- सुधीर पुरुषोत्तम दीक्षित
नमस्कार स्नेही जन हो.
मागील तीन दिवसात मी स्वत:च विविध फॅण्टसी च्या भोवर्यात आणि सैबेरीयाच्या बर्फाळ प्रदेशात फिरत होतो आणि त्यामुळे मलाच वेगवेगळे भास होत होते. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग दिसत होता, तो म्हणजे एखादे व्यक्तिदर्शी पुस्तक निवडून वाचवे असे वाटून गेले. मग आठवले की हे पुस्तक महिन्याभरापूर्वी आपण मागवून घेतले होते आणि वाचायचे राहिले आहे. पुप च्या निमित्ताने हे वाचूनही होईल आणि जीवनातील विविध प्रकारच्या माणसांची, तसेच जिवंत फॅण्टसी ची आवड निर्माण करणाऱ्या आपल्या आवडत्या लेखकाबद्दल काही वेगळे माहीत होईल.
वपु काळे यांचा मी पंखा (फॅन ) कधी झालो हे सांगता येत नाही. परंतु किशोर अवस्था संपून धोक्याच्या सोळाव्या वयात प्रवेश करण्याच्या आधी एक दोन वर्षे वपु आमच्या घरात आले आणि घरातील सर्वांचे झाले, अगदी माझ्यासहित. झपाटल्यासारखी त्यांची मिळतील ती पुस्तके मिळवून वाचण्याचा सिलसिला घरात चालू झाला आणि त्यांच्या कथा, त्यातील माणसे आपल्याला कुठे दिसतात का, भेटतात का याचे निरीक्षण चालू झाले. *पार्टनर* ने जीवनावर प्रचंड प्रभाव निर्माण केला. त्या काळात वपुंनी माणसे कशी वाचावीत, जोडावी याचे नकळत एक शिक्षणच दिले. *सोळावे वरीस धोक्याचे* म्हणतात. पण योग्य वेळी वपु आले आणि त्यांच्या कथांचे, विचारांचे सामर्थ्य हे की या वयातील धोके योग्य वेळी टळत गेले. आयुष्याची गाडी नेहमीच रुळावर ठेवण्यासाठी वपु एक मार्गदर्शकच आहेत. माझ्याही मुलांवर संस्कार करताना हे मार्गदर्शन उपयोगात आले.
आपल्या आवडत्या व्यक्तीविषयी अधिक जाणून घेण्याची प्रत्येक माणसाला ओढ, उत्स्तुकता असते. हि व्यक्ती त्याच्या सर्वसामान्य जीवनात आणि त्यांच्या घरातल्यांसाठी कशी असेल, कशी घडली असेल हे एक कुतूहल असते. पुस्तक, कथा यातून कळणारे लेखक खरोखरचं स्वतः च्या आयुष्यात तसेच असतील का यातून त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या कथा, दंतकथा प्रस्तुत होतात समाजात. एक प्रकारचे गॉसिपिंगच हे. पण दुसरे काही साधन नसेल तर यावरच विश्वास, अविश्वास ठेऊन अश्या व्यक्तींचे आपण आपल्यासाठी मूल्यमापन करत असतो. पण सौ. स्वाती चांदोरकर यांनी लिहिलेले हे पुस्तक कळले आणि प्रत्यक्ष वपुंच्या लाडक्या लेकीनेच हे लिहिले आहे म्हणल्यावर authentic माहीती मिळणार याची खात्री झाली. स्वातीताईंनी आपले हे पुस्तक लिहिण्याचे उद्दिष्ट त्यांच्या मनोगतात थोडक्यात स्पष्ट केले आहे. ते मनोगतचा मी फोटो काढून या बरोबर जोडत आहे. मनोगतात म्हणल्याप्रमाणे हे वपुंचे आत्मचरित्र नाही तर त्यांचा जीवनपट आहे.
पुस्तकात स्वातीताईंनी त्यांच्या *बापूंचे आणि आईचे* एकमेकांबरोबरचे आणि दोन्ही मुलांबरोबरचे नाते आणि स्नेहबंध, इतर सुहृदांशी जुळलेली, वाढविलेली, जोपासलेली नाती यांचे अनेक हृद्य प्रसंगातून मांडले आहे. पुस्तकाला गोष्ट अशी नाही आणि आत्मचरित्रासारखी, फक्त जीवनपट विविध प्रसंगातून उलगडला असल्यामुळे, आखीव रेखीव बांधणी अशी नाही. वपुंच्या लेखनाबद्दल सार्थ अभिमान यात दिसतोच साहजिकपणे, पण त्याचबरोबर एक अतिशय मनस्वी, संगीत, हार्मोनियम, व्हायोलिन, फ्लुट, अभिनय, उपजत चित्रकला यात नैसर्गिक गती असणारा माणूसही समोर येतो. हळवे भावनाशील वपु तर जागोजागी दिसतात. आपल्या वडिलांच्या विषयी (श्री. पु श्री काळे) असलेला अभिमान, त्यांच्या नैपथ्य कलेविषयीचे ज्ञान याविषयीचा आदर वपुंच्या ठाई वारंवार दिसतो. वपुंची आई, पत्नी, मुले, नातेवाईक आणि इतर गणगोत यांच्याशी असलेले वपुंचे भावबंध उलगडताना अनेक वेळा स्वातीताई भावनाविवश होतात. हे सर्व वाचत असताना श्री. पु श्री काळे, ताई (वपुंच्या आई), वपुंच्या पत्नी सौ. वसुंधरा, मुलगा दादा यांचीही व्यक्तिचित्रे आकार घेत राहतात.
