- DAINIK SAMANA (KOLHAPUR) 22-12-2002
सामाजिक समस्यांचा शोध...
डॉ. किरण बेदी एक आगळंवेगळं, कणखर तरीही मृदू व्यक्तिमत्त्व. संवेदनशील, दीनांच्या कैवारी, दीनदुबळ्यांसाठी, पीडित शोषितांसाठी तळमळीने सतत प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या किरण बेदी. हिंदुस्थानच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद भूषविण्यचा मान प्राप्त झालेल्या त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. मानवतावादी निर्भय दृष्टिकोन, नि:स्वार्थी सेवाभावी वृत्तीतून त्यांनी पोलीस खात्यात व तुरुंगाच्या व्यवस्थापनात असंख्य सुधारणा घडवून आणल्या. त्याबद्दल त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांनी सामाजिक समस्यांसाठी सेवाभावी संस्थांची स्थापना केली. कित्येकाचे आयुष्य मार्गी लावण्याचं कार्य या संस्थांद्वारे होत असतं.
पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर काम करत असताना गुन्हेगारी जगताशी त्यांच जवळून संबंध आला. त्यांच्याकडे मानवतावादी दृष्टिकोनातून बघून त्यापासून परावृत्त करणे, नव्यानं चांगलं जीवन जगण्याची संधी देणे या उद्देशानं या संस्थाची निर्मिती केली गेली. अशा व्यक्तीच्या अनुभवातून ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’ या हेतूने या व्यक्तींची ही आत्मकथने ‘व्हॉट वेंट राँग’ या पुस्तकात मांडली आहेत. या साऱ्या व्यक्ती प्रत्यक्षातील असून किरण बेदी त्यांना प्रत्यक्ष भेटल्या आहेत. या दुर्दैवी जिवांच्या कहाण्या समाजातील इतरांना सावध करतील, त्यांचं जीवन नरक बनवण्यापासून वाचेल हा स्युत्य हेतू या पुस्तकामागे आहे.
पुस्तकातील करुण कहाण्यातील हे दुर्दैवी जीव बहुतांशी गरीब, अज्ञानी, अशिक्षित व समाजातील खालच्या थरातील आहेत. त्यांच्या नरकसदृश अवस्थेची कारणं काही सारखी तर काही भिन्नही आहेत. दारिद्र्य व निरक्षरता हीच प्रामुख्याने यामागची कारणं दिसून येतात. दारिद्र्यामुळे शिक्षणाचा अभाव, त्यामुळे कुटुंबातील मुलांची वाढती संख्या, बेकारी, त्यातून येणारं नैराश्य, व्यसनाधीनता या परिस्थितीमुळे मुलांकडे होणारं दुर्लक्ष, त्यातून मुलांच्या आयुष्याची होणारी ससेहोलपट अशा दुष्टचक्रात हा सामाजिक स्तर गुरफटलेला दिसतो. आणखी एक कारण म्हणजे मुलगी हे ओझं मानण्याची हिंदुस्थानी समाजाची मानसिकता. यातूनच स्त्रीच्या आयुष्याची ससेहोलपट सुरू होते, फरफट होत राहते. अशा कित्येक कहाण्या यात अंतर्भूत आहेत. कमालीच्या दारिद्र्यामुळे, प्रतिकूल परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून व्यसनाधीनता आणि त्यामुळे कुटुंब देशोधडीला लागणं अशा घटनाही नित्यच घडत असतात. याचं प्रमुख कारण म्हणजे या वर्गाचा कोणीच वाली नसतो. लेखिकेने या वर्गाचं, लोकांचं, त्यांच्या परिस्थितीचं, मानसिकतेचं खूप निरीक्षण केलेलं दिसून येतं. दारू, मादक पदार्थाचं सेवन, पौगंडावस्थेतच यास बळी पडणं, कधी आईवडिलाकडूनच यासाठी केली जाणारी बळजबरी अशा धक्कादायक घटनांची मालिकाच उभी राहते. माणूस पशुवत वर्तन करतो व स्वत:सहित कुटुंबाचाही नाश ओढवून घेतो. या व्यक्तींवर अन्याय होत असतात. यास काही वेळा पोलीसही जबाबदार असतात. याकडेही लेखिका निर्भीडपणे लक्ष वेधते. परंतु अशीही क्वचित काही उदाहरणे आहेत की पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे काहीचे जीवन विनाशापासून वाचले आहे. दहशतवाद, आतंकवाद, राजकीय स्थिती, पाकिस्तान, बांगलादेश फाळणी अशा घटनांमुळे ही कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त कशी झाली त्याच्या करुण कहाण्या आहेत.
