NEWS PAPER REVIEW प्रसिद्ध मानसशास्त्र डॉ. सिम्मंड फ्रॉइड याने माणसाच्या मनाचे प्रकट मन व अप्रकट मन असे कप्पे दर्शवून त्याच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि मग माणसाच्या मनाच्या तळघरातील अनेक गूढ, विसंगत, चमत्कारिक विचार विकार व वर्तन यांचा परस्पर संबंध जोडण्याचही प्रयत्न होऊ लागला. माणूस स्वत:शी संवाद साधू लागला तर मनाच्या अंतराळातील चक्राकार फिरत असलेल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा कार्यकारणभाव तो स्वत:च लावू शकतो. वर्षानुवर्षे मनात जपलेली रहस्ये उलगडून दाखवावी, अशी उर्मी येते.
‘अंतराळ’ कादंबरी म्हणजे मनाच्या अशाच एका अवस्थेत प्रथमपुरुषी निवेदनातून केलेले अंतर्मनाचे प्रगटीकरण. कादंबरीची सुरुवात वर्तमानातली. निवेदक आत्म्याशी संवाद साधत पन्नास वर्षांच्या आयुष्यातले अनुभव सांगतो. या आत्मनिवेदनात सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घटना, समस्या, संघर्ष आहे. कादंबरीचा कालखंड हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा व सरंजामशाहीचा सरता कालखंड. राजकीय सत्तांतरामुळे काळानुरूप होणारे समाजव्यवस्थेतील बदलांचे उल्लेख कादंबरीत येतात. यातील राणे कुटुंब म्हणजे सरंजामशाही व्यवस्थेचा नमुना. या सरंजामशाहीच्या खुणा, पिढ्यान्पिढ्या रक्तात भिनलेली वैशिष्टये, गुण-अवगुण हे प्रसंग, घटना, संवाद यातून व्यक्त होत राहते. नीतिअनीतीचे मापदंड सरंजामशाहीला लागू नसतात, असे अभिमानाने व धाष्र्टयाने सांगणारा तरुण आजच्या तरुण पिढीच्या बेताल वर्तनावर कोरडे ओढतो हा केवढा विरोधाभास!
कादंबरीलेखनाचा उद्देश आत्मनिवेदनाचा आहे पण यात केवळ व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनाचा पट नाही. त्यास राजकीय स्थित्यंतराची, तत्कालीन परिस्थितीची पाश्र्वभूमी आहे. गांधी-नेहरूंच्या विचारांचा जबरदस्त पगडा असलेली पिढी व नंतरची ध्येयशून्य, तत्त्वशून्य, चंगळवादास बळी पडत चाललेली तरुण पिढी यांच्यातील वैचारिक मतभेद, संघर्ष हे सारे केवळ निवेदनाच्या पातळीवर न राहता परिणामकारक ठरते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे देशातले अनिश्चिततेचे वातावरण, औद्योगिकीकरण, दुष्ट प्रवृत्तींचा प्रादुर्भाव, भ्रष्टाचार यांचा कोवळ्या पिढीवर होणारा परिणाम, आदर्शवाद, उच्च नीतिमूल्ये व निराशा, किळसवाणी स्पर्धा, वशिलेबाजी, हिंसाचार, जातीयता, तत्त्वांची पायमल्ली आधोरेखित होतो. गांधीयुगातील पात्रे, त्यांच्या वेदना परिस्थितीशी तडजोड करण्यातली अगतिकता या वास्तवातली दाहकता वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचते. कारण ही निव्वळ टीका नाही. कृतिशीलता पिढीच्या अंत:करणाची ही तळमळ आहे. प्रस्तुत कादंबरीतील पुजारी मास्तरांचे पात्र स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताचे चित्र डोळ्यासमोर उभे करते. या पिढीचा मानसिक संघर्ष, तुटलेपण, निराशावाद मास्तरांच्या भावनांच्या उद्रेकातून व्यक्त होते. राजकीय व सामाजिक परिस्थितीवर मास्तर कोरडे ओढतात. ‘‘आजची तरुण पिढी मरण्याआधीच वृद्धांना मारून टाकते,’’ या शब्दात वृद्धांची कालची, आजची व उद्याची समस्या तीव्रतेने मांडली जाते, अशा पिचल्या गेलेल्या पिढीचा संताप ‘गोरी साम्राज्यशाही जाऊन गहूवर्णी साम्राज्यशाही आली,’ अशा शब्दात व्यक्त होतो. गांधीजीसारख्या युगपुरुषाच्या अस्तानंतर त्यांची तत्त्वेही काळाच्या ओघात वाहून जातात हे कठोर वास्तव स्वीकारणे भाग पडते.
