YAYATI IS THE STORY OF THE LUST OF A KING BY THE SAME NAME, WHO APPEARS IN THE MAHABHARATA, ONE OF THE TWO EPICS OF INDIA. THOUGH MARRIED TO BEAUTIFUL DEVYANI, HE FOUND THE FEMALE SERVANT, SHARMISHTHA, ENTICING. HE HAD FIVE CHILDREN FROM THESE WOMEN BUT HIS DESIRE FOR PLEASURE REMAINED UNSATISFIED. DID HIS QUEST FOR THE CARNAL END WITH HIS EXCHANGING HIS OLD AGE WITH HIS SON’S YOUTH? HOW LONG DID HE ENJOY THE SENSUAL PLEASURES?
YAYATI STANDS FOR ONE WHO IS NEVER SATISFIED WITH EARTHLY PLEASURES. THOUGH THE STORY OF THE ANCIENT TIMES CENTERS ONLY AROUND DISSOLUTE DESIRES OF AN INDIVIDUAL, ONE CAN DRAW PARALLEL EXAMPLES FROM THE PRESENT DAYS OF CONSUMERISM WHERE THE INSATIABILITY TO HAVE MORE PLEASURES CONTINUES.
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील ‘ययाति’चे स्थान मेरुमण्यासारखे आहे. या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्यभीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच, ते दुस-या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वाेत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच ‘ययाति’च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. ‘ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,’ अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार १९७६