पुस्तकातील प्रत्येक कहाणी पाझर फोडणारी, मानवतेला लांच्छनास्पद आहे. कारण कोणतंही असो, परिस्थितीला बळी जाता स्त्रियां, बालकं, तरुण वर्ग, दुबळे, संवेदनशील मनं हादरून जातील अशी ही सत्यकथनं माणसाला माणूस बनण्याकडे प्रवृत्त करतील असा आशावाद लेखिकेच्या मनात असावा. मानव्याचं निशाण हाती घेऊन समाजातील काही घटक अहोरात्र झटत आहेत. तरीही सामाजिक समस्यांची व्याप्ती व भीषणता पाहता सेवाभावी संस्थांची, व्यक्तींची संख्या कमीच पडत आहे असं वाटतं. या दृष्टीनं ‘व्हॉट वेंट राँग’ या प्रश्नापाठोपाठ असंख्या सामाजिक समस्यांच्या मुळाचा हा शोध म्हणून हे पुस्तक महत्त्वाचा ठेवा तर आहेच पण प्रेरणादायीही आहे हे निश्चित.
-माधुरी महाशब्दे ...Read more
- DAINIK SAKAL (KOLHAPUR) 08-12-2002
समाजबळींच्या बोचऱ्या आत्मकथा ...
तसं माझं नाव सीता. एकोणीस वर्षाची असताना अपरिचित दिल्लीत आले. रिक्षावाल्यानं फसवून बलात्कार केला. पुढे निकाह. मी अफसाना झाले. तशी घरच्यांनीही मला टाकलं. आज पदरातली मुलं हाच माझा जीवन आधार!
मी मनू वय अवघं नऊ वर्षांच. दुकान फोडणारा माझा मित्र होता. मैत्री हाच माझा गुन्हा. मी रिमांड होममधून नुकताच बाहेर आलोय. निष्पाप मी. समाजाच्या नजरेत मात्र गुन्हेगार!
आमचं कुटुंब तसं कुणाच्या अध्यातमध्यात नव्हतं. पंजाबात दहशतवाद बोकाळला तेव्हा आमच्यासारखी कुटुंबं हकनाक शिकार झाली. पोलीस नि आतंकवादी दोघांचे आम्ही हक्काचे बळी. आज निर्वासित छावणीत निराश्रितांचं जीवन कंठतोय! माणूसपण हरवलेली माणसं आम्ही!!
या नि आशा किती तरी सामाजिक अत्याचारांच्या बळी ठरलेल्यांच्या आत्मकथांचा संग्रह आहे ‘व्हॉट वेट राँग?’ शीर्षकापासूनच तुम्हास तो विचार करायला भाग पाडतो. भारतीय पोलीस सेवेतील उच्चाधिकारी डॉ. किरण बेदी यांनी आपल्या सामाजिक कार्यानुभवातून ‘इंडिया व्हीजन फाउंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली आहे. ती प्रामुख्याने तुरुंगमुक्त बंदीजनांच्या पुनर्वसनाचं कार्य करते. ‘नवज्योत’ ही व्यसनमुक्तांची सामाजिक पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न करते. अशाच आणखी बऱ्याच संस्था आहेत - ‘फॅमिली व्हीजन’, ‘क्राईत होम चिल्ड्रन प्रोजेक्ट’ इत्यादी. या संस्था परस्पर सहकार्याने पूरक कार्य करतात. त्यांच्याकडे रोज येणारी गाऱ्हाणी किरण बेदी यांनी त्यांच्याच शब्दांत आत्मकथनांच्या रूपात आपणापुढे ठेवलीत. ती वाचत असताना मन बधिर होऊन जातं. बुद्धी कुंठित होते. वाचक विचार करू लागतो. नेमकं चुकलं कुठे? ‘व्हॉट वेट राँग?’ मध्ये अशा सदतीस दर्दभऱ्या कहाण्या आहेत. ज्यांना कुणाला समाजमन, शासन व्यवस्था, पोलिसी यंत्रणा, तुरुंग, रिमांड होत बदलायचं असेल त्यांना हे पुस्तक सामाजिक दस्तावेजाचं काम करील.