कादंबरीत येणारे सामाजिक संदर्भ त्यांचे अवलोकन वर्ण धर्माधिष्ठित समाजातील दोन भिन्न संस्कृतीतले अंतर यांचे चित्रण आहे. सरंजामशाही म्हणजे मुक्त वर्तनास मिळालेला परवाना अशी पारंपरिक, बेछूट मनोवृत्ती, तरुण पिढीचे अनिर्बंध स्वातंत्र्य, शिस्तीचा अभाव तर दुसरीकडे पारंपरिक रुढीरीतीरिवाजांशी घट्ट पाळेमुळे असलेली महत्त्वाकांक्षी ब्राह्मणी संस्कृती यांचे चित्रण निवेदक करतो. स्वत:च्या कुळाबद्दलचा अभिमान व्यक्त करताना ब्राह्मणी संस्कृतीवर उपहास गर्भ टीकाही करतो. भौतिक सुखसोयीविषयी वाटते आकर्षण, नैतिक अध:पतन, बदलती नीतीमूल्ये यांचा तरुण पिढीच्या आचारविचारांवर होणारा परिणाम व त्यामुळे निर्माण होणारा कौटुंबिक व सामाजिक स्तरावरील संघर्ष घटनांच्या माध्यमातून चित्रित केला जातो. निवेदक व सरंजामशाहीतील शेवटचा शिलेदार सरंजामशाहीच्या अस्ताची झळा त्यासही लागलेली आढळते. एकीकडे या संस्कृतीच्या प्रभावाखालील असलेले त्याचे व्यक्तिमत्त्व तर दुसरीकडे पुआरे मास्तरांचा, माक्र्सवाद वगैरे सुधारणावाद्यांचा प्रभाव असलेले व्यक्तिमत्त्व यामुळे दुहेरीपण जाणवते. स्वभावत: असलेली पराकोटीची संवेदनशीलता झोवूâन देण्याची वृत्ती यामुळे त्याच्या विचारात नैतिक गोंधळलेपण आहे.
‘मी प्रामुख्याने बुद्धजीवी नाही. बुद्धीच्या पातळीवर जगत नाही. संवेदनाच्या पातळीवर जगतो. या निवेदनातून तो ‘स्व’चा शोध घेत आहे, असे दिसते. म्हणून भावनाप्रधानतेमुळे ब्राह्मण मुलीशी प्रेमलग्न करतो पण त्याच्या विचारात परिपक्वता नसल्याने झोवूâन देण्याच्या वृत्तीतून प्रौढपणीही स्त्रीविषयक अनावर आकर्षणातून आवेगाने ओढला जातो. शरीर पातळीवर प्रेम, आकर्षण, तारुण्यातील कोमल भावनांना आवाहन करून निर्माण झालेले प्रेम व प्रौढ वयातील आवेगाने केलेले प्रेम अशा प्रेमाच्या विविध अवस्था, छटा, रंग यांचे अनुभव धिटाईने व्यक्त केले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याची चाहूल व भविष्यातील उद्रेक तरुण पिढीच्या विशेषत: निवेदक व नंद्या (भिन्न) यांच्या संवादातून जाणवते.
निवेदनाच्या भात्यास कधी कधी सार्वकालिक परिमाण लाभतं. मूल्य बदलत असताना चर्चेला वाव नसतो. वेगवेगळ्या मूल्यांचं घर्षण सुरु झालं की, तिथं तडजोड अशक्य असते. त्यावेळी मौन हाच उत्तम मार्ग असतो.
एकाच व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू येथे पाहावयास मिळतात. पाश्चात्य विचारसरणीच्या प्रभावातून व्यक्तिवादाचा उदय व वर्णधर्माधिष्ठित समाजास छेद देऊन निर्मितीचे स्वप्न बघणे, शोषण करणाऱ्या व्यक्ति व व्यवस्था नष्ट झाल्या पाहिजेत या माक्र्सवादी विचारांचा प्रभाव असे हे अनेक रंगी व्यक्तिमत्त्व, आदर्शवाद, तंगळवाद, भोगवाद यांच्या गोंधळात सापडलेले त्याचे विचार आहेत. त्यात अपरिपक्वता आहे असेच दिसून येते. ‘आपण हिंदू ना! आपल्याला जगाविषयी आस्थाच नाही’ आपल्याला आस्था पुढच्या जन्माची विंâवा मोक्षाची! अशा शब्दात हिंदू धर्म तत्त्वज्ञानावर उपहासगर्भ टीका तो करतो.
आपल्या लेखनाचा हेतू मांडताना ‘‘हा मीपणाचा शोध नाही, त्याहीपेक्षा मी ते सेलिब्रेट करीत आहे. पन्नास वर्षांच्या जीवनाचा एका दृष्टीने ऊहापोह करायचा आहे.’’
माणसातील पराकोटीच्या संवेदनशीलतेमुळे एखाद्या धक्कादायक घटनेचा खास परिणाम होऊन त्या माणसाचा मानसिक तोल ढळू शकतो. कणखर व्यक्तिमत्त्व नसल्यास ही शक्यता अधिक असते यास मानसशास्त्राचा आधार आहे. अशाच एका अत्यंत भावनाप्रधान, अतिसंवेदनशील, आदर्शवादी, चंगळवादी अशा रसायनांनी घडलेल्या व्यक्तिचे हे आत्मनिवेदन या आत्मनिवेदनाला अभिनिवेश नाही पण उत्कट भावनांचे प्रगटीकरण आहे. एक प्रकारचा कबुलीजबाब आहे. प्रौढ वयातही एका स्त्रीमुळे मानसिक तोल ढळू शकणाऱ्या दुबळ्या व्यक्तिचा आत्मशोधही आहे. याच स्वभावविशेषांचा वारसा घेऊन चौकटीबाहेर पाऊल टाकण्याचा वेडेपणा करणाऱ्या आपल्या लेकीला सावध करणाऱ्या वत्सल पित्याचा हा इशाराही असेल. म्हणून लेखकाच्या समर्थ लेखणीतून उतरलेले हे निवेदन वाचकांच्या मनाच्या अंतराळात एक आवर्त निर्माण करते. अनेक विषयांना स्पर्श करून जाणारी ही कादंबरी एका सामान्याचे आत्मप्रगटीकरण असूनही व्यक्तिकेंद्री नाही. त्यास सामाजिक, राजकीय संदर्भ आहेत. या सर्व परिस्थितीत, प्रभावात घडलेल्या एका व्यक्तीची ही जीवन कहाणी तर आहेच पण त्याच्या मनाचा प्रवासही आहे.
...Read more