाही’ असे देता येईल. पण बुद्धिबळाचा डाव एकदा सुरू झाला की मग राजा ‘चाल’ करू लागतो, परीकथेतील पऱ्यांना पंख फुटतात, आणि रंगभूमी वरील मुखवटे जिवंत होतात.
पण काळ्यांच्या कथांविषयी हेच म्हणता येईल. अनेक कथा अशा आहेत की त्यांतील काही पाने वास्तव सृष्टीत शोधूनही सापडू नयेत. पण काळे कथांचा परिपोष अशा बहारीने करतात, व्यक्ती आणि प्रसंग यांना जोडणारा धागा अशा कौशल्याने विणतात की हे अवास्तवही वास्तव बनून जाते. जीवंतपणाचे वलय कथेभोवती उभे राहावे. स्वप्नवेडी, शेखर वर्गात बसलाय, पिऊन बीज मी फुले फुलविली या कथा या संदर्भात वाचनीय आहेत.
शहरी संस्कृतीमध्ये जे नवे नवे नैतिक प्रश्न निर्माण होत आहेत त्याची चाहूल या संग्रहातील काही कथांमध्ये स्वाभाविकपणेच लागते. ‘नरमादी’ आणि ‘लाट’ या दोन कथांचा या दृष्टीने विशेषत्वाने उल्लेख केला पाहीजे. एखाद्या प्रतिष्ठित वकिलाच्या बायकोचा परपुरुषाशी संबंध असणे वा एखाद्या नामवंत नटाचा तो विवाहीत असूनही अन्य स्त्रीशी शारीरिक संबंध असो, आमच्या शहरी वातावरणात असंभवनीय नाही. पण हे असंभवनीय नसले तरी समर्थनीय आहे काय? अनुकरणीय आहे काय? या साऱ्यां गोष्टींचे– त्यांना मानसशास्त्राची गोंडस झालर लावून समर्थन करण्याचा प्रयन कथालेखकाने केला आहे. (की अशा गर्हणीय गोष्टींचे मानसशास्त्राचा आधार घेऊन समर्थन करण्याची सभ्यताही शहरी संस्कृतीत निर्माण होत आहे हेच काळे यांना सांगायचे आहे?) आपली पत्नी अन्य पुरुषाशी संबंध ठेवते हे ठाऊक असूनही काळ्यांचा कथानायक वकील या अनैतिक संबंधाची माहीती द्यावयास आलेल्या गोखल्यांनाच उलट समजावू लागतो– ‘माझी पत्नी विद्याकुमारकडे जाते तेव्हा ती मला समजणार नाही अशा रीतीने जाते. पण तिथून परत आल्यानंतरचं तिचं स्वरूप काय सांगू? माझ्या जवळ येताना तिला भलताच आवेग येतो. निर्माण झालेलं अंतर संपवून टाकण्याकरता विलक्षण भावनोत्कटतेने येते. तिचं नंतरचं प्रत्येक आलिंगन, प्रत्येक चुंबन म्हणजे तिच्या पापाची कबुली असते. अशा वेळी मी एका निराळ्याच सोहळ्याची मैफल लुटतो. पुरुषाला पत्नी हवी असते, पण त्याहीपेक्षा त्याचे मन प्रेयसीसाठी भुकलेले असते. माझ्या लग्नाला इतकी वर्षे झाली, पण अजूनही माझी पत्नी माझ्याकडे ‘प्रेयसी’ बनून येते आणि त्याच वेळी माझ्यातील ‘प्रियकर’ जागृत बनविण्याचे सामर्थ्य तिच्यात निर्माण होते.’
‘लाट’ कथेतील प्रदीप या नटाला सर्वस्व अर्पण करणाऱ्यां रसिकेच्या भोवतीही अशीच मानसशास्त्राची महीरप उभी करण्यात आली आहे. ती म्हणते– ‘आपल्या आराध्य दैवताच्या पूजेसाठी कोणी फुले घेतो, कोणी सुवर्ण घेतो. साधनं नाममात्र असतात. प्रश्न असतो भक्तिभावाचा. मला जे प्रामाणिकपणानं द्यावंसं वाटलं ते मी दिलं. माझ्या दृष्टीने ते पूजन होत. तुम्ही व्यभिचार म्हणा त्याला.’
काळ्यांनी या कथांच्या माध्यमातून जे एक वेगळे वैचारिक वलय निर्माण केले आहे त्याची कल्पना याची यासाठी या दोन कथांचा एवढ्या विस्ताराने उल्लेख केला आहे.
अर्थात काळ्यांच्या कथांतील सारे विश्वात विकृतीला सद्गुण मानून मिरवणारे महाभाग आहेत, तद्वत सद्गुणाची पराकाष्ठा झाल्याने व्यवहारी जगाच्या दृष्टीने मॅडचॅप ठरलेली माणसेही आहेत. सारे काही विलक्षण. विचारांना चालना देणारे आणि अनेकदा धक्काही. त्यामुळे कथा वाचत असताना वाचक या विश्वात रंगून जातो. आणि कथा संपल्यावर त्याच्या मनात एक अनामिक हुरहुर तरळून जाते. खरेच हे असे असेल? आणि असेलच तर मला का दिसले नाही आजवर?
– आणि या हुरहुरीतच ‘कथा’कार काळे दडलेले आहेत. ...Read more
- Read more reviews