‘आय डेअर’ हे परेश डंगवाल यांनी लिहिलेलं किरण बेदी यांचं चरित्र. हे वाचताना त्यांची घडण नि संघर्ष कळतो. ‘इटस् ऑलवेज पॉसिबल’. तिहार तुरुंगाचा ‘तिहार आश्रम’ करण्याच्या किमयेची कहाणी. ‘मजल दरमजल’ ही सतत पुढच्या पावलांची छाप आपणावर टाकते; पण ‘व्हॉट वेट राँग?’ मात्र आपणस अंतर्मुख होण्यास भाग पाडते. बलात्कारित, अत्याचारित, व्यसनाधीन कायद्याचे तांत्रिक बळी, निष्पाप, रमी असणं, सुंदर असण्याचा शाप भोगणाऱ्या भगिनी, युनियनच्या राजकारणाचे बळी ठरलेले कामगार, पोलिसी खाक्याचे बळी वाचले की वाचकांच्या मुठी आपोआप वळू लागतात. या कहाण्यांतील व्यथा तुमच्या संवेदनशील मनास साद घालत पाझर फोडतात. प्रत्येक आत्मकथनाच्या शेवटी डॉ. किरण बेदी यांनी ‘कुठं चुकलं?’ अशी चौकट टाकली आहे. चौकटीत घटनांचे निष्कर्ष आहेत. ते विचारप्रवण होत. ते नेमके करणे आवश्यक होते. प्रत्येक कहाणीत चूक कोणाची याचा न्याय होता, तर या कहाण्या नेमक्या होत्या; पण ती कठीण गोष्ट आहे खरी. ‘नवज्योत’, ‘इंडिया व्हीजन’, ‘फॅमिली व्हीजन’कडे समुपदेशनासाठी (काऊंसिलिंग) आलेल्याना त्यांच्याच शब्दात त्यांचं जीवन लिहिण्यास प्रेरित करण्याचं मोठे काम किरण बेदी यांनी केलं आहे. त्यामुळे ‘व्हॉट वेंट राँग?’च्या माध्यमातून सामाजिक अत्याचारांचा एक विशाल पटल आपणापुढे उभा राहतो. त्यांना सुखासीन जीवन लाभलं त्यांना या आत्मकथा अतिशयोक्त वाटण्याचा संभव, परंतु ज्यांनी तुरुंग, रिमांड होत, स्त्री आधार केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र पहिली अनुभवली असतील त्यांना अजून वास्तव दूरच वाटल्याशिवाय राहणार नाही.
‘व्हॉट वेट राँग?’ ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित स्तंभलेखन. ‘नवभारत टाइम्स’मध्ये त्यांचा हिंदी अनुवादही येत राहायचा. लीना सोहनी यांनी त्याचा उत्कृष्ट मराठी अनुवाद पुस्तकरूपात सादर केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने इंग्रजी ग्रंथांचा मराठी अनुवादाची जी चळवळ सुरू केली आहे त्यातनं हे पुढचं पाऊन. या ग्रंथाचं जे साहित्यिक मूल्य आहे त्यापेक्षा मला त्याचं सामाजिक मोल अधिक महत्त्वाचं वाटतं. ते अशासाठी की या ग्रंथात बधिर समाजमनास संवेदन, सक्रिय करण्याची प्रचंड ताकद आहे. हा सामूहिक आत्मकथनपर ग्रंथ सामाजिक अत्याचाराचे अनेक नमुने वाचकांपुढे पेश करतो. लक्षात येतं की, किती प्रकारचे अत्याचार असतात समाजात. निरपराधांना अभय देण्यासाठी ‘खल निग्रहाणाम्’ ब्रीद धारण करणारी पोलिस यंत्रणा किती कुचकामी, पक्षपाती, भ्रष्ट आहे. आशादायी उदाहरण अपवाद. समाजाच्यालेखी तुरुंगात जाऊन आलेला, रिमांड होममध्ये असणारा, पोलिसांनी अटक केलेला तो गुन्हेगार हे अविचारी समाजमनं भावसाक्षर, निरक्षर, न्यायविवेकी केव्हा होणार? व्यवस्थेविरूद्ध लढणाऱ्यांच्या बाजूने आपण असंघटित होणार की नाही? निरपराधांना सामाजिक अभय केव्हा मिळणार? न्यायातील दिरंगाई केव्हा थांबणार? अशी अनेक प्रश्नचिन्हं निर्माण करणारं हे पुस्तक सामाजिक जागृतीचा व भावसाक्षरतेचा अक्षर ग्रंथ होय. महाविद्यालये, विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात अशी पुस्तके आता पाठ्यपुस्तके व्हायला हवीत, तरच समाज बदलू शकेल. तरुणाईपुढे विधायक कार्यक्रम आले, तरच समाजहिंसा थांबेल.