वपुंचा जन्म झाला पुणे सेवासदन मधे आणि त्यांचे नाव ठेवले *गजानन*. पण त्यांच्या आजीने (त्यांना *ताई* म्हणत), त्यांचे नाव *वसंत* केले त्यांच्या धाकट्या भवावरून, जो लहानपणीच मरण पावला होता. वपुंच्या वडिलांना *आण्णा* म्हणत. ते बाहेरगावी नोकरी करत आणि पुण्यात भाड्याच्या घरात रहात. पुढे ते मुंबईला स्थायिक झाले परंतु बिऱ्हाड पुण्यातच होते. त्यामुळे वपु आणि त्यांची बहीण *सिंधू* पुण्यात भावे स्कूल मध्ये शिकले. वपुंना आधी सांगितल्याप्रमाणे लहानपणापासून स्वरज्ञान होते आणि त्यामुळे त्यांचे वादनाचे कार्यक्रम शाळेत होत असतं. शाळेत त्यांनी नाटकातून कामे केली, बक्षिसे देखील मिळवली. अकरावी नंतर वपुंनी मुंबईला जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला आर्किटेक्चरला प्रवेश घेऊन वास्तुशास्त्र विषयात पदवी घेतली. शिक्षण घेताना घरी मदत करण्यासाठी दारोदारी जाऊन साड्या विकल्या. शिकत असतानाच त्यांचे *मालती निगुडकर* यांच्याशी प्रेमविवाह घरच्यांच्या समतीने झाला आणि मालतीची *वसुंधरा वसंत काळे* झाली. वसुंधरा ताई उत्तम गृहिणी होत्या आणि वपुंना त्यांनी पूर्ण साथ दिली शेवटपर्यंत.
शिक्षण चालू असतानाच कधीतरी त्यांनी लिखाण चालू केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर वपुंनी मुंबई महापालिकेत नोकरी पत्करली. तेथे असताना त्यांनी कूपर, के ई एम, सायन, भाभा हॉस्पिटल, बिर्ला क्रीडा केंद्र आणि दीनानाथ नाट्यमंदिर अश्या मुंबईतील इमारतींचे डिझाईन आणि बांधकाम केले. पहिले कथाकथन त्यांनी *करंजी* या कथेचे सिंहगडावर घरच्या लोकांसमोर केले अशी आठवण सांगितली आहे. घरच्यांसाठी नेहमीच वेळ देणारे, त्यांच्यासाठी खर्च करणारे वपु मुलांच्या बाबतीत देखील हळवे होते. असे अनेक छोटे मोठे प्रसंग पुस्तकात आहेत. मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी आग्रही होते. मित्रांना जीवापाड प्रेम देणारे, लागेल ती मदत करणारे, नव्या जुन्या मित्रांना जमवणारे आणि कुठेही अवडंबर न माजवता चुपचाप देणगी देणारे अश्या वपुंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू अनेक उदाहरणांवरून समोर येतात.
त्यांना साथ देणाऱ्या वसुंधरा ताई म्हणजे सुगरण गृहिणी, अन्नपूर्णा होत्या. वपुंच्या सर्वार्थाने सहचारिणी होत्या. आशाताई भोसलेंना त्यांच्या हातच्या गुळाच्या पोळीची चव १५ - १६ वर्षांनी आठवते, पंडित वसतराव देशपांडे आणि कित्येक साहित्यिक, गायक आणि असंख्य मित्रमंडळी वपुंप्रमाणेच त्यांनी जपले होते. चाळीतून एका बेडरूम च्या फ्लॅट मधले स्थित्यंतर, घरातील पैशांची कमतरता यांची त्यांनी वपुंना तोशीस लागू दिली नाही. वपुंचे कथाकथनाचे कार्यक्रम चालू झाल्यावर घरातील पैश्यांची ओढाताण कमी झाली. त्यांनाही गायनाची आवड होती आणि पत्ते खेळण्याची. स्वातीताईंनी आईच्या व्यक्तिमत्त्वाला देखील त्यांच्या बापूंच्या तोडीने नावाजले आहे. वपुंनी वसुंधरा ताईंवर एक कविता देखील केली होती.