किरण बेदी यांनी समाजवळींच्या बोचऱ्या आत्मकथा सादर करून वास्तववादी साहित्यशृंखला बळकट केली आहे. यातला सामूहिक आक्रोश आपण कान भरून ऐकला पाहिजे. मन भरून विचार केला पाहिजे व समाज परिवर्तनात आपली सक्रिय भागीदारी निश्चित केली पाहिजे. आपल्या निष्क्रियतेमुळे व्यवस्था मोकाट होईल, तर आपणही केव्हा तरी असे मुकाट, मौन, मतिगुंग बळी ठरू. या ग्रंथाचे जागोजागी सामूहिक वाचन झाले, तरच समाज भावसाक्षर होऊन जुलमी व्यवस्थेस लगाम बसेल. या ग्रंथ प्रपंचामागे किरण बेदीचा होराही हाच आहे.
-डॉ. सुनीलकुमार लवटे ...Read more
- DAINIK KESARI 13-10-2003
गुन्हेगार कुणी जगी निर्मिला!...
‘आय डेअर’ या किरण बेदी यांच्या ‘इंटस् ऑलवेज पॉसीबल’ या तिहार जेलच्या कायापालटाच्या आत्मकथनाला मराठी वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता त्यांचे ‘व्हॉट वेंट राँग’ हे नवे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रसिद्ध झाे आहे. किरण बेदी यांनी ‘नवज्योती’ (स्थापना-१९८८) आणि ‘इंडिया व्हीजन फाउंडेशन’ (स्थापना-१९९४) अशा दोन स्वयंसेवी संस्थांद्वारे झोपडपट्टीतील मुलांना प्राथमिक शिक्षण आणि महिलांना प्रौढ शिक्षण व व्यवसाय शिक्षण देण्याचा उपक्रम गेली अनेक वर्षे राबविला आहे. व्यसनमुक्ति केंद्रे चालवून व्यसनाधीन व्यक्तींना पुनर्जीवनाची संधीही दिली आहे. मादक द्रव्यांच्या आहारी गेलेल्यांना व्यसनमुक्त करून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या कामाचा गौरव या वर्षीचे संयुक्त राष्ट्रसंघाने ‘सर्ज सॉट्रॉफ मेमोरियल अॅवॉर्ड’ देऊन केला आहे.
गुन्हेगारी व गुन्हेगारीचे दूरगामी परिणाम यांचे अध्ययन-निरीक्षण हे एक पोलीस अधिकारी करीतच असतो. परंतु संवेदनाशील मत असेल तर या निरीक्षणाला मानवतावादाची किनार लाभते आणि गुन्हेगारीपेक्षाही गुन्हेगाराच्या आड दडलेल्या माणसाचा शोध घेण्याची प्रेरणा बलवत्तर राहते. सर्वसामान्य माणूस सहजासहजी गुन्हा करायला प्रवृत्त होत नाही. तो करणे त्याला भाग पडते. गुन्हा करण्याइतपत परिस्थितीचा रेटा जाणवतो, तेव्हा तो असहाय्य असतो. अनेकदा आपण जे करतो आहोत ते कृत्य कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरू शकेल याची कल्पनाही नसते. अजाणतेपणी काहीतरी पडून गेलेले असते आणि त्यासाठी पोलिसांच्या या न्यायालयाच्या तावडीत जावे लागते. नवज्योती व्यसनमुक्ती केंद्राचे काम सुरू झाल्यावर मूळचंदची केस आरंभी हाताळावी लागली आणि त्यातून एका नव्या समाजोपयोगी कामाला चालना मिळाली. पुढे वेगवेगळ्या व्यक्तींच्या केसेस येत गेल्या आणि त्यातून समाजजीवनातील अनेक अनिष्ट गोष्टींकडे लक्ष जाऊ लागले. डॉ. बेदी यांनी आपल्याकडे आलेल्या व्यक्तींच्या दु:भरल्या कहाण्या लक्षपूर्वक ऐकल्या आणि त्या लिहून घेतल्या. टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्या आत्मनिवेदनांना लेख रूपाने प्रसिद्धी मिळाली. अशा ३७ कहाण्यांचा संग्रह ‘व्हॉट वेंट राँग’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
या पुस्तकात ज्या कहाण्या आल्या आहेत, त्या आतड्याला पीळ पडणाऱ्या आहेत. त्यात अनेक घातपात-अपघात आहेत. दुर्दैवाचे आघात आहेत. मानवी स्वभावप्रवृत्तीचे सैतानी आविष्कार आहेत. असाहाय्य तारुण्याचे करुण दाहक वास्तव आहे.
यातील पहिली कहाणी आहे एका अफसानाची. वय २९, दोन मुलांची आई. १९ वर्षे वय असताना ती वडिलांना भेटण्यासाठी दिल्लीला येते. बसस्टँडवर उतरते. वडिलांकडे नेण्याऐवजी रिक्षावाला तिला आपल्या घरी नेतो व तिच्यावर बलात्कार करतो. ती त्यामुळे हादरते आणि ‘आताच्या आता माझ्याशी लग्न कर’ असा हट्ट करून बसते. तेवहा तो मुसलमान असल्याचे तिला कळते. ती असते हिंदू. मग तिचे नाव बदलून अफसाना ठेवले जाते. पुढे वडील तिला शोधून त्या घरी नेतात. तेव्हा ती एका मुलाची आई असते. ‘तू आमच्या तोंडाला काळ फासलंस’ असं म्हणून वडील निघून जातात. नवरा रियाझ हा बाहेर ख्याली आहे. त्याची लफडी चालूच असतात. पण ती आपल्या दोन मुलांकडे पाहत त्या रिक्षावाल्याबरोबर राहते आहे. ‘माझी मुलं हेच माझं जीवन सर्वस्व आहे. माझ्या जगण्याचा तोच आधार आहे. मला भोगावं लागलं ते माझ्या मुलांना भोगावं लागू नये, अशी तिची भावना आहे. यापैकी बऱ्याच कहाण्यांमधून पोलिसांचे जे चित्र उभे राहते ते भयानक आहे. माणुसकीला काळे फासणारे आहे. मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या वृत्तीचे निदर्शक आहे.
पोलीस चौकशीच्या निमित्ताने घरी येतात आणि घरातील मौल्यवान चीजवस्तू घेऊन जातात. पोलीस खुनाचा ठपका ठेवून वीस हजार रुपयांची लाच मागतात. (१७), अॅसिड फेकणाऱ्या रणजित व कुंदन यांची बाजू घेऊन तू खोटारडा आहेस, असे सांगून जबरदस्तीने वेगळीच फिर्याद पोलीस लिहून घेतात. (७), रोज दोन-तीन गुन्हे करणारा, नक्षलवादी दरोडेखोर जयपालसिंग म्हणतो, ‘पोलीस अधिकाऱ्यांच्या व स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीशिवाय हे असले उद्योग करणे शक्च नसते. असे बेईमान लोक पाठीशी असल्याशिवाय एखाद्या भागात आपला दरारा प्रस्थापित करता येत नाही.’’ (२४), ‘‘यातलं काहीही बोललीस तर परिणाम वाईट होतील,’’ अशा धमक्या पोलीसच हुंड्यासाठी छळ होणाऱ्या ज्योतीला देतात. (३०), पोलिसांनी मला हद्दपार करण्याची धमकी दिली. रात्री घरी येऊन माझ्या तोंडातून व गुदद्वारातून एक बांबू आत खुपसला. माझ्या घोट्यावर वार करून माझा पाय मोडला. मी अक्षरश: उद्ध्वस्त झालो.’’ हे एका सत्तर वर्षांच्या पीटर कॅम्यू व या जर्मन गृहस्थाचे अनुभव. (४१), पोलीस अधिकारी ड्युटीवर दारू पिऊन येतात. बेजबाबदारपणे वागतात. भ्रष्टाचारी व अनैतिक मार्गांचा अवलंब करतात, असेही हा जर्मन म्हणतो. (४२), पोलीस अधिकाऱ्याने चौकशीत काहीच न आढळल्यावरही माझ्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली, असे मेरीचे म्हणणे आहे. (५१), पोलीस प्रशिक्षकाला दारूची बाटली पुरवून मी त्याच्याकडून पाहिजे ती कामे करून घेऊ लागलो, अशा प्रकारची कबुली आहे. (६१), मी गुन्हे करीत उघड उघड हिंडतो. मी व्यसनाधीन आहे, पण पोलिसांनी मला आजवर कधीही पकडलेलं नाही. मी खरोखरच निरपराध होतो, तेव्हा मात्र याच पोलिसांनी मला पकडून शिक्षा केली होती, अशी दारूच्या व मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या विजयची कैफियत आहे. (७६), माझे वडील निरपराध असूनही पोलिसांच्या तावडीत सापडले. रोजच्या रोजच पोलिसांची काही ना काही तरी मागणी असायची. वेगवेगळ्या खटल्यांमध्ये विनाकारण गुंतवण्याची धमकी देऊन ते माझ्या वडिलांकडून पैसे उकळत, असे पप्पूचे गाऱ्हाणे आहे. (११३)
या पुस्तकातील सर्वच कहाण्यांमधून पोलिसांची ही जी प्रतिमा अभावितपणे प्रकट झालेली आहे आणि ती स्पृहणीय नाही. स्वत: किरण बेदी या पोलीस खात्यात उच्चपदस्थ असूनही या कहाण्यांमधील पोलिसांच्या वर्तनाबद्दलचे उल्लेख त्यांनी कायम ठेवले आहेत हे विशेष!
किरण बेदी यांनी प्रत्येक मनोगताच्या अखेरीला ‘कुठं चुकलं’ अशी चौकट देऊन काही निरीक्षणे नोंदवली आहेत. ती लक्षात घेण्यासारखी आहेत. त्या व्यक्तीच्या जीवनातल्या चुका टाळता आल्या असत्या तर अनेक अनर्थ टळले असते. तसेच सामाजिक, कौटुबिक आर्थिक, वैवाहिक प्रश्नही एकेकाचे जीवन बरबाद करण्यास कारणीभूत होतात. कायदा व न्यायव्यवस्था पोलीस व भ्रष्टाचार यामुळेही प्रश्न गुंतागुंतीचे होतात.
डॉ. बेदी यांनी ड्रग अॅब्युज अँड डोमेस्टिक व्हायोलन्स या विषयावर पीएच.डी. केली आहे. त्या अभ्यासामुळे मादक द्रव्यांचे सेवन आणि घरात मुलांचा व महिलांचा होणारा छळ याबाबत त्यांच्या संवेदना तीव्र आहेत. या सर्व सत्य घटनांतूनही त्याची प्रचिती येते. या सर्व कहाण्या वाचून मन विषण्ण होते. सात वर्षांच्या निरपराध मुलाला जेव्हा चोरीच्या आरोपावरून बालसुधार गृहात पाठवले जाते, तेव्हा त्याचे भावी आयुष्य सर्वसामान्य व्यक्तींसारखे जाईल, ही अपेक्षा करणेही व्यर्थच ठरते. ऐन तरुण वयात बलात्कार-अत्याचार होणारी तरुणी आयुष्यात निर्भयपणे जगू शकण्याची अपेक्षा करणेही गैरच ठरते. हे पुस्तक आपल्या बधीर संवेदनांना जाग आणणारे ठरायला हवे. १३ हजारांवर तरुणांना नवज्योतीने व्यसनमुक्त केले आणि अडचणीतील शेकडो महिलांना पुनर्वसनासाठी मदत पुरविली आहे. त्यामुळे आपल्याला नवी दिशा गवसू शकेल. ...Read more
- DAINIK KESARI 23-02-2003
समाजातील दोषांचे निरीक्षण...
डॉ. किरण बेदी या भारताच्या पोलीस खात्यातील सर्वोच्यपद भूषविण्याचा मान प्राप्त झालेल्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. पोलीस खात्यात आणि तुरुंग व्यवस्थापनात. त्यांनी असंख्य सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. या त्यांच्या अद्ितीय कार्यामुळे त्यांना देशोदेशीचे अनेक सन्मानही प्रज्ञपत झालेले आहेत. त्यांनी दोन स्वयंसेवी संघटना स्थापन केलेल्या आहेत. या दोन्ही संस्थाद्वारे गरीब मुलांना शिक्षण, स्त्री साक्षरता वर्ग, स्त्रियांची जागृती, झोपडपट्टीत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र असे उपक्रम चालविले जातात.
‘व्हॉट वेंट राँग’ या पुस्तकात किरण बेदींनी समाजातील पीडित महिला, व्यसनाधीन पुरुष, सराईत गुन्हेगार यांची आत्मकथने समाविष्ट केलेली आहेत. प्रत्येकाने प्रांजळपणाने आपल्या आयुष्यातील संघर्ष, दु:ख, वेदना कथा सांगितलेल्या आहेत. त्यांच्या जीवनातील कटू सत्याचे यथार्थ दर्शन येथे घडते.
यामध्ये आईवडिलांनी अव्हेरलेल्या मुली आहेत, काहीजणी कुटुंबापासून तुटल्या आहेत समाजातील गुंडांच्या तावडीत सापडलेल्या आहेत, काहींचे सुंदर चेहेरे अॅसिड फेकून विद्रुप केलेले आहेत, काहींचा हुंड्यासाठी छळ होतो आहे, काहींवर तर घरातल्याच लोकांनी पाशवी बलात्कार केलेले आहेत, काही ठिकाणी स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू म्हणून वागलेल्या आहेत. अशा सगळ्या स्त्रियांच्या कहाण्या मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. मादक द्रव्ये, दारूचे व्यसन, आतंकवाद, सूडबुद्धीतून केलेले खून, चोऱ्या दरोडे, भामटेगिरी यांच्या आहारी जाऊन स्वत:च स्वत:च्या आयुष्याची राखरांगोळी केलेल्या पुरुषांच्याही कहाण्या या पुस्तकात आहेत.
या सगळ्यांच्या आत्मकहाण्या ऐकून किरण बेदींनी काही निष्कर्ष सादर केलेले आहेत. यामधून स्त्रीच्या दु:खाला स्त्री स्वत: किती जबाबदार आहे, पालकांची कर्तव्ये कोणती आहेत, पोलीस खात्यात कोणते गैरव्यवहार आहेत, समाज कसा कोणत्या गोष्टीला कारणीभूत आहे याचे विवेचन केलेले आहे.
त्यांच्या मते शिक्षणाचा, साक्षरतेच अभाव मुलींच्या पिळवणुकीस कारणीभूत ठरतो आहे. सासरी छळ होतो तरीही मुलींना माहेरचा आधार मिळत नाही. स्त्रीला स्वत:च्या शक्तीची जाणीव असूनही कधी कधी ती परिस्थितीपुढे हतबल होते. काही स्त्रिया कितीही शिकल्या तरी शरण येतात. सुरक्षितता आणि आधार शोधत राहतात. स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे मोल त्या जाणत नाहीत.
पोलीस खात्यातील गैरव्यवहारही त्यांनी वर्तविला आहे. आपल्याला पाहिजे तशी जबानी मिळविण्यासाठी पोलीस लोकांची पिळवणूक करतात. गरीब आणि मागास भागातील पोलीस यंत्रणा लोकांना न्याय्य वागणूक, अप्रामाणिक वर्तन यांचा समाजाला त्रास होतो.
आई-वडिलांमध्ये सुसंवाद नसणे, त्यांचे अनैतिक संबंध, मुलांकडे दुर्लक्ष यामुळे लहान मुलांवर परिणाम होऊन ती गुन्हेगारीकडे वळतात. असेही त्यांनी दर्शवून दिले आहे. कधी कधी समाजातील काही विघातक शक्ती गरीब अणि दुर्बल व्यक्तींना गुन्हेगार बनवितात.
एकूणच कुणाचे कुठे काय चुकले याचा परामर्श या पुस्तकातून किरण बेदी यांनी घेतलेला आहे. समाजातीलच काही घटकांनी एकत्र येऊन हे सामाजिक प्रश्न सोडविले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यासाठी त्यांनी ज्या संघटना स्थापन केल्या. त्यांच्या कार्याची माहितीही या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. किरण बेदी नुसत्याच पोलीस अधिकारी म्हणून नोकरी करीत नाहीत तर समाज जागृतीसाठी तळमळीने काम करणारी एक सामाजिक कार्यकर्ती स्त्री आहे, हे दिसून येते. समाजाला अशा व्यक्तींची गरज आहे. ...Read more