वसुंधरा ताईंना *ब्रेन ट्युमर* असल्याचे निदान होते. त्याआधी बरेच वर्षे त्यांना डोकेदुखीचा आणि नंतर नाकातून कोणताच वास न येण्याचा त्रास होत होता. काही काळ त्यांनां तीव्र वास येण्याचा देखील त्रास झाला. परंतु या मेजर आजाराचे निदान होऊ शकले नाही. वसुंधरा ताई मधूनच असंबद्ध बोल्यायच्या. काही काळाने हे वाढले तेंव्हा त्यांना डॉ. प्रभू या मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायला लागली. तेंव्हा त्यांनी सांगितले की हा मानसिक आजार नाही आणि त्यांच्या इतर तपासण्या कराव्यात. त्याप्रमाणे केले असता मेंदूच्या पुढील भागात हा ट्युमर झाल्याचे लक्षात आले आणि त्यांचे ऑपरेशन करण्याचे ठरले. परंतु ऑपरेशन करतानाच त्या कोमात गेल्या. ऑपरेशन मधून त्या बाहेर पडल्या तरी कोमातच होत्या. पुढे ओळखीच्या एका व्यक्तीने संगीताची थेरपी करण्याचा सल्ला दिला. ते केले असता त्या कोमातून बाहेर तर आली परंतु त्या फक्त जाज्ञा होत्या आणि त्यांच्या इतर संवेदना नष्ट झाल्या होत्या. केवळ संगीतालाच त्या थोडा प्रतिसाद देत असत. या काळात वपुंनी त्यांची सर्व प्रकारची सेवा केली. परंतु काही काळाने वसुंधरा ताईंचे निधन झाल्यावर वपु खूप खचून गेले. त्यातच यापूर्वी वपुंना हाय बी पी चा त्रास चालू झाला होता तो आता वाढला.
वपुंच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेऊन श्री अलुरकर यांनी त्यांची कथाकथन असलेल्या ऑडिओ कॅसेट्स ची रॉयल्टी बुडविली आणि उलट वपुंवरच केस दाखल केली. तसेच भालजी पेंढारकर यांनी वपुंनी लिहिलेल्या त्यांच्या आठवणींच्या पुस्तकाचे प्रकाशन थांबवून विश्वासघात केला. अनेक वेळा वपूंचा काही कार्यक्रमात अपमान करण्यात आला. परंतु त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशकांनी नेहमीच मोलाची साथ दिली. याची अनेक उदाहरणे दिली आहेत.
पुस्तक वाचताना अनेक वेळा गहिवरून येते. या मोठ्या माणसाची धडपड, घरातील कामे करण्याची पद्धत आणि मित्र आणि परीवारांवरचे अलोट प्रेम बघून अचंबित व्हायला होते. स्वाती ताईंनी यात वपु आणि कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांची व्यक्तिमत्वे आत्मीयतेने पण थोडक्यात प्रसंगातून रंगविली आहेत. वपुंचा त्यांच्या आणि त्यांच्या भावाच्या जीवनावरही पडलेला प्रभाव अनेक प्रसंगातून उलगडतो. स्वाती ताईंनी व्यक्त केलेली कृतज्ञता हृदयाला भिडते. वपुंच्या मनातील सर्वात हळवा कोपरा म्हणजे वसुंधरा ताई. त्या गेल्यावर झालेली वपुंच्या मनाची स्थिती किती नाजूक होते हे वाचताना आपल्याच मनाची घालमेल होते. त्यांच्या उत्तर आयुष्यात आलेल्या डॉक्टर बाईंचा त्यांच्यावरील प्रभाव, त्यामुळे मित्र दूर जाणे, वपुंचे आजारपण हे प्रसंग हेलावून जातात. ओशोंच्या विचारांच्या संपर्कात आल्यावर वपुंच्या स्वभावात झालेला काहीसा बदल दिसून येतो.
स्वाती ताईंनी वपुंच्या फोटोग्राफीच्या छंदाबद्दल देखील भरभरून लिहिले आहे. हजारो फोटो त्यांनी काढले. पण काढले आणि विसरले असे कधी झाले नाही. वपु स्वतः ते फोटो कार्डबोर्ड चे व्यवस्थित चौकोनी तुकडे करून ते चौकटीत चिकटवत. त्याला पांचींग मशीन वापरून रंगांच्या कागदाच्या टिकल्या करत आणि फोटोंची सजावट करत. मधे ट्रेसर पेपर टाकून त्याचे विषयवार अल्बम बनवीत. प्रत्येक फोटोखाली काहीतरी सुंदर वाक्य लिहीत. प्रत्येक अल्बामला विशिष्ट नाव देत. तसेच फोटोंच्या निगेटिव्ह जपून ठेवत. या पुस्तकात असे अनेक फोटो दिले आहेत.
पुस्तकात जशी वडील म्हणून वपुंची काळजी आहे, तशीच साहित्यिक म्हणून योग्य चिकित्सा देखील आहे. जरूर तेथे वपु कुठे चुकले हेही मांडले आहे. वपुंना मिळालेल्या विविध सन्मानांची आणि पुरस्कारांची माहिती आहे. मिळालेल्या रकमांनी अज्ञात व्यक्तींना आणि संस्थांना दिलेल्या देणग्यांची देखील माहिती दिली आहे. वपुंचा शेवट काहीसा दुर्लक्षित स्थितीत झाला त्याचे कायमचे दुःख आहे.
पुस्तक एकूणच वाचनीय आहे. सौ. स्वाती चांदोरकर यांचे मी हे पहिलेच पुस्तक वाचले आहे. त्यांची लेखन शैली वेगळी आहे पण ओघवती आहे. पुस्तक वाचताना हातातून सोडवत नाही. एक दोन सलग बैठकीत वाचन होते. ...Read more
- DAINIK LOKSATTA 24-02-2008
वपुंचे परिणामकारक चित्रण...
जनमानसावर आपल्या कथालेखनाने अधिराज्य करणारे लेखक व. पु. काळे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे वर्णन त्यांची कन्या स्वाती चांदोरकर यांनी आपल्या ‘वपु’ या पुस्तकात अतिशय हृद्य शब्दांत केले आहे. या पुस्तकाद्वारे आपल्या आई-वडिलंविषयीवाटणारी कृतज्ञताच जणू त्यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत लेखिका वपुंचा जीवनपट आपल्यापुढे उलगडत जाते. त्या अनुषंगाने वपुंचे आई-वडील, त्यांचं आजोळ, बालपण या साऱ्याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. वपु व्यवसायाने जरी आर्किटेक्ट असले, त्यांच्यात उपजतच अनेक कलागुण होते. ते आपल्या वडिलांसारखेच उत्तम चित्रकार होते. अगदी लहान वयातच कोणीही न शिकविता ते हार्मोनियम, फ्लूट वाजवायचे. अभिनयही छान करायचे. वपु उत्कृष्ट फोटोग्राफर होते. त्यांनी आपली ही आवड शेवटपर्यंत जोपासली आणि जपलीदेखील! स्वत:आधी दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्तीही त्यांच्यात जन्मजात होती. वाचकांना फारशा परिचित नसलेल्या या गुणांचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकामधून होते.
‘मध्यमवर्गीयांचे’ लेखक म्हणून वपुंना उदंड लोकप्रियता लाभली. त्यांनी माणसंही अमाप जोडली. त्यांच्या चाळीतल्या दीड खोलीच्या घरात कोणत्याही वेळी कोणताही पाहुणा आला तरी त्याचे आनंदानं स्वागत व्हायचे. माणसं जोडण्याच्या या व्यसनात त्यांना साथ होती ती वसुंधराबार्इंची. त्यांच्या लेखनाच्या त्या साक्षेपी टीकाकारही होत्या. सर्वार्थाने त्या वपुंच्या अर्धांगिनी शोभायच्या. वपुंवरील लिखाणाच्या ओघात आपल्या आईचे स्वभावचित्रणही चांदोरकरांनी भावपूर्ण शब्दात केले आहे. आई-वडिलांविषयीचे हळवेपण येथे ठायीठायी व्यक्त होताना दिसते. या चित्रणाच्या ओघात इतरही काही संबंधित व्यक्तींची स्वभावचित्रे लेखिकेने प्रभावीपणे रेखाटली आहेत.
पण वडिलांवरील अतीव प्रेमामुळे, भक्तीमुळे कुठेतरी वपुंचे हे चित्रण एकांगी वाटते छायाचित्रं पुस्तकाची शोभा नक्कीच वाढवितात पण ती थोडी कमी असती तर बरं झालं असतं.
लेखिकेवर असलेली वपुंच्या भाषेची छाप जाणवल्याशिवाय राहत नाही. एकंदरच एक प्रेमळ कर्तव्यदक्ष मुलगा, समजूतदार पति-सहचर, वत्सल पिता, सहृदय बंधू, लोकप्रिय लेखक, हरहुन्नरी कलाकार असं विविधांगी व्यक्तिमत्त्व असलेल्या आपल्या वडिलांचे परिणामकारक चित्रण ओघवत्या भाषेत करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.
-स्वाती दामले ...Read more
- DAINIK AIKYA 05-08-2007
वपु : कन्येने रेखाटलेले भावचित्र...
व. पु. काळे हे मराठीतील एक लोकप्रिय कथाकार. कथाकथनकार म्हणून ते अधिक प्रसिद्ध झाले. कथाकथनाच्या प्रयोगाला ‘उपयोजित कला’ (परफॉर्मिंग आर्ट) म्हणून त्यांनी मान्यता मिळवून दिली. देखणं व्यक्तिमत्त्व भाषाप्रभुत्व या दोनदेणग्यांबरोबरच त्यांना अनेक कला प्राप्त झाल्या होत्या. ते जानेमाने वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) होते. मुंबई महापालिकेतील त्यांची नोकरी याच विषयाशी संबंधित होती. त्यांनी आरेखित केलेल्या मुंबई महापालिकेच्या अनेक वास्तू आजही मुंबईच्या वैभवात भर घालत आहेत. असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या व. पु. काळे यांच्या साहित्यिक, कलामय आणि त्यापेक्षाही प्रापंचिक व्यक्तिमत्वाचा मागोवा त्यांची कन्या स्वाती चांदोरकर यांनी वपु या छोटेखानी पुस्तकात नेमकेपणानं घेतला आहे. रूढार्थाने हे चरित्र नाही तर प्रसिद्ध असलेली एक व्यक्ती वडील म्हणून किंवा इतर सांसारिक नात्यात कशी दिसली त्याचे हे ‘भावचित्र’ आहे. व. पु. काळे ही त्यांची संक्षिप्त ओळख व. पु. या आद्याक्षरांपेक्षा ‘वपु’ या एका नावानेच प्रचलित झाली. म्हणून पुस्तकालाही तेच शीर्षक दिले आहे. वपुंचे वडील पु. श्री. काळे हे जुन्या जमान्यातील नामवंत नाट्यचित्र नेपथ्यकार होते. कलेचा हा वारसा वपुंकडे आला. त्यांनी सुमारे चौतीस वर्षांपूर्वी आपल्या पिताश्रींचे चरित्र ‘सांगे वडिलांची कीर्ती’ या नावाने प्रसिद्ध केली. तोच वारसा पुढे नेत वपुंच्या कन्येने आपल्याही पित्याचे जीवनचित्र शब्दांतून रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रामाणिक म्हणण्याचे कारण, जवळच्या व्यक्तीबद्दल आणि त्यातही तिचे समाजात काही वेगळे स्थान असेल अशाबद्दल लिहिणे तसे अवघड असते. पण चांदोरकर यांनी प्रेम आणि तटस्थता प्रस्तुत पुस्तकात चांगल्या प्रकारे एकत्रित केली आहे.
लेखिकेचे आजाबो, अण्णा (पु. श्री. काळे) सांगत असलेल्या एका छोट्याशा बोधकथेने पुस्तकाची सुरुवात होते. पुढच्या दहा पंधरा पृष्ठात आजोबा, आजी इतर माणसं, पुण्यातल्या ‘श्रम साफल्य’ बंगल्यातलं वास्तव्य, तिथल्या आठवणी, वपुंच्या लहानपणाच्या काही गोष्टी अशा स्वरुपात हे शब्दचित्र गती घेतं. अगदी थोडक्यात अनेक नाती या कॅन्व्हासवर शब्दांच्या माध्यमांतून उमटत राहतात. वपुंना मुलं बापू म्हणत, त्यामुळे पुढे बहुतेक उल्लेख त्याच नावानं होतो. त्याचं आर्किटेक्टरवरच शिक्षण मुंबईच्या जे. जे. मध्ये झालं आणि पुढचं सगळं आयुष्य ते ‘मुंबईकर’ म्हणूनच जगले. कुटुंबात वावरताना त्यांनी अगदी सहजतेने आपलं घर बहिणीला ‘भाऊबीज’ म्हणून देऊन टाकलं, असे त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे अनेक नमुने पुस्तकात जागोजागी आढळतात. नोकरी व्यवसायातूनच त्यांनी लेखन चालू ठेवलं आणि पुढे त्यातूनच कथाकथन जन्माला आलं. त्याबद्दल लेखिका लिहिते, ‘कथाकथन बापूंना जमलं. नुसतं जमलं नाही, तर त्यात ते बादशहाच झाले. कुठलीही गोष्ट असू दे. कधीही सांगू देत, बापू त्यातल्या पाचांची नावं कधीही विसरले नाहीत. तीस-चाळीस गोष्टी तरी बापू सांगत असतच. (पृष्ठ १७) हा स्मरणशक्ती प्रत्यक्ष भेटलेल्या माणसांच्या बाबतीत मात्र दगा देत असलेल्या नमूद करतात. पण ही स्मरणशक्ती हा त्यांच्या आईचा वारसा असल्याचेही त्या सांगून जातात.
वपुंची पत्नी वसुंधरा, लेखिकेची आई, तिचंही व्यक्तिचित्रण यात येणं ओघात आलंच. पण जवळपास ते निम्म्यानं आलंय. अर्थात तेही आवश्यक आहे. पण पुस्तकाचं नाव वपु-वसुंधरा या अद्वैताच ‘वपुंधरा’ असं एकत्रित केलं असतं तर ते अधिक उठून दिसलं असतं. चाळीतल्या जीवनापासून नंतर सुस्थितीतील निवासस्थान असा प्रवास आणि त्यातील मध्यमवर्गीय गृहिणी म्हणून त्याचं स्थान, स्वभाव यांचं एक चांगलं चित्रण येतं. पती-पत्नीचं एकमेकांवरचे प्रेम आणि संसाराला समर्पित अशी भारतीय गृहिणी, मुलांवरच्या संस्काराचं महत्त्व अशा अनेक गोष्टी यात येतात. त्या लिहितात, ‘आई स्वत: एक कलाकार होती. ती गायची छान (पृ. ३७) त्यांना नाटकात काम करण्याची संधी मिळत होती. पण कुटुंबासाठी त्यांनी स्वत:हून ते नाकारलं. उत्तम समीक्षक म्हणून वसुंधरा याच वपुंच्या पहिल्या वाचक होत्या. त्यांनी इतरही अनेक नाट्परीक्षणं लिहिली; त्याचं ‘दहाव्या रांगेतून’ हे पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे. त्यामानानं त्या लवकर गेल्या. त्यांचे एक उद्गार विदारक चित्र उभं करतं. त्या वपुंना म्हणाल्या होत्या, आधी मी मेली तर सुटले. पण एक विनंती, घर माझ्या नावावर ठेवा. तुम्ही माझ्या आधी गेलात तर माझं आयुष्य त्या नटसम्राटासारखं भरकटू नये म्हणून (पृ. ३८) ही अनिश्चितता शब्दात पकडून स्वारी लिहितात, आईला विश्वास अविश्वासाचा प्रश्न भेडसावला नाही. हा प्रश्न निर्माण होण्याआधीच तिच्या जाणिवा लुप्त झाल्या आणि नंतर ती स्वत:च लुप्त झाली. (पृ. ३९) आईच्या मृत्यूचे वर्णन वाचताना माणसातली सहृदयता जागी होते. (पृ. ११८-११९)
कुटुंबातल्या आई-वडिलांच्या बहिण भावंडांच्या इतर अनेक आप्तांच्या, स्नेह्यांच्या आठवणी या सर्वसाधारणपणे सर्वच मध्यम वर्गीयांच्या जीवनाप्रमाणे आहेत. पण अकृत्रिम, सहजसुंदर भाषाशैलीने त्या उठावदार झाल्या आहेत. वपु आणि वसुंधरा त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग इथे चित्रपटाप्रमाणे पुढे येतात. ह कालानुरूप नसले तरी पुस्तकाच्या चित्रमयतेला आणि वाचनीयतेला बाधा आणत नाहीत. वपुंच्या अनेक साहित्यिक मित्रांची आणि अन्य स्नेहींची शब्दचित्रेही अतिशय उत्कट उतरली आहेत. वपुंचा पत्रव्यवहारही मोठा होता. त्यातून जोडली गेलेली अनेक नाती आपल्याही परिचयाची होऊन जातात. त्यातला एखादा पेडणेकर असेल किंवा विजय लोटके. पण लक्षात राहतो, विक्रमसिंह धनंजय कुलकर्णी. ही सगळी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली पण सगळ्यांचा वीकपॉइंट वपु हाच! साहित्यिक पिढी ग. वा. बेहरे, पु. रा. बेहरे, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, अरविंद गोखले, विंदा करंदीकर इ. अनेकांच्या अनेक आठवणींमधून बऱ्याच गोष्टींचे संचित हाती येते.
वसुंधराबार्इंचं आणि वपुंचं दोघांचंही निधन चटका लावणार होतं. ते हृदयस्पर्शी वर्णन वाचून मन हेलावतं. एक महिला डॉक्टर आणि तिचे पती हे दांपत्य वपुंचे स्नेही. काही कारणानं ते वपुंच्याकडे वास्तव्यास आले. वपुंना डॉक्टराचं वास्तव्य नको होतं असं लेखिकाला खूप उशिरा कळलं. हा प्रसंग मोघमपणे येतो. शेवटी इडली खाण्याची वपुंची इच्छा अपुरी राहिली. पण त्या डॉक्टरबार्इंनी त्या त्यांनीच आणलेल्या इडल्या त्यांच्या मृत्यूनंतर लगेच खाल्या. त्या बाईबद्दलची भावनाही तशा सौम्य शब्दात करताना स्वाती चांदोरकर म्हणतात. संकटसमयी तुम्हाला (वपु) एकटं करणाऱ्या डॉक्टरांना आम्ही नाही मान्य करू शकलो. त्या इडल्या डॉक्टर खाऊ शकल्या असतील. पण आम्ही कुणीच नाही खाऊ शकलो. तुमची इडली खायची इच्छा होती आणि तुम्ही न खाता तसेच गेलात. मग आम्ही कशी खाणार होतो. आता तर आयुष्यभर इडली म्हटलं की. (पृ. १३२) पुस्तकाचा शेवट गंभीर होते. लेखिकेनं आपल्या वडिलांची अनेक वैशिष्ट्य भावना शैलीत सांगितली आहे. अनेक ना विणलं गेलेलं वपुंचं जीवनवस्त्र, पोते किती अस्सल होता हे पुस्तकामुळे समजतं.
काही ठिकाणी चुकीची विराम चिन्हं वगळता, पुस्तकाची मांडणी प्रगटीकरण वेधक आहे. पुस्तक १६।।१६।। सेंमी. हा आकार आणि आतली कागदावरची पण् सुंदर कृष्णधवल छायाचित्रे पुस्तकाच्या आकर्षक भर घालतात. वपुंचं विविधा उत्तम शैलीत लिहिणाऱ्या चांदोरकरांकडून लिखाणाची आर्तता वाढवणारं हे पुस्तक आहे. ...Read more
- DAINIK TARUN BHARAT 19-04-1991
वपु पाहता पाहता या माणसानं अर्धशतक पार केलयं. पहिल्या काही दशकांच्या वेळेचा काळ बिकट होता. एकेक वर्ष-धाव उरकणं हे कष्टाचं-जिकीरीचं-काम ठरलं असलं पाहिजे. वडील फार मोठे कलावंत. त्यांनी रंगवलेल्या पडद्याच्या दर्शनानंच लोक टाळ्यांचा कडकडाट करायचे. प्रसिदध कलादिग्दर्शक नुसते नाटकातलेच नव्हे, तर राजकमलच्या उत्कृष्ट बोलपटातले सेट्स शांताराम बापूंसारख्या बोलपट दिग्दर्शक-निर्मात्याच्या चोखंदळ दृष्टीला पसंत पडतील असे बनवणं म्हणजे एक बिकट कामगिरी होती, पण तीही त्यांनी पार पाडली. पण कला-जगातलं यश त्याकाळी तरी प्रचंड आर्थिक यशाचं यमक नव्हतं. दिवसभर स्टुडिओत राबायचं व रात्री नाटकातले पडदे आणि सेट्स तयार करायचे. हे सारं आटोपून पु. श्री. काळे यांना रोज पुण्याला मुंबईहून जाणं आणि परतणं शक्यचं नव्हतं. परिणामी मुलानां पितृछायेची आल्हादता रोज लाभणं शक्यच नव्हतं. मुलांना स्वत:च्या विकासाकरिता स्वत:वरच अवलंबून राहणं आलं. यशाच्या पायऱ्या, बाल-स्थितीत चढायला, गुणी आणि वत्सल असलेल्या पित्श्सख्स आधार लाभणं परिस्थितीनंच अशक्य करुन टाकलं होतं.
एक-एक वर्ष धाव म्हणूनच जमेला धरणं ही प्रत्येक वेळीच एक परीक्षाच होती- स्वत:च्या नुसत्या कठीण प्रयत्नांचीच नव्हे, तर पुढच्या कामगिरीबाबतच्या दूरदृष्टीची स्वतंत्र प्रज्ञेची, कल्पकशक्ती आणि मुख्य म्हणजे धीराचीही! या साऱ्या काळात बाकी या मुलाला खूप काही शिकवलं असलं पाहिजे. स्वकष्टानं विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अमाप अनुभव येतात, फक्त त्याचं अवलोकन डोळस हवं! इथे या मुलाला आणखी एक लाभ होता-- प्रतिभेचा! त्यामुळेच मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एकक अनुभवात या लेखकाला कथाबीज दिसलं.
साधारणत: फसली आहे, अशी एकही कथा वपूंची आपल्याला दिसत नाही. प्रत्येक कथा एकदम वाहवा घेते. मला फॅण्टसी या वेगळ्या स्वरूपात त्यांनी लिहिलेल्या कथा म्हणा- मद्य काव्य म्हणा- फारसं आवडलं नाही; पण ही माझी दृष्टी झाली. इतरांना त्या खूपच आवडल्या.
जे वातावरण माहितीच नाही, त्या वातावरणावर उगीच पाडायची म्हणून कथा वपूंनी पाडली असे दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण जीवन, मजूर-शेतकऱ्याचं जीवन, दलितांचं करुण-भयाण परिस्थितीच जीवन, यावर वपुंनी कथा लिहिलेल्या दिसत नाहीत. शहरी- त्यातही मुंबई-पुण्यातल्या- मध्यमवर्गीय कुटुंब-जीवनातल्या गुंतागुंती, त्यांचं भावविश्व, त्यांचे हर्ष-विमर्ष यावरच्या त्यांच्या कथा बघून घ्या! एकेक कथा म्हणजे आनंद देणारी सुबक कलाकृतीच. आणि वाचकांचंही वपूंना किती प्रेम लाभावं? एका तरुणानं वपूंची ‘पार्टनर’ ही कादंबरी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात संपूर्ण लिहून देऊन त्यांना अर्पण केली!
कथा खूप जण चांगल्याही लिहितात, त्या वाचवतात; पण त्या कथा त्याच लेखक/लेखिकांना सांगायची वेळ आली, की भट्टी फसते! त्याच कथा त्यांच्याच निर्मात्याकडुन ऐकणं म्हणजे एक शिक्षाच वाटू लागते. चुळबुळ करत श्रोते ऐकतात आणि त्यांच्या सहनशीलतेचं कथानिवेदक जणू अंतच बघतो.
कथा-कथन ऐकावं ते वपुंचंच. अशी कीर्ती या माणसानं मिळवली. मुळात कथा आहे, त्यापेक्षा सुंदर वाटले ती त्यांच्याच तोंडून ऐकताना. त्या कथेच्या डौलदार, देखण्या वृक्षातल्या टवटवीत पालवीची वेगवेगळी देखणी रुप आपली नजर हलू देत नाहीत!
मला पुष्कळदा वाटतं, वपू जणू कथा जगतातच. मोठ्या कलावंताचं हे लक्षण नाही काय? स्वत:च्या कलाप्रकाराच्या समाधीत तो सदैव मग्न असतो. अल्लारखाँवरची डॉक्युमेंटरी आठवते? कारमध्ये बसून मानेवर हाताचे पंजे ठेवून जाणाऱ्या या तबलानवाजाचं पाठमोरं चित्रीकरण केलंय. त्याची बोटं सारखी वळवळत असतात. वाटतं एक एक तबल्याचा न ऐकू येणारा बोल ऐकून घ्या! श्री. जितेंद्र अभिषेकी सतत गायनाच्या धुंदीत विचारमग्न दिसतात. वपुंबरोबर तुम्ही फिरा, काही वेळ घालवा. तेवढ्यात वपूंकडून तुम्हाला सुंदर कथा ऐकायला मिळेल.
वपु काळे मोठा कथा-लेखक, पण हा माणूस फार भाव खातो. ते फारच पैसे घेतात. ते फार लहरी आहेत. इ. वपूंबद्दल मी खूप ऐकलं आहे. ‘स्वत:च्या कथांशिवाय ते दुसऱ्या कुणाची कथा ऐकायलाच तयार नाहीत’ हेही ऐकलं! पण असं बोलणाऱ्यांना मी सांगतो, मला स्वत:ला असा मुळीच अनुभव नाही. आता दुसरं पैसे घेण्याबद्दल. आज त्यांच्या कलाकृतीला मागणी आहे. त्यांनी मोबदला ठरवावा. ऐन हिवाळ्यात चार आणे किलो मिळणाऱ्या टोमॅटोला तुम्ही एका काळी चार रुपये दरही देता की नाही? ही तर साधी भाजीची गोष्ट झाली. उद्या भीमसेन वृद्धत्वामुळे त्याच दमानं गाऊ शकले नाहीत, तर त्याचं गतवैभव आठवून तुम्ही त्यांना आदरानं बोलवाल काय? त्यांना घसघशीत मानधन द्याल काय? आज गान तपस्विनी बसलेल्या, हिराबार्इंना तुम्ही मुद्दाम बोलावता काय? हा तर व्यवहार आहे.
आज वपू शेकड्यानं मानधन अपेक्षित असतील, पण हा माणूस माणुसकी सोडून वागल्याचं मला तरी दिसलं नाही. अगदी गतवर्षी आमच्या विद्यार्थिनींना, तयांनी कसलीही अपेक्षा न ठेवता, सुंदर कथा सांगितल्या. तुमचा स्वत:चा प्रत्यक्ष अनुभव सांगा म्हटलं की, मग कुणीच बोलत नसतं! आपल्या नागपूरच्या सौ.सुनीती आफळेंच्या कथाकथनाला त्यांनी दाद दिलेली मी स्वत:च बघितलीय. आणि बाराव्या वर्गात शिकणाऱ्या मुग्धा चिटणीस या उदयोन्मुख कथानिवेदिकेला वपूंनी मार्गदर्शन केलंय्, हेही मला माहिती आहेच. पु. भा. भाव्यांची एक कथा ‘नादान’, वपूंनीच तिच्याकडून उत्तम बसवून घेतल्याचं मी ऐकलं आहे.
तर असा हा कलाप्रेमी, कथाच जगणारा मस्त, रसिक, मजेत केशरी अबोली रंगाची गाजरं खात रस्त्यानं भटकण्याची खोटी लाजमुक्त न मानणारा फक्कड माणूस, त्याचं अक्षर मोत्यासारखं. कंपोझिटरला तर अक्षर-मोत्यांनी मढवलेला त्याचा कागद हाती घेताना संकाच वाटत असेल! संगीताचा हा दर्दी. त्याचं घरकूल म्हणजे एक देखणा सेटच जणू! असो.
२५ मार्चला वपुंनी पन्नाशी ओलांडली. आज ते नागपुरात आहेत. त्यानिमित्तानं ही दोस्ताची आठवण. ...